For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमच्या संबंधांचा पाया आहे ‘बलिदान’

07:00 AM Mar 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमच्या संबंधांचा पाया आहे ‘बलिदान’
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बांगलादेश नेत्याला पत्र

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सध्या भारताचा शेजारी देश असणाऱ्या बांगला देशमधील वातावरण अत्यंत स्फोटक आणि अस्थिर बनले आहे. तेथील हिंदू आणि अल्पसंख्य धर्मांच्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगला देशचे नेते मोहम्मद युनुस यांना एक पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी भारताने बांगला देशच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण करुन दिली आहे. या देशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो भारतीय सैनिकांनी 1971 च्या युद्धात आपले रक्त सांडले आहे.

Advertisement

या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगला देशच्या जनतेला तेथील राष्ट्रॅय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बांगला देश मुक्ती संग्राम आणि भारताने या संग्रामाला केलेल्या साहाय्याची आठवण करुन दिली आहे. भारताने साहाय्य केल्याने आणि पाकिस्तानशी युद्ध केल्याने या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते, हे त्यांनी या पत्रात आवर्जून उल्लेखिलेले आहे. आपल्या देशासाठी भारताने केलेले बलिदान हाच आपल्या द्विपक्षीय संबंधांचा पाया आहे, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, असा एक गर्भित इशाराही या पत्रात दिल्याचे बोलले जात आहे.

दोन्ही नेते भेटणार

येत्या 3 आणि 4 एप्रिलला बिम्सटेक परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगला देशचे नेते मोहम्मद युनुस यांची भेट होणार आहे. ही शिखर परिषद बँकॉक येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. युनुस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. या परिषदेच्या निमित्ताने भारताशी शिखर परिषद घेण्याची मागणी बांगला देशने व्यक्त केली होती. तथापि, भारताने ही मागणी मान्य केलेली नाही. मात्र, बिम्सटेकच्या पार्श्वभूमीवर ही भेट काही काळासाठी होईल, अशी माहिती गुरुवारी सूत्रांनी दिली आहे.

इतिहासाची आठवण

1947 मध्ये पाकिस्तान आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पूर्व पाकिस्तानात, म्हणजेच सध्याच्या बांगला देशात तेथील जनतेवर, विशेषत: हिंदू जनतेवर पश्चिम पाकिस्तानच्या सरकारे अनन्वित अत्याचार केले होते. या अत्याचारांना कंटाळून कोट्यावधी हिंदूंनी त्यावेळी बांगला देश सोडून भारतात प्रवेश केला होता. पाकिस्तानी सरकारने बांगला देशच्या बंगाली मुस्लीम लोकांवरही अत्याचार केले होते. त्यांची हत्याकांडे घडविली होती. या सर्व रक्तरंजित इतिहासाची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पत्रात मोहम्मद युनुस यांना करुन दिली आहे.

पुन्हा पूर्व पाकिस्तान...

1971 मध्ये बांगला देशला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर या देशात लोकशाहीची स्थापना झाली. तथापि, तेथील धर्मांध लोकांच्या प्रभावामुळे ही लोकशाही अस्थिरच राहिली होती. या घटनेनंतर 55 वर्षांनी बांगला देशात शेख हसीना यांचे लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले सरकार उलथविण्यात आले आहे. त्या देशाती इस्लामी धर्मवादी शक्तींनी आता तेथे ‘खिलाफत’ची स्थापना करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या देशाचा प्रवास लोकशाहीपासून पुन्हा धर्मशाहीकडे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास बांगला देशच्या रुपाने आणखी एक पाकिस्तान भारताला हाताळावा लागणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. बांगला देशात आजही जवळपास दीड कोटी हिंदू आहेत. धर्मवादी राज्यात या हिंदूंचे भवितव्य धोक्यात राहणार आहे. भारताला याची चिंता आहे. अद्याप भारताने बांगला देशातील घडामोडीसंबंधी फारशा हालचाली केलेल्या नाहीत. तथापि, तेथील प्रशासनाने धर्मांधांपासून हिंदूंचे संरक्षण केले नाही, तर भारताला कठोर पावले उचलावी लागू शकतात, असा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.