For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरपीडी कॉलेजसमोरील फूटपाथ धोकादायक

10:57 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरपीडी कॉलेजसमोरील फूटपाथ धोकादायक
Advertisement

शोभेच्या विद्युत खांबांवरील दिव्यांची दयनीय अवस्था : पादचाऱ्यांसाठी दिवसा अन् रात्रीही फूटपाथ कुचकामी

Advertisement

बेळगाव : आरपीडी कॉलेज रोडच्या बाजूने नागरिक तसेच विद्यार्थ्यांना चालत जाण्यासाठी बनविलेल्या फूटपाथची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाली असून, फूटपाथच्या एकाच बाजूला बसविलेल्या शोभेच्या विद्युत खांबांवरील दिव्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी दिवसा आणि रात्रीदेखील हा फूटपाथ धोकादायक ठरला आहे. आरपीडी चौक ते वडगाव कॉर्नरपर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे ऊंदीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक तसेच दोन्ही बाजूला नागरिक व विद्यार्थ्यांना सोयीस्कर दुभाजक व विद्युत पुरवठा करणारे दिवे लावण्यात आले होते. पण गेल्या काही वर्षांपासून या आरपीडी-वडगाव रस्त्यावरील फूटपाथची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आरपीडी-वडगाव रस्ता बेळगावमधील उच्चभ्रू लोकवस्तीचा तसेच शैक्षणिक संस्थांच्या नामवंत महाविद्यालयांचा भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मुख्य रस्त्याचे ऊंदीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांना व नागरिकांना तसेच वाहनधारकांना सोयीस्कर अशा सुविधा या मार्गावर देण्याचा प्रयत्न झाला.

या परिसरात अनेक महाविद्यालये आहेत. तसेच वडगाव, जुने बेळगाव, भाग्यनगर तसेच परिसरातील हजारो लहान-लहान विद्यार्थी या रस्त्यावरून टिळकवाडी भागातील शाळांना रोज ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर प्रचंड प्रमाणात गर्दी असते. विद्यार्थी या रस्त्यावरून वेगाने वाहने चालवत असल्याने अनेक नागरिक अपघातात जखमी झाले आहेत. येथील फूटपाथचा उपयोग करावयाचा झाल्यास हे फूटपाथ जागोजागी आतून ढासळलेल्या अवस्थेत आहेत. त्यावर असलेले पेव्हर्सही खालून खचलेले आहेत. काही अधांतरी अवस्थेत आहेत. या फूटपाथवरून चालताना विद्यार्थी व नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. कारण या फूटपाथच्या खाली गटारी आहेत. त्यामुळे अकस्मात चालत जाताना एखाद्या ठिकाणी फूटपाथ कोसळल्यास सरळ गटारीत पडण्याची शक्मयता आहे.

Advertisement

दुसऱ्या बाजूला असलेल्या फूटपाथवरील काही ठिकाणी पेव्हर्सच गायब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील एकाच बाजूचा फूटपाथ जीव धोक्मयात घालून काही प्रमाणात वापरण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालणे म्हणजे जीव मुठीत धरून चालण्यासारखे आहे. या परिसरात अनेक बँका, सोसायट्या आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी ज्येष्ठ नागरिक, महिलांना या ठिकाणी दररोज यावे लागते. मात्र, या रस्त्यावरून कधी एखादे सुसाट वाहन वेगाने येऊन धडकेल आणि अपघात घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी कुचंबना होत असते. त्यामुळे फूटपाथ आणि रस्त्याच्या समस्या महानगरपालिकेने सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.

पथदीपांची दयनीय अवस्था 

आरपीडी कॉर्नरपासून वडगाव क्रॉसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथची बांधणी करण्यात आली आहे. वास्तविक या दोन्ही बाजूला असलेल्या फूटपाथवर चांगल्या प्रकाशाचे विद्युत दिवे बसविण्याची गरज होती. पण या रस्त्याच्या एकाच बाजूला नक्षीकाम असलेले खांब आणि त्यावर दिवे असे आकर्षक खांब बसविण्यात आले आहेत. मात्र, हे आकर्षक दिवे फक्त एकाच बाजूला आरपीडी कॉर्नरपासून ते गोगटे कॉलेज कम्पाऊंडपर्यंत बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूच्या फूटपाथवर दिवे नसल्याने गैरसोय होत आहे. आरपीडी विद्यालयाच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर बसविण्यात आलेल्या दिव्यांच्या खांबांची वाईट परिस्थिती पाहावयास मिळत आहे. काही खांबांवरील दिवेच गायब तर काही खांबांरील दिवे मोडकळीस आलेले आहेत. काही खांब वाकल्याचे पाहावयास मिळत आहे तर काही खांबांचा विद्युत प्रवाहच बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सायंकाळी अंधार पडल्यानंतर या फूटपाथवरून चालत जाणे धोक्मयाचे आहे.

Advertisement
Tags :

.