For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अच्छे दिन’च्या संकल्पाची सिद्धता !

12:04 PM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘अच्छे दिन’च्या संकल्पाची सिद्धता
Advertisement

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे उद्गार : फोंड्यात ‘संकल्प से सिद्धी’ साजरा

Advertisement

फोंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे देशातील जनतेला आश्वस्त केले होते. गेल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वावर काम करताना सरकारने अच्छे दिनची सिद्धता केलेली आहे. गोव्यातही चौफेर विकास साधताना साधनसुविधांच्या निर्माणापासून विविध स्तरातील घटकांचा जीवनमान स्तर उंचावण्याची संकल्प सिद्धता डबल इंजिन सरकराने साधली आहे, हे आपण ठामपणे सांगू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला अकरा वर्षे पूर्ण  झाल्याबद्दल राज्य सरकारतर्फे फोंडा येथील राजीव गांधीकला मंदिरमध्ये  आयोजित केलेल्या ‘संकल्प से सिद्धी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. कृषी, मस्त्योद्योग, दूधउत्पादन, महिला स्वयंरोजगार यासह अन्य क्षेत्रात सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेल्या व्यक्ती आणि संस्थांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच विविध योजना यशस्वीपणे लाभधारकांपर्यंत पोचविणारे सरकारी अधिकारी, राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, आयसीएआर या संस्थांनाही सन्मानीत करण्यात आले. वनहक्क कायदा 2006 अंतर्गत उत्तर गोव्यातून 90 तर दक्षिण गोव्यातून 46 भूमीपुत्रांना जमीन हक्काच्या सनदी वितरीत करण्यात आल्या. वानरमारे जमातीच्या वयस्क व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र व दयानंद सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेची ओळखपत्रे वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषीमंत्री रवी नाईक, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक व राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू हे उपस्थित होते.

Advertisement

19 डिसेंबरपर्यंत सर्व दावेदारांना वनहक्क 

मोदी सरकार हे प्रामुख्याने युवाशक्ती, नारीशक्ती, किसानशक्ती आणि गरीब कल्याण या चार घटकांवर लक्ष केंद्रीत करून कार्य करीत आहेत. आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेबरोबरच स्वयंपूर्ण गोंयच्या माध्यमातून राज्यातील शेतकरीवर्गापासून तळागाळातील घटकांच्या उत्कर्षासाठी कार्यान्वित केलेल्या योजनांची फलश्रुती आज दिसत आहे. वनहक्क कायद्याखाली राज्यातील भूमिपुत्रांचे दहा हजारपैकी दोन हजार दावे निकालात काढण्यात आले असून उर्वरित 8 हजार दावेदारांना येत्या 19 डिसें.पर्यंत जमिनीच्या सनदी दिल्या जातील. राज्यातील 340 महिला स्वयंसाहाय्य गट अन्न प्रक्रिया आणि इतर लघुउद्योगामध्ये कोट्यावधींची उलाढाल करीत आहेत. येणाऱ्या काळात लखपती दीदी या योजनेखाली 17 हजार भगिनींना लखपती बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ठ्या आहे. राज्यातील काही युवकांनी स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात जागतिक स्तरावर झेप घेतली असून केवळ आयआयटी अभियंतेच नव्हे इतर अभियंत्यांनीही स्टार्टमधून पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कारागिराना विश्वकर्मा योजनेखाली आणणाऱ्या मोदी सरकारच्या कलासन्मान योजनेच्या मानधनाचा लाभ राज्यातील वयस्क कलाकारांनाही मिळणार आहे.  मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात अच्छे दिन आपण पाहत असून यापुढे विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठी जनतेने डबल इंजिन सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अजून मोठी झेप घेण्याचा संकल्प : श्रीपाद नाईक

मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, मोदी सरकारने केवळ विकास केला नाही तर समाजातील अत्यंत खालच्या स्तरातील घटकाला मुख्य प्रवाहात आणले. हीच त्यांच्या संकल्पाची खरी सिद्धता आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक गोष्टीचा आज  विरोधक पुरावा मागतात. आम्ही तो कृतीतून देतो. भारत देश आज जागतिक स्तरावर चौथी आर्थिक सत्ता म्हणून पुढे आला आहे. आम्हाला येथेच थांबायचे नसून संपूर्णपणे विकसित नवनिर्माण भारत घडवायचा आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात अजून मोठ्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी सिद्ध व्हायचे आहे. भारत विकसित होणे म्हणजे जगात शांतता नांदणे, होय. हे स्थान भारताला गाठायचे आहे, मंत्री सुभाष शिरोडकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सर्व बाराही तालुक्यामध्ये गोशाळा उभारण्याचा संकल्प एक टार्गेट म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला. जलजीवन मिशन अंतर्गत वर्ष 2047 पर्यंत मुबलक पाण्याची तरतूद करताना हे लक्ष्य वर्ष 2035 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

व्यक्ती आणि संस्थांच्या कार्यकर्तृत्त्वाचा गौरव

कृषी उत्पादन, स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग, कृषी, सहकारी व व्ही. के. एस. संस्था विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊन कार्यकतृत्वाचा आदर्श निर्माण करणाऱ्या महिला व महिला स्वयंसहाय्य गट, सरकारच्या विविध योजना लाभधारकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यतत्परता दाखविणारे सरकारी अधिकारी तसेच राष्ट्रीयकृत बँका, अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री मत्स्यवाहिनी योजनेखाली काही लाभधारकांना इको फ्रेन्डली वाहनांची मंजुरीपत्रे देण्यात आली. मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या विकासकार्यावर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन तसेच लखपती दीदी योजनेच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या उम्मीद केंद्र तसेच आयएमए फोंडाचे दिलासा पॅलिटिव्ह केअर सेंटरच्या कार्याचाही सन्मान करण्यात आला. जलजीवन, कृषी खात्याच्या गोवा राज्य अमृतकाळ योजनेसाठी विशेष कार्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांना सन्मानीत करण्यात अले. गुरांची देखभाल व सुश्रूशेसाठी कार्य करणाऱ्या गोमंतक गो सेवक संस्था शिकेरी तसेच गिरगाई व दूधउत्पादन क्षेत्रातील प्रितम पाटील व अनंत मळीक यांचा सन्मान करण्यात आला. रेबीज मुक्ततेसाठी कार्य करणारे मुरुगन अप्पोपिलाई यांचाही त्यामध्ये समावेश होता. कार्यक्रमाला आमदार डॉ. देविया राणे, दिलायला लोबो, संकल्प आमोणकर, उल्हास तुयेकर तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.