For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News | कापसाळमध्ये कोरड्या नदीत जलसमृद्धीचा प्रवाह

03:32 PM May 20, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news   कापसाळमध्ये कोरड्या नदीत जलसमृद्धीचा प्रवाह
Advertisement

पक्का बंधाऱ्यामुळे नदीत वर्षभर पाणीसाठा निर्माण झाला

Advertisement

चिपळूण : दरवर्षी उन्हाळ्यात कोरडेठाक पडणाऱ्या कापसाळच्या नदीपात्राने यंदा समृद्धीचा नवा इतिहास रचला आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या पक्का बंधाऱ्यामुळे नदीत वर्षभर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या एका बंधाऱ्याने गावातील चित्र दोन्ही बदलून गेले आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात कोरडेठाक पडणारे नदीचे पात्र तुडुंब भरून गेले आहे. परिणामी नदी किनारी असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली आहे. कापसाळ हे चिपळूण शहराला लागून असलेले गुहागर विधानसभा क्षेत्रातील गाव.

Advertisement

शहरालगत असले तरी उन्हाळ्याच्या दिवसांत गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. गावात पाण्याचा उद्भव नसल्यामुळे पाण्याची वर्षानुवर्षाची समस्या. कामथे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले नदीचे पात्र धरणातील पाणी आटले की उन्हाळ्याच्या दिवसांत कोरडेठाक पडायचे.

हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार जाधव यांनी सातत्याने प्रयत्न केले. कळवंडेच्या धरणाखाली विहीर बांधली तरच गाव पाण्याने समृद्ध होईल, याची खात्री असल्याने त्यांनी या योजनेसाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी फक्त ग्रामपंचायतीचा ठराव आणि लागणारी कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. पण ग्रामपंचायतीने काही ठराव दिला नाही, त्यामुळे योजना बारगळली.

दरम्यान, कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हीटी आधारित योजना राबवावी म्हणून विधानसभेत संघर्ष केला आणि ३३ गावच्या योजनांसाठी तब्बल १०० कोटींची योजना मंजूर करून घेतली. त्यातही कापसाळ गावाचा समावेश त्यांनी करून घेतला. परंतु, गावाला पाण्याची गरज नाही. आम्हाला योजना नको, असं लेखी पत्र ग्रामपंचायतीने देऊन योजना नाकारली.

एकीकडे मंजूर करून आणलेल्या योजना नाकारण्याचे काम ठराविक लोकांकडून सुरु होते, तर दुसरीकडे गावातील ग्रामस्थ व महिला सतत येऊन पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी आमदार जाधव यांच्याकडे करत होते. त्यांनी यातून मार्ग काढताना नदीवर पक्का बंधारा बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.

Advertisement
Tags :

.