For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाऊल पडते...

06:32 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाऊल पडते
Advertisement

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 148 व्या तुकडीचा यंदाचा पदवीप्रदान तसेच दीक्षांत सोहळा ऐतिहासिकच म्हणावा लागेल. खरे तर दरवर्षी हा सोहळा होत असतो. त्यातील छात्रांचे प्रावीण्य, शिस्तबद्ध संचलन आणि लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती डोळ्यांचे पारणे फेडत असतात. परंतु, या वर्षीचा सोहळा म्हणजे एका नव्या दिशेचा प्रवासच म्हणावा लागेल. याला कारण म्हणजे महिलांनी टाकलेले पुढचे पाऊल होय. भारतीय सैन्य दलात एनडीएचे एक विशेष स्थान आहे. एकाच ठिकाणी हवाई, नौदल आणि लष्कराचे अधिकारी तयार करण्याच्या हेतूने 1949 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने आपल्या सात ते साडेसात दशकांच्या प्रवासात अनेक पराक्रमी आणि गुणवान अधिकारी देशाला दिले आहेत. परंतु, संस्थेमध्ये मुलींच्या प्रवेशाची तरतूद नव्हती. मात्र, 2022 मध्ये मुलींकरिताही एनडीएचे अवकाश खुले झाले आणि तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर 17 मुलींनीही सैन्यदलात अधिकारी म्हणून ऊजू होण्याचा टप्पा गाठला आहे. ही निश्चितच प्रेरणादायी बाब ठरावी. भारतीय महिला आज सर्वच क्षेत्रामध्ये पुऊषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. वैद्यकीय क्षेत्रापासून अवकाश संशोधनपर्यंत आणि शेतीपासून उद्योजगतापर्यंत सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला मुक्तपणे मुशाफिरी करताना दिसतात. भारतीय महिलांना पूर्वी सैन्यदलात प्रवेश नव्हता. तथापि, शरद पवार यांच्याकडे संरक्षणमंत्री असताना त्यांनी तीनही सैन्यदल प्रमुखांशी चर्चा करून महिलांच्या समावेशाचा निर्णय घेतला. खरे तर त्यावेळी महिलांच्या भरतीला अनेकांचा विरोध झाला. परंतु, पवार ठाम राहिल्याने महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळेच आज अनेक महिला तिन्ही दलामध्ये महत्त्वाच्या हुद्द्यांवर काम करीत आहेत. याशिवाय एनडीएमध्येही महिलांना एन्ट्री मिळाली असून, 17 महिला छात्रांच्या ऊपाने एका नव्या पर्वाची सुऊवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. या तुकडीतील श्रुती दक्ष हिचे यश नजरेत भरणारेच ठरावे. ती मूळची हरियाणाची. पण, दक्ष कुटुंब आता नोएडा येथे वास्तव्यास आहे. तिथेच तिचे शिक्षण झाले. तिचे वडील योगेशकुमार दक्ष सेवानिवृत्त विंग कमांडर आहेत. तर मोठी बहीण ही हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे घरातूनच तिला सैन्यदलात जाण्याचा वारसा मिळाल्याचे दिसते. 30 वर्षांपूर्वी तिचे वडीलदेखील ‘एनडीए’मधून उत्तीर्ण होऊन सैन्यदलात दाखल झाले होते. आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या छोट्या मुलीनेदेखील सशस्त्र सैन्यदलात प्रवेश केला, ही त्यांच्यासह सर्वांसाठीच अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे. श्रुती आता इंडियन मिलिट्री अकादमी (आयएमए) येथे पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे. श्रुतीने यावर व्यक्त केलेली भावना अधिक महत्त्वाची होय. माझे हे यश माझ्यासारख्या सशस्त्र सैन्य दलात येऊ पाहणाऱ्या मुलींना निश्चित प्रेरणा देईल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. श्रुती आणि तिच्या अन्य सहकारी 17 छात्रांनी आपण काय करू शकतो, हे समस्त भारतीयांना दाखवून दिले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशा अनेक मुली असतील, ज्यांना हे क्षेत्र खुणावत असेल. त्यांच्याकरिता सावित्रीच्या या लेकींची कामगिरी नक्कीच स्फूर्तीदायक ठरू शकते. याशिवाय एनडीएतील अन्य छात्रांनीही आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत एक मैलाचा दगड पार केला आहे. प्रिन्सकुमार कुशवाह, लकीकुमार, उदयवीरसिंह नेगी यांसारख्या छात्रांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मुख्य म्हणजे यातील बहुतेकांना या ना त्या माध्यमातून लष्करी वारसा वा पार्श्वभूमी लाभल्याचे दिसते. हे बघता मार्गदर्शन हा घटक किती महत्त्वाचा असतो, याची प्रचिती यावी. एकीकडे अशा प्रकारे आपली पुढची पिढी पुढे पाऊल टाकत असताना हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल ए. पी.  सिंग यांनी केलेली टिप्पणी गंभीर म्हणायला हवी. संरक्षणविषयक विविध प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याच्या बाबतीत अमर्याद दिरंगाई होत असल्याचे हवाई दल प्रमुखांनी म्हटले आहे. एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन दिले गेल्यानंतर ती वेळेत पूर्ण झाल्याचे आपल्या तरी स्मरणात नाही, असेही ते म्हणतात. देशाच्या दृष्टीने संरक्षण हा विषय सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. हे बघता अशा प्रकारचा कारभार वा मानसिकता म्हणजे पाऊल मागे टाकण्याचाच प्रकार होय. खरे तर संरक्षण प्रकल्प असतील किंवा साहित्य खरेदी असेल. यातील कुठल्याही विषयाच्या बाबतीत दिरंगाई होणे योग्य नाही. उलट त्याला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. ंपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप ‘ऑपरेशन सिंदूर’ संपले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील लोक आमच्याच कुटुंबाचे भाग आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पीओके ताब्यात घेऊच, अशी गर्जना केली आहे. देशाचे कोणतेही नेतृत्व हे देशाच्या सैन्यदलाच्या भरवशावरच संबंधित देशाला असा इशारा देत असते. त्यामुळे सैन्यदलाशी संबंधित कुठल्याही विषयात कदापि माघार घेता कामा नये. भारतीय लष्कराने वेळोवेळी आपला पराक्रम देशाला आणि जगाला दाखवून दिला आहे. पाकिस्तानसारख्या देशाला आपण तीन युद्धांमध्ये पराभूत केले असून, अन्य लढायांमध्येही त्यांच्यावर मात केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातूनही लष्कराने पाक व त्यांना आडून मदत करणाऱ्या ड्रॅगनचे मनसुबे उधळून लावले आहेत. अशा या बलशाली, पराक्रमी संरक्षण विभागाची ताकद आपल्याला भविष्यात आणखी वाढवायची आहे. म्हणूनच त्यांच्या मार्गातील सर्व प्रशासकीय अडथळे आपल्याला दूर करावे लागतील. त्याचबरोबर सैन्य दलाचे पाऊल अधिक सशक्तपणे आणि दमदारपणे पुढे पडण्यासाठी यंत्रणांना सिस्टिममध्ये सुधारणा कराव्या लागतील, हे नक्की.

Advertisement

Advertisement
Tags :

.