For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन आधार अॅपची पूर्ण आवृत्ती लाँच

06:55 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
नवीन आधार अॅपची पूर्ण आवृत्ती लाँच
Advertisement

नवीन आधार अॅपमध्ये पत्ता, नाव बदलाचीही सोय  : मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘आधार’चे नियमन करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) नवीन डिजिटल सेवा जारी केली आहे. माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या उपस्थितीत आधार अॅपचे अनावरण करण्यात आले. आता वापरकर्त्यांना आधारकार्डमधील बदलांसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. अॅपवर ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे सर्वकाही बदलता येणार आहे. ही सेवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि स्थलांतरितांसाठी सोयीस्कर ठरणार असल्याचा दावा ‘युआयडीएआय’ने केला आहे.

Advertisement

देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे त्यांच्या ओळखीसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. तरुण असो वा वृद्ध, आधार कार्ड सर्व वयोगटातील लोकांसाठी महत्त्वाचे बनले आहे. सरकारी आणि खासगी कामांपासून शाळा, महाविद्यालये, जमीन नोंदणी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. दरम्यान, आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आधार कार्डवरील मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आधार केंद्रावर लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. नवीन आधार अॅपच्या सर्वात मोठा फायदा आधार कार्डधारकांना होईल, कारण त्यांना प्रत्येक कामासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागणार नाही. अर्थातच आधारकार्डशी संबंधित अनेक कामे घरबसल्या आरामात करता येतील.

आता देशातील कोणताही आधार कार्डधारक आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर घरबसल्या बदलू शकतो. सरकारने नवीन आधार अॅपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. तसेच आता पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. अॅपद्वारे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. कोणतेही कागदपत्रे किंवा सीएससी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसल्याने संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.

वापरकर्ते एकाच फोनवर कुटुंबातील पाच जणांचे आधार तपशील संग्रहित करू शकतात. हे अॅप फक्त आवश्यक आधार माहिती शेअर करण्याची परवानगी देते. या अॅपमध्ये कार्डधारक युपीआय वापरून स्कॅन करून पेमेंट करतो त्याचप्रकारे आधार तपशील शेअर करू शकतो. हे अॅप अधिक सुरक्षित करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन सारखी वैशिष्ट्यो जोडण्यात आली आहेत. तसेच सदर सेवेची फी भरण्यासाठी ‘पेमेंट’ पर्याय उपलब्ध करण्यात आला असून योग्य रक्कम जमा केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आधारकार्ड अपडेट असणे अत्यावश्यक

आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा असून ती 130 कोटीहून अधिक लोकांच्या डेटाशी जोडलेली आहे. मोबाईल नंबर हा आधार कार्डचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तो ओटीपी द्वारे बँक खाती, सरकारी अनुदाने, प्राप्तिकर पडताळणी आणि डिजिलॉकरसारख्या डिजिटल सेवांमध्ये प्रवेश प्रदान करतो. तथापि, ‘युआयडीएआय’ने आता डिजिटल पद्धतीने अनेक सुविधा सोप्या केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.