गोव्याला जाणारे विमान पोहोचले बेळगावला
बेळगाव : मुंबईहून गोव्याला जाणारे विमान मंगळवारी दुपारी बेळगाव विमानतळावर उतरविण्यात आले. गोवा येथे खराब हवामान असल्यामुळे हे विमान तातडीने बेळगावला उतरविण्यात आले. यामुळे गोव्याच्या प्रवाशांची काही काळासाठी गैरसोय झाली. मंगळवारी गोव्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे विमानांचे उड्डाण अथवा लँडींग करताना अडचणी येत होत्या. मुंबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर विमान उतरणार होते. परंतु ढगाळ वातावरणामुळे विमानाला धावपट्टी मिळाली नाही. बराच वेळ प्रयत्न करूनही धावपट्टी न मिळाल्याने हे विमान जवळच्या बेळगाव विमानतळाकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव विमानतळाशी संपर्क साधून विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. काही काळ हे विमान बेळगावमध्ये होते. त्यानंतर पुन्हा गोव्याच्या दिशेने रवाना झाले. तसेच पुणे-गोवा विमान हैदराबाद येथे नेण्यात आले. ढगाळ वातावरणाचा प्रवाशांना फटका बसला.