संसदीय समितीसमोर उपस्थित राहणार विदेश सचिव
एलएसीवरील गस्त अन् कॅनडासंबंधी देणार माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेश सचिव विक्रम मिसरी बुधवारी विदेश विषयक संसदीय समितीसमोर हजर राहणार आहेत. भारत-कॅनडा संबंधांविषयी ते समितीला माहिती देणार आहेत. तसेच पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) पुन्हा गस्त सुरू करण्यासंबंधी करारानंतर चीनसोबत भारताच्या संबंधांमध्ये झालेल्या सुधाराविषयी समितीला त्यांच्याकडून माहिती दिली जाऊ शकते.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील विदेश विषयक संसदीय समिती विदेश मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांची समीक्षा करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडून दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॅनडातील शिख फुटिरवाद्यांना लक्ष्य करत हिंसा, धमकी आणि गोपनीय माहिती जमविण्याचे अभियान चालविण्याचा आदेश दिला होता असा आरोप कॅनडाचे उपविदेशमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी अलिकडेच केला होता. तर भारताने कॅनडाचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांना मोकाट फिरू दिले जात असून त्यांच्याकडून भारतविरोधी कारवाया केल्या जात आहेत.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी करावी चर्चा
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य राम सिंह यांनी भारत-कॅनडाच्या तणावपूर्ण संबंधांवर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी याप्रकरणी चर्चा करावी असे म्हटले आहे. कॅनडाला मिनी पंजाब देखील म्हटले जते. भारत आणि कॅनडादरम्यान वाद अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. भारताचे कॅनडासोबत चांगले संबंध राहिले आहेत, याचमुळे पंजाबच्या लोकांनी स्थायिक होण्यासाठी कॅनडाची निवड केली. अनेक लोकांना तेथील नागरिकत्व मिळाले असून ते स्वत:च्या जीवनात पुढे गेले आहेत. दोन्ही देशांमधील बिघडत्या संबंधांमुळे अशा लोकांसाठी तणाव वाढला असल्याचे राम सिंह यांनी म्हटले आहे.