कर्म केल्यावर जे फळ मिळेल ते गोड मानून घ्यावं
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, अर्जुना, कर्तव्याचा विचार केला, तर युद्ध करण्यातच तुझे कल्याण आहे. हा संग्राम टाकून गेलास तर तूझ्या पूर्वजांनी मिळविलेली पुण्यकीर्ति घालवल्यासारखे होईल. युद्ध सोडून जातो म्हणलास तरी हे कौरव तुला पळून जाऊ देणार नाहीत. तूला पकडून तुझी फजिती करतील. म्हणून युद्धाला तयार हो. ह्या रणांगणावर युद्ध करताना तुझे प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला प्राप्त होईल, हरलास तर राज्य मिळेल म्हणून अर्जुना! आता कशाचाही विचार न करता हातात धनुष्य घेऊन युद्धास सुरुवात कर. या युद्धाच्या परिणामाची चिंता करू नकोस. स्वधर्माने वागत असताना, जे कांही बरे-वाईट प्रसंग येतील ते शांतपणे सहन कर. अशा पद्धतीने वागण्याची मनाची तयारी झाली की, तुझे मन शांत होईल. युद्धात कौरवांना मारल्याने आपल्याला पाप लागेल अशी तुला जी भीती वाटते आहे ती समूळ नष्ट होईल.
आपल्यालाही जीवनात अनेक गोष्टींची चिंता वाटत असते. काय होईल? कसे होईल? ह्याचा आपण सतत विचार करत असतो. कर्तव्य पालन करायला जाऊन आपल्याला काही त्रास तर होणार नाही ना? अशी भीती वाटत असते किंवा खरे बोलल्याने वा सत्याला धरून राहिल्याने आपले काही नुकसान तर होणार नाही ना? असा विचार सतत मनात येत असतो. वरवर पाहता जे आपल्या भल्याचे आहे ते करावे असे आपल्याला वाटते. भले भले लोक असा चुकीचा विचार करून स्वार्थाला बळी पडतात. त्यापोटी व्यवहारात बऱ्याचवेळा हातून पाप घडते. तसे घडू नये म्हणून भगवंतानी अर्जुनाला केलेल्या उपदेशानुसार जीवनात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगात आपण सत्याची कास न सोडता, परिणामांची तमा न बाळगता स्वधर्म निभावला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीने सुखी किंवा दु:खी न होता स्थिर राहिले पाहिजे. मन जर असे स्थिर ठेवता आले तर आपल्या हातून पाप घडणार नाही. अर्थात मन स्थिर ठेवणे ही कला लगेच साध्य होणारी नाही पण प्रयत्न करत राहिल्यास हळूहळू आपल्या स्वभावात फरक पडेल आणि पुढे पुढे स्वभावात बदल होऊन सुखदु:खाच्या प्रसंगात आपली मन:स्थिती नेहमी स्थिर राहील.
पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, अर्जुना, आतापर्यंत तुला सांख्यविषयक म्हणजे आत्म्याबद्दलचे ज्ञान सांगितले. आता निष्काम कर्मयोगाची माहिती देतो. त्याप्रमाणे वागल्यास तू कर्मबंधनापासून मुक्त होशील.
सांख्य-बुद्धि अशी जाण ऐक ती योग-बुद्धि तू। तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी ।।39।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, निष्काम कर्मयोगाच्या तत्वाप्रमाणे जो आचरण करेल त्याला कर्मबंध बाधत नाही. कोणतेही कर्म करताना मनुष्य आपल्याला अमुक अमुक फळ मिळावे ह्या अपेक्षेने कर्म करू लागला की, त्यापासून पाप, पुण्य निर्माण होते. त्याची फळे त्याला पुनर्जन्म घेऊन भोगावी लागतात. ह्यालाच कर्मबंध असे म्हणतात. म्हणून भगवंत सांगतायत की, पुनर्जन्म टाळायचा असेल तर कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करावे आणि जे फल ईश्वर देईल ते गोड मानून घ्यावे. एकदा अशी मनाची तयारी झाली की, मनुष्य करत असलेले कर्म ईश्वराने दिलेले आहे आणि ते करणे आपले कर्तव्य आहे ह्या भावनेने करतो. तो कर्मात गुंतून पडत नाही. जो मनुष्य कर्मात गुंतून पडतो तो ते कर्म पूर्ण होईल की नाही, त्यातून अपेक्षित फळ मिळेल की नाही असा विचार करत कर्म करत असतो पण निरपेक्षपणे कर्म करणारा जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.
क्रमश: