‘पाताळा’चे द्वार...
मानवाची बौद्धिक उत्क्रांती मोठ्या प्रमाणात झाल्यापासून त्याच्या मनात स्वर्ग, नरक, पाताळलोक, पृथ्वीबाहेरचे जग इत्यादी कल्पना आणि संकल्पनांनी घर केले आहे. पुरातन काळातील मानवापासून आधुनिक मानवापर्यंत सारेजण या विचारांकडे आकर्षित होताना दिसतात. पुरातनकाळी मानवाने स्थापत्यकला आणि शास्त्र अवगत केल्यानंतर त्याने या कल्पना किंवा संकल्पनांना मंदिरांच्या किंवा अन्य वास्तूंच्या माध्यमांमधून मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. मेक्सिको या देशाच्या तेओतिहूआकान या नगरात असे एक प्राचीन मंदीर असून ते चर्चेत आहे.
ते क्वेटजाल्कोअटल मंदीर या नावाने ओळखले जाते. ते जवळपास 2 हजार वर्षे जुने आहे. हे मंदीर पाताळलोकाचे द्वार आहे, असे मानले जाते. 2015 मध्ये या मंदीराच्या परिसरात उत्खनन केल्यानंतर पातळ पारा सापडला होता. या मंदिराच्या तळात एक भुयार असून त्याचा शोध 2003 मध्ये लागला होता. हे भुयार पुन्हा खोदून स्वच्छ करण्यासाठी सहा वर्षे लागली होती. या भुयाराची लांबी 300 फूट आहे. भुयाराच्या दुसऱ्या टोकाला तीन कक्ष सापडले. या कक्षांमध्ये हा पातळ पारा आढळून आला. तसेच, जडावाच्या मूर्ती, बिबट्याचे अवशेष, नक्षीदार शंख आणि रबराचे चेंडूही आढळून आले आहेत. हे मंदीर युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या मंदिरात मानवबळी देण्याची प्रथा होती. मंदिराच्या तळाशी त्यामुळे अनेक मानवी अस्थीपंजर सापडले आहेत. हे मंदीर पिरॅमिडच्या आकाराचे असल्याने त्याला काही तज्ञा पिरॅमिडही मानतात. हे मंदीर एकेकाळी मेसोअमेरिकन संस्कृतीचे महत्वाचे प्रतीक होते. पातळ पारा हा पाताळातील नदी आणि सरोवराचे प्रतीक मानण्यात आला असून हे मंदीर आजही एक गूढच आहे.