For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईशान्येचा प्रलय

06:27 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
ईशान्येचा प्रलय
Advertisement

ईशान्य भारतातील महाप्रलयाने आसाम, अऊणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमधील जनजीवन सध्या विस्कळित झाले आहे. या भागातील ढगफुटी व पूरस्थितीचा हजारो लोकांना फटका बसला असून, यामध्ये 35 ते 40 जणांचा बळी गेल्याचे दिसत आहे. हे बघता हा जलप्रलय हे ईशान्येतील रहिवाशांपुढील महासंकटच म्हणावे लागेल. निसर्गरम्य आणि नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध भूमी म्हणून ईशान्येकडे पाहिले जाते. अऊणाचल, सिक्कीमसह येथील राज्ये सेव्हन सिस्टर या नावाने ओळखली जातात. येथील नितांतसुंदर वातावरण, डोंगरदऱ्या व सृष्टीसौंदर्यामुळे पर्यटकांची पावले या भागाकडे कायम वळत असतात. पावसाळ्याच्या काळात येथील सौंदर्य अधिकच खुलते. मात्र,  मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या सर्वाला तडा गेल्याचे दिसत आहे. मणिपूर हे ईशान्येतील महत्त्वाचे राज्य. अलीकडे वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या या राज्याला सध्या पुराने विळखा घातल्याचे दिसते. मुसळधार पावसामुळे या राज्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून, त्यामध्ये साडे तीन ते चार हजार घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. राज्यात भूस्खलनाच्या तब्बल 74 घटना घडल्या असून, 20 हजार लोकांना या पुराचा प्रत्यक्ष फटका बसला आहे. हे पाहता पुराची तीव्रता लक्षात येते. इंफाळ ही मणिपूरची राजधानी. तेथे इंफाळ नदीने पुराची पातळी ओलांडल्यानंतर शहराच्या अनेक भागांत पाणी शिरल्याचे दिसून येते. अगदी नागरी वस्तीचा भागही त्यापासून वाचलेला नाही. त्यामुळे मणिपूर हे पाणीपूर झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. या पार्श्वभूमीवर या स्थितीला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी खासदार अंगोमचा बिमोल अकोइजम यांनी केली आहे. सध्याची परिस्थिती बघता मणिपूरसह सर्वच राज्यांमध्ये आपत्ती घोषित करणे आवश्यक वाटते. अऊणाचल प्रदेश म्हणजे उगवत्या सूर्याचा प्रदेश. तिथेही नद्यांनी ऊद्रावतार धारण केला असून, 23 जिल्ह्यांतील हजारभर लोकांना पुराची झळ बसली आहे. पूर व भूस्खलनात दहा जणांना प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे अऊणाचलमधील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यावरही यंत्रणांना लक्ष केंद्रित करावे लागेल. सिक्कीमला बसलेला तडाखाही जबरदस्त म्हटला पाहिजे. येथील छातेन येथील लष्करी छावणीजवळ भूस्खलन झाल्याने तीन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. हे पाहता मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. भारतीय सैनिक रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या उक्तीनुसार देशाच्या अंतर्गत भागासह सीमेवरच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता ते आपले कर्तव्य बजावतात. भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीत त्यांचा झालेला हा मृत्यू म्हणूनच चटका लावून जाणारा म्हणावा लागेल. दुसऱ्या बाजूला सिक्कीममधून जवळपास दीड ते दोन हजार पर्यटकांची सुटका करण्यात यंत्रणांना यश आल्याचेही सांगण्यात येत आहे. आणखी काही पर्यटक अद्यापही अडकले असून, त्यांच्या मुक्ततेकरिताही सुरक्षा यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच परिस्थिती पाहता पर्यटकांनीही काळजी घेणे आवश्यक होय. आसामने अनेकदा भयंकर पूर पाहिले आहेत. या राज्यातील 15 जिल्ह्यांतील पूरस्थितीही गंभीर आहे. यातील चार लाख नागरिक हे पूरग्रस्त असून, एक लाख लोकांना प्रत्यक्ष पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे अधिकाधिक निवारा केंद्रे व मदत छावण्या उभारणे व तिथपर्यंत मदत पोहोचवणे, या गोष्टींवर भर द्यावा लागेल. ईशान्येत ब्रह्मपुत्रा, तिस्ता या महत्त्वाच्या नद्या आहेत. पर्वतराजीने वेढलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होतच असते. तथापि, अलीकडच्या काळात पावसाचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. अनेक भागांत कमी वेळात अधिक मिमी पाऊस होतो. या ढगफुटीसदृश पावसामुळे पुराला पूरक स्थिती निर्माण होते. त्यात अतिक्रमणे, विकासकामे या पुराची तीव्रता वाढवतात. ईशान्येतही यापेक्षा वेगळे घडलेले नाही. पर्वतराजीला डॅमेज करण्याचे किंवा डोंगर साखळीला धक्का लावण्याचे काम येथेही होत आहे. विकासाचे लेबल लावून केलेली ही कामेच प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत ठरतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे पाहता भूस्खलनाच्या घटना या प्रामुख्याने मानवनिर्मितच म्हणाव्या लागतील. मागच्या काही वर्षांत केरळ, महाराष्ट्रापासून उत्तराखंडपर्यंत अनेक राज्यांमध्ये महाप्रलयाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यालाही निसर्गावरील आक्रमणच जबाबदार आहे, हे वेगळे सांगायला नको. परंतु, त्यातून आपण बोध घ्यायला तयार नाही. बेसुमार जंगलतोड, डोंगरफोड, सिमेंट काँक्रिटीकरणाबरोबच नैसर्गिक प्रवाह वळवणे, नद्यांवर अतिक्रमण करणे, यावर विकासाच्या नावाखाली भर दिला जात आहे. हे पाहता ईशान्येचा प्रलय ही धोक्याची घंटा म्हणता येईल. आसामला पूरमुक्त राज्य बनविण्याचे आश्वासन तेथील सत्ताधारी सरकारकडून देण्यात आले होते. परंतु, ही घोषणा म्हणजे केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरल्याचे दिसते. पोकळ वल्गना करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी कृतिशीलतेवर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर विरोधकांनीही ज्वलंत प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून त्यांच्याकडून जनहिताची कामे करून घेतली पाहिजेत. यंदा मान्सूनच्या पहिल्या पावसात पुणे, मुंबईसारख्या शहरांचे काय हाल झाले, ते आपण पाहिले. सध्या महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर भागात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पुढच्या टप्प्यात मान्सूनचे पुनरागमन अपेक्षित आहे. या वर्षी जूनमध्ये देशात तब्बल 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. सरासरीहून अधिक पाऊस होणार असेल, तर त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला नियोजन करायला हवे. आज ईशान्येत जे झाले, ते उद्या अन्यत्र घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पाहता कायम अलर्ट रहावे लागेल.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :

.