For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिकेटचे ‘पाटा’करण

06:01 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
क्रिकेटचे ‘पाटा’करण
Advertisement

गुवाहाटी येथील एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचे 405 धावांचे आव्हान लिलया पेलत भारताने मालिका जिंकली, ही समस्त भारतीयांसाठी आनंदाचीच बाब म्हणता येईल. परंतु, फलंदाजांसाठी नंदनवन ठरणाऱ्या अशा पाटा खेळपट्ट्या व बदलत्या नियमांमुळे क्रिकेट हा दिवसेंदिवस एकतर्फी खेळ बनत चालल्याचे दिसते. म्हणूनच गोलंदाजीला मिळणारे दुय्यमत्व व त्यातून खेळाचा होणारा विरस हा चिंतेचा विषय ठरतो.

Advertisement

क्रिकेट हा ‘जंटलमन गेम’ म्हणून ओळखला जातो. भारतासारख्या देशात क्रिकेटइतकी लोकप्रियता आज तरी दुसऱ्या कुठल्या खेळाला नाही. परंतु, टी-ट्वेंटी प्रारूप, त्याचा एकदिवसीय क्रिकेटवर झालेला परिणाम, बदलते नियम यामुळे क्रिकेटचा प्रवास सध्या वेगळ्या दिशेने सुरू आहे. भारतासह आशियातील खेळपट्ट्या व अन्य देशांतील खेळपट्ट्या यामध्ये निश्चितच फरक आहे. भारतासारख्या देशातील खेळपट्ट्या सुरुवातीला फलंदाजांनाच पोषक ठरतात. तर परदेशातील खेळपट्ट्यांवर फलंदाजी करताना अक्षरश: कस लागतो. मात्र, आता या खेळपट्ट्या प्रामुख्याने फलंदाजांकरिताच कशा साह्याभूत राहतील, अशा प्रकारे बनवण्याकडेच संबंधितांचा कल दिसतो. त्यात अलीकडच्या काळात गोलंदाजांवर बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे विशिष्ट चौकटीत राहूनच त्यांना गोलंदाजी करावी लागते. उलट फलंदाजांना मात्र मुक्तपणे फटकेबाजी करण्याचा अवकाश मिळतो. त्यातूनच मैदानावर अक्षरश: धावांचा पाऊस पडतो. दुसरीकडे गोलंदाजांना कोणतीही मदत मिळताना दिसत नाही. वास्तविक, कोणत्याही खेळात दोहोंना समान संधी असायला हवी. पण क्रिकेट आता समान संधीचा खेळ राहिलेला नाही. त्या अर्थी बदलते क्रिकेट गोलंदाजांकरिता अन्यायकारकच म्हणावे लागेल. भविष्यातही हाच ट्रेंड कायम राहिला, तर त्यातून गोलंदाज होण्याचे स्वप्न किती जण पाहतील आणि प्रत्यक्ष चेंडू हातात घेतील, हा प्रश्नच आहे. एकेकाळी व्र्रिकेटमध्ये 250 ते 300 धावा करणेही मुश्कील होते. भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात तब्बल 800 हून अधिक धावा कुटल्या गेल्या. वेस्ट इंडिजकडून तीन, तर भारताकडून एक द्विशतक व शतक नोंदवले गेले. कर्णधार शुभमन गिल याने या सामन्यात नाबाद 223 धावा टोलवल्या. त्याची ही खेळी संस्मरणीयच. परंतु, हा खेळ आज इतका वेगवान होत चालला आहे, की पुढच्या टप्प्यात एकदिवसीय सामन्यात एखाद्या संघाने 500 हून अधिक धावा केल्या, तरी आश्चर्य मानायचे कारण नसेल. वास्तविक, टी ट्वेंटी क्रिकेटमुळे खेळाडूंची मानसिकता बदलत चालली आहे. चेंडू केवळ सीमापार धाडणे, एवढाच जणू त्यांचा उद्देश उरला आहे. मुळात क्रिकेट हा अतिशय लाजवाब खेळ आहे. फलंदाजातील तंत्रशुद्धता, पदलालित्याबरोबरच दोन क्षेत्ररक्षकांमधून गॅप काढणे, एकेरी, दुहेरी धावांसाठीचा झगडा ही या खेळाची सौंदर्यस्थळे म्हणता येतील. गोलंदाजीबाबतीत बाउन्सर, रिव्हर स्वींग, आऊट स्वींग, ऑफ वा लेग स्पीन अशा आयुधांनी क्रिकेट अधिक रंगतदार होत गेले आहे. परंतु, हाणामारीच्या नादात क्रिकेटचा म्हणून जो नाद होता, तो आज हरवत चालल्याचे पहायला मिळते. भारतीय क्रिकेटला तर मोठी परंपरा राहिली आहे. गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील गावसकर, मोहम्मद अझरुद्दिन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली ते आत्ताच्या शुभमनपर्यंत अतिशय दर्जेदार आणि क्लासिकल बॅट्समन आपण पाहिले आहेत. गोलंदाज म्हणून कपिल देव, झहीर खान ते शमी, बुमराहपर्यंतचे गुणवान बॉलरने झंझावात काय असतो, हे आपल्या कामगिरीतून वेळोवेळी दाखवून दिले आहे. परंतु, बदलते नियम, खेळपट्ट्यांचे पाटाकरण आणि क्रिकेटच्या झटापटीत क्रिकेटमधील नजाकतीची, कलात्मकेतची परंपरा इतिहासजमा होते की काय, अशी भीती वाटते. याबाबत अनेक ज्येष्ठ खेळाडू व तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. म्हणूनच आयसीसीनेही क्रिकेटची या अतिरेकातून सुटका करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत. मुळात क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे फलंदाज, गोलंदाज कुणीही असो. कुणा एकाला त्यात झुकते माप नसावे. सर्वांना समसमानच संधी मिळायला हवी. त्याकरिता नवीन नियम तयार करावे लागले तरी ते केले पाहिजेतच. तरच ते न्यायोचित ठरेल. आता पुढचा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत आहे. तेथील खेळपट्ट्यांवर खेळताना कशी कसोटी लागते, हे सर्वच जाणतात. त्या तयारीऐवजी केवळ पाटा खेळपट्टीमध्ये भारताने रमू नये, इतकेच.

Advertisement
Advertisement

.