बकुळीचा गंध
लताबाईंच्या एकेका गाण्याचा अभ्यास करायला माणसाचं आयुष्य खर्ची पडेल. इतकी सुंदर गीतं त्यांनी गायलेली आहेत. तयारीच्या दृष्टीने याला सुगम संगीत कशाला म्हणतात कोण जाणे असं नेहमी वाटतं. परंतु ही शब्दप्रधान गायकी आहे आणि आपल्याकडच्या अनेक अनेक संगीतकारांनी ती वर्षानुवर्ष समृद्ध भर घालून जपली आहे.
बकुळीचा गंध फुलावा
तू तशी बैस ना येथे
या कलत्या तिन्हिसांजेला
तू वात दिव्याची गमते
शिगंध तू’ या अल्बममधलं हे गाणं एका भावसंगीताच्या कार्यक्रमात ऐकण्याचा योग आला. याचं संगीत अरविंदजी काडगावकर यांनी दिलंय. मूळ गायक आहेत पं. रघुनंदन पणशीकर. आणि ते किती नितांतसुंदर आहे त्याची घडण किती निगुतीने केलेली आहे, त्या गाण्याची कविता किती सुंदर आहे, त्या कवितेला चढवलेला स्वरसाज किती कमालीचा विचारपूर्वक चढवलेला आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या मनात घोळत राहिल्या. आणि ह्या विषयावर विचार करता करता असं मनात आलं की आपल्या संगीत परंपरेत भावसंगीत या विषयाचा वाटा किती मोठा आहे! सर्वसामान्यपणे आपण भावसंगीतासाठी सुगम संगीत असा शब्द वापरतो. मला मोठं आश्चर्य वाटतं ते हा शब्द प्रथम वापरणाऱ्याचं! अर्थात याला सुगम संगीत हे नाव अशासाठी दिलेलं असावं की शास्त्राrय संगीतासाठी केली जाणारी मेहनत आणि त्यासाठी लागणारी चिकाटी, रागांची असणारी व्याप्ती आणि त्यासाठी करावी लागणारी साधना या सर्व गोष्टी पाहता ते करायला खूपच अवघड असं मानलं गेलं आहे. त्या मानाने संगीतातले इतर प्रकार तुलनेने थोडेसे सोपे जाऊ शकतात म्हणून याला सुगम संगीत असं नाव मुळात देणाऱ्या पूर्वसूरींनी दिलेलं असावं. परंतु आपण विचार करायला लागलो तर हे सुगम संगीत हे नाव पूर्णपणे पटण्यासारखं नाही खरंतर. कारण भावसंगीत व त्यामध्ये चित्रपट संगीत सुद्धा येतं. या विषयाला खूप वर्षांपूर्वी म्हणजे 50 ते 70 वर्षांपूर्वीपासूनच मंगेशकर मंडळींनी इतक्या उंचीला नेऊन ठेवलेलं आहे की त्यांची गाणी गाण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच दुर्गम संगीताला आमंत्रण देण्यासारखं वाटेल एखाद्याला. त्यांच्या गाण्याचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला ते सुगम संगीत आहे हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी ती ऐकणार नाही. उलट अशा व्यक्ती मोकळेपणाने सांगतात की लताबाईंच्या एकेका गाण्याचा अभ्यास करायला माणसाचं आयुष्य खर्ची पडेल. इतकी सुंदर गीतं त्यांनी गायलेली आहेत. तयारीच्या दृष्टीने याला सुगम संगीत कशाला म्हणतात कोण जाणे असं नेहमी वाटतं. परंतु ही शब्दप्रधान गायकी आहे आणि आपल्याकडच्या अनेक अनेक संगीतकारांनी ती वर्षानुवर्ष समृद्ध भर घालून जपली आहे.
आपल्याकडचा भाव संगीताचा प्रवास हा तसा जुना असला तरी खास करून भावगीतांचे स्वतंत्र कार्यक्रम हा प्रकार सुरू करण्याचा मान थेट गजाननराव वाटवे ह्या जुन्या पिढीतल्या अतिशय प्रसिद्ध भावगीत गायकाच्या नावावर जमा आहे असं म्हणता येईल. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा अगदी मध्यम शहरांमध्ये सुद्धा छान चौकात स्टेज वगैरे घालून त्याच्यावर भावसंगीताचे स्वतंत्र कार्यक्रम करण्याची परंपरा गजाननराव वाटवे यांनी सुरू केली. साधी पेटी तबल्याची साथ घेऊन, इतर कोणताही डामडौल न करता कविता या दृष्टीने अत्यंत समृद्ध असणारी गाणी, त्याला अतिशय भावविभोर असणाऱ्या चाली आणि गायकाचा भावसंगीताला अनुकूल असणारा भावनाशील गळा एवढ्याच गोष्टींवर हे कार्यक्रम अतिशय गाजत असत. ‘पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ यासारख्या गीताच्या बाबतीत अशा आठवणी सांगितल्या जातात की एकीकडे भगिनीवर्ग डोळे पुसत असे आणि एकीकडे ते गीत वहीवर लिहून घेतलं जात असे. कारण आताच्या सारखं त्याकाळी गाणी कधीही कुठेही उपलब्ध होतच नसत. कदाचित म्हणूनच त्याला किंमत असावी. परंतु त्यांनी सुरू केलेली ही परंपरा नंतर अनेक गायकांनी चालवली. पुढे मग सभागृहात भावसंगीताला वाहिलेले कार्यक्रम होऊ लागले. मंगेशकर मंडळींचा भावसरगम हा त्यातला अत्यंत गाजलेला आणि सतत सुरू असलेला भावसंगीताचा जलसा आहे असे म्हणावे लागेल.
पुढे या समृद्ध परंपरेत अनेकांनी आपापल्या नावाची भर टाकली. याच मुद्याचा विचार करून की काय पण झी मराठीने ‘नक्षत्रांचे देणे’ नावाचे अतीव सुंदर मालिका केली. त्याचे एपिसोड आजही आपल्याला
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. होऊन गेलेल्या किंवा ज्यांनी या संगीत क्षेत्रात काम केलेलं आहे अशा महत्त्वाच्या संगीतकार, गायक कवी, लेखक यांच्यावर अतिशय सुंदर कार्यक्रम घडवले गेले. तांत्रिक अंग, सादरीकरण, निवेदन, गायन, साथ आणि उत्कृष्ट संयोजन या सगळ्याच पातळ्यांवर हे कार्यक्रम उत्तरोत्तर उंची गाठत गेले. आजही ते बघताना इतका आनंद माणसाला मिळतो की झी मराठीचे आभार यासाठी मानावेसे वाटतात. महत्त्वाच्या ऐवजाचं त्यांनी पुन्हा एकदा दस्तऐवजीकरण करून ठेवलं. पुढच्या पिढीला देण्यासाठी हे महत्त्वाचं असतं. आनंदाच्या वाटा या जुन्या पिढीने नव्या पिढीकडे सोपवून द्यायच्या असतात. आपल्या मुलाच्या बोटाला धरून त्या वाटा त्याला दाखवणे हे आपलंच काम असतं.
सहज म्हणून विचार करायला सुरुवात केली तर भावसंगीतातलं दीर्घकाळ टिकून राहिलेलं नाव म्हणून आपल्याला बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांचं नाव घ्यावं लागतं. गीतरामायण हा गदिमा बाबूजी यांचा संयुक्त उपक्रम हा त्यातला सर्वोच्च आविष्कार आहे. हे जरी खरं असलं तरी सिनेसंगीतासह त्यांनी अक्षरश: शेकड्यांनी भावगीतंही गायलेली आहेत. संगीतही दिलेलं आहे. संगीतकार आणि गायक या दोन्हीही भूमिकांमध्ये ते त्या त्या हिशेबाने वावरत असत. ज्या वेळेला ते एखाद्या नवीन संगीतकाराकडे गायक म्हणून जात असत तेव्हा त्याच्याकडून समोर बसून सर्व वैशिष्ट्यो ते शिकून घेत असत. बाबूजींचं नाव यासाठी अजरामर आहे की त्यांचे शब्दांवरचे आघात आणि शब्दांचे उच्चार इतके उत्कृष्ट दर्जाचे असत की सुरेल गातानाही त्यांनी कधीही त्याची एकही मोडतोड होऊ दिली नाही. भावसंगीत ही शब्दप्रधान गायकी असल्यामुळे शब्दांचे उच्चारण, त्यावरचे आघात, शब्द कुठे कसे टाकावेत, त्याचं नियोजन काय असावं, या सगळ्याचा दीर्घ अभ्यास असणं आणि तो अभ्यास वेळोवेळी उपयोगात आणणं हे अत्यंत जरुरीचं असतं. याचा वस्तूपाठ म्हणून आपल्याला बाबूजींकडे बघायला लागेल. त्यांचा हा आदर्श घेऊन पुढच्या पिढीतल्या बऱ्याचश्या गायकांनी आणि संगीतकारांनीही याच्यावर अभ्यास करून आपली गायकी समृद्ध केल्याचे दाखले आपल्याला जागोजागी आढळतात. भावसंगीताच्या क्षेत्रात हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्यापासून ते अशोक पत्की, आताच्या पिढीतले सलील कुलकर्णी, कौशल इनामदार, अजय अतुल यांसारखी अनेक नावं आढळतात.
गायकांमध्येही अरुण दाते, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, रवींद्र साठे यांच्यासारखी संगीतसमृद्ध माणसं या क्षेत्रात आहेत. सर्व मंगेशकर भगिनी तर यातली प्रात:स्मरणीय नावं आहेत. आताच्या काळात संदीप खरे, हृषिकेश रानडे, महेश काळे, राहुल देशपांडे, मंगेश बोरगावकर, विश्वजीत बोरवणकर आणि इतर असंख्य नावं यात भर टाकत चालली आहेत.
भावसंगीताचं हे विश्व विस्तारत आहे ते मानवी भावभावना आणि शास्त्राrय संगीताच्या मधुर मिलाफातूनच!
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु