For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-न्यूझीलंड चौथी टी-20 लढत आज

06:28 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत न्यूझीलंड  चौथी टी 20 लढत आज
Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

Advertisement

मालिका आधीच खिशात घातल्यानंतर भारत आज बुधवारी येथे होणाऱ्या चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवरील आपले संपूर्ण वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना आपल्या फिरकीपटूंच्या कामगिरीत सकारात्मक बदलाची आशा बाळगून असेल. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी निर्माण केलेल्या फलंदाजीच्या वादळामुळे आणि परिणामी 3-0 अशी आघाडी मिळाल्यामुळे दोन प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव आणि वऊण चक्रवर्ती यांच्या निराशाजनक कामगिरीवर आतापर्यंत पांघरूण घातले गेले आहे.

 

कुलदीपने दोन सामन्यांमध्ये दोन बळी घेतले आहेत, परंतु तो आपल्या मनमोहक कामगिरीची केवळ एक अस्पष्ट सावली वाटत होता. त्याने प्रति षटक 9.5 धावा दिल्या आहेत. जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई आणि हार्दिक पांड्या यांच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने किवी संघाला 9 बाद 153 धावांवर रोखलेले असताना या डावखुऱ्या मनगटी फिरकीपटूने तीन महागडे षटके टाकली, ज्यात त्याने 32 धावा दिल्या.

Advertisement

तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी विश्रांती दिलेल्या चक्रवर्तीची बाब थोडी वेगळी आहे. कारण तो दोन भरपूर धावा निघालेल्या सामन्यांत खेळला, ज्यात पाहुण्या संघाने 190 आणि 208 धावा केल्या. पण त्याच्या गोलंदाजीत नेहमीची धार नव्हती. या पार्श्वभूमीवर भारत चौथ्या सामन्यात बिश्नोईला (गुवाहाटी येथे 4-0-18-2) कायम ठेवावे की, कुलदीपला थोडा आराम देऊन त्याच्या जागी चक्रवर्तीला संघात परत आणावे, याचा विचार करेल. भारत अष्टपैलू अक्षर पटेलच्या तंदुऊस्तीवरही बारीक लक्ष ठेवेल, कारण बोटाच्या दुखापतीमुळे तो नागपूरमधील पहिल्या सामन्यानंतर खेळलेला नाही.

 

या मालिकेत गोलंदाजीतील सर्व गोष्टी अजून पूर्णपणे जुळून आल्या नसल्या, तरी यजमानांची फलंदाजीची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. या मालिकेत अव्वल फळीने भारताच्या टी-20 फलंदाजीला एक नवीन रूप दिले आणि तिसरा सामना एखाद्या विस्तारित पॉवर प्लेसारखा वाटला. अभिषेकने 300 पेक्षा जास्त स्ट्राइक-रेटने धावा केल्या आहेत, तर सूर्यकुमार आणि किशनने 230 च्या जवळपास स्ट्राइक-रेट राखला आहे. त्यांच्या फलंदाजीचा धडाका इतका होता की, दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात 209 आणि 154 (एकूण 363 धावा) धावांचा पाठलाग करताना भारताने केवळ 25.2 षटकेच खर्च केली. विशाखापट्टणमच्या खेळपट्टीचा स्वभाव आणि दव लक्षात घेता हा सामनाही वेगळी कथा सांगणार नाही.

एकमेव विसंगत बाब म्हणजे संजू सॅमसनचा खराब फॉर्म आहे. त्याला खरे तर या मालिकेत त्याची पसंतीची सलामीची जागा देण्यात आली आहे. दुखापतीतून सावरत असलेला तिलक वर्मा संघापासून दूर असल्याने सॅमसनला व्यवस्थापनाचा त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवण्यासाठी येथे आणखी एक सामना मिळू शकतो. कदाचित संघाचा थिंक टँक त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार करू शकतो आणि किशनला अभिषेकसोबत सलामीला पाठविण्याची चाल खेळू शकतो.

न्यूझीलंडच्या मॅट हेन्री (प्रति षटक 13.80 धावा), काइल जेमिसन (14.2), मिचेल सँटनर (13.14) आणि ईश सोधी (12.50) या सर्वांची यजमान संघाने धुलाई केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला गोलंदाजीच्या बाबतीत मोठ्या चिंता आहेत. त्याशिवाय फॉर्ममध्ये असलेल्या डॅरिल मिशेलला फलंदाजीच्या क्रमवारीत वरच्या क्रमांकावर बढती देण्यासारख्या काही किरकोळ बाबी आहेत. परंतु जर गोलंदाजांनी त्यांच्या जखमा स्वत:हून भरल्या नाहीत, तर त्यांना आणखी एका मोठ्या धुलाईला सामोरे जावे लागेल.

संघ : भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वऊण चक्रवर्ती, इशान किशन, रवी बिश्नोई.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, झॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेव्हन जेकब्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, टीम सेफर्ट.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.

Advertisement
Tags :

.