कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘माझा भांडी प्रपंच’ अभिवाचनाने भावविश्वाचे गारुड

11:58 AM Feb 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंथनच्या 38 व्या साहित्य संमेलनात अभिवाचन : मंथनचे यंदाचे संमेलन अत्यंत अर्थपूर्ण झाल्याचा दाखला

Advertisement

बेळगाव : एक साधा चमचा हरवला की आपले काही तरी मोठे घबाड हरवल्याप्रमाणे गृहिणी किंवा बाईची तगमग सुरू होते. तेथे तिने हौसेने, कष्टाने, काडी काडी करून जमविलेल्या संसारातल्या वस्तू प्रामुख्याने भांडी ती दुसऱ्या कोणाला देईल, ही शक्यताच नाही. बाईचा जीव तिच्या कुटुंबात आणि तिच्या संसारात गुंतलेला असतो. प्रत्येक वस्तू आणि भांड्यामागे तिच्या आठवणींचा एक गोफ विणलेला असतो. याचेच प्रत्यंतर ‘माझा भांडी प्रपंच’ या सादरीकरणाने दिले. मंथनच्या 38 व्या साहित्य संमेलनात इचलकरंजी येथील चित्कला कुलकर्णी व संतोषकुमार आबाळे यांनी ‘माझा भांडी प्रपंच’ हे अभिवाचन सादर केले आणि एक वेगळेच भावविश्व त्यांनी रसिकांसमोर उलगडले. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये माणसेही अधिक, तितकाच सामानाचा पसाराही अधिक. आता कुटुंबे विभक्त झाली. एवढे सामान करायचे काय? त्यापेक्षा मला द्या, मी तुम्हाला चांगला भाव देतो, असे बोहारी सांगतो. तेव्हा त्याला गृहिणी पटकन होकार देते.

Advertisement

पण जसजसे एकेक भांडे तिच्या हाती येते, तसतसे आठवणींचे अनेक पदर उलगडतात आणि शेवटी पुन्हा हा सर्व पसारा मोठ्या प्रेमाने ती जपून ठेवते, असे हे कथानक. पूर्वीच्या कुटुंबात मुसळ हमखास असायचे. उलथण्याला उचाटन, सराचा, चिमट्याला सांडशी, करची असे अनेक समानार्थी शब्द आहेत. आता मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, असा उल्लेख करतानाच याच मुसळाने शत्रूला लुटता येते याचा दाखलाही देण्यात आला. चमचा हरवल्यानंतर इतर चमचे आपसात संवाद साधतात, तेव्हा ‘ती असती तर मीही हरवलो नसतो’ ही कुसुमाग्रजांची कविता औचित्यपूर्ण ठरली. मोठ्या पातेल्यांचा दाखला देताना गळती लागली की त्याचा उपयोग किती महत्त्वाचा, हे स्पष्ट करताना इंदिरा संत यांची ‘नको नाचू असा तडा तडा, भांडी पातेली, सतेली आणू मी कोठून?’ ही कविता चपखल बसली.

लग्नात मिळालेल्या पितळी पेल्यांचा संच, पेटारा तसेच पूर्वीच्या कुटुंबात असलेले  तसराळ, काथवट, बिडाचा तवा, तिवली, कढई, माठ, चरवी, कळशी, तपेली, गडू, घागर, अडकित्ता, चुनाळं, वेळणी, रोवळी, गुंडी, फिरकीचा तांब्या अशा एक ना अनेक भांड्यांचा तपशील या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला. घरभरणी करताना ओलांडलेले माप आणि त्या निमित्ताने ‘चिपट्याची धामधूम, पायलीची सामसूम’, ‘पावशेराची खिर, गावभर फिर’ अशा अनेक म्हणींचा उपयोगही अभिवाचनामध्ये समर्पकपणे करून घेण्यात आला आहे. आता नवीन नॉनस्टिक भांडी आली तरी जुन्या भांड्यांना सोडवत नाही. कारण ती इतिहासाची साक्षीदार आहेत. तत्वज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घालणारी तसेच लोखंड, धातू, पितळ, कास्य यांचे आयुर्वेदिक महत्त्वही सांगणारी आहेत, असे नमूद करत या अभिवाचनाची सांगता झाली.

एकूणच मंथनचे यंदाचे संमेलन अत्यंत अर्थपूर्ण असे झाले. आशय आणि विषयाची मांडणी, वेळ मर्यादेचे काटेकोर पालन, नेटकी मुलाखत, उत्तम अभिवाचन यामुळे या संमेलनाने वैचारिक मेजवानीच दिली. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन निर्मला कळ्ळीमनी यांनी केले. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन शोभा लोकुर यांनी, मुलाखतीच्या सत्राचे सूत्रसंचालन अनघा वैद्य यांनी व चौथ्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला राज्य मराठी विकास संस्था, मुंबईचे सहकार्य लाभले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article