Sangali filtered water scam 'फिल्टर' च्या नावाखाली विनापरवाना पाणी विक्रीचा धंदा, अन्न व औषध प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
त. भा. प्रतिनिधी सांगली : नागरिकांच्या फिल्टर पिण्याच्या पाण्याची गैरसोय दुर करण्यासाठी जिल्ह्यात गावोगावी सुरू करण्यात आलेले विनापरवाना पाणी फिल्टर प्लँट अन्न व औषध प्रशासनाच्या आशीर्वादाने लोकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याची वस्तुस्थिती आहे.
१० आणि २० रुपयांना साधे आणि थंड पाण्याचे वितरण करणारे फिल्टर प्लँटमार्फत 'जिवघेण्या पाण्याचा धंदा' तेजीत आला आहे. जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्वच शहरात आणि गावांमध्ये फिल्टरचे पाणी विक्री करणारा व्यवसाय जोमाने थाटला आहे. शुध्द आणि थंड पाण्याचे वितरण अनेक वर्षापासुन गावोगावी होत असुन त्यासाठी ५, १० आणि २० रुपये आकारून पाणी दिले जाते. शिवाय मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचे फिल्टर प्लँट उभारले.
नागरिकांना ग्रामपंचायत, नगरपंचायत, पालिका, महापालिकांमार्फत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या शुध्दतेचा प्रश्न गंभीर आहे. सधन कुटुंबियांनी घरोघरी स्वखर्चाने पाण्याचे फिल्टर बसविले आहेत. परंतु ज्यांना फिल्टर प्लँट शक्य नाही, अशा मंडळींना १० रुपयांमध्ये वीस लिटर फिल्टरचे पाणी खरेदी करून तहान भागवावी लागते.
शुध्दतेसाठी नागरिकांकडून अशा फिल्टर प्लँटच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु हे होताना प्रत्यक्षात खरेच अशा फिल्टर प्लँटचे पाणी शुध्द आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. गावोगावी उभारलेले व्यवसायिक पाण्याचे फिल्टर अन्न व औषध प्रशासनाची परवानगी न घेता उभारल्याची वस्तुस्थिती आहे.
त्या फिल्टर प्लँटसाठी वापरले जाणारे पाणी निकषानुसार शुध्द आहे का? फिल्टर झालेले पाणी, त्या पाण्याची पीएच लेव्हल आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे काय याची कल्पना दस्तुरखुद्ध अशा फिल्टरचे पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना नाही. जिल्ह्यातील बहुतांश पाणी विक्रीचा व्यवसाय करणारे फिल्टर प्लँट स्वच्छतेसह अन्न औषध प्रशासनाच्या, मानांकनाचे पालन करत नाहीत. त्यामुळे स्वच्छ पाण्याचा बाजार करणारे फिल्टर प्लँट अस्वच्छ आहेत.
शहरात, गावोगावी पाणी फिल्टरचे प्लँट उभारून चारचाकी वाहनातून, टाक्यातुन पाण्याची विक्री घरोघरी, व्यवसायाच्या ठिकाणी जावुन केली जात आहे. त्यातुन अशा फिल्टर पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. विक्रीच्या फिल्टर पाण्याच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत अनेकांनी प्लँट चालक आरोग्याशी खेळ करत आहेत.
विशेष म्हणजे अशा फिल्टर-पाणी जार प्रकल्पांची अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी नसल्याची वस्तुस्थिती आहे. असे असलेतरी फिल्टर शुध्द पाण्याच्या नावाखाली जिवघेणा धंदा सर्रासपणे सुरू आहे. नियमानुसार पिण्याच्या पाण्याचे नियमित नमुने तपासणे, प्रयोगशाळा चाचणी करणे आणि गुणवत्ता अहवाल ठेवणे फिल्टर प्लँटला बंधनकारक असते. मात्र नोंदच नसताना बाजारातुन फिल्टर आणून व्यवसाय थाटणाऱ्यांनी प्रक्रिया करून थंड आणि साधे पाणी विकून लाखोंची उलाढाल चालविली आहे.
स्थानिक प्रशासनही निद्रीस्त
सांगली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन फक्त खाबुगिरीमुळे चर्चेत आलेला असताना भेसळीसह अन्य प्रश्नांकडे विभागाचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावोगावी सुरु असलेल्या फिल्टर पाणी विक्रीच्या धंद्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. शिवाय ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिकेनेही केलेलं दुर्लक्ष चिंताजनक आहे. फिल्टर प्लँटद्वारे पाणी विक्रीच्या धंद्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असताना त्याकडे होणारी डोळझाक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करत आहे.