Vari Pandhrichi 2025: माउलींच्या सोहळ्यातील पहिला उभा रिंगण सोहळा
फलटण / प्रा.रमेश आढाव :
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तांची शिस्तबद्ध उभी रांग, माऊलींच्या अश्वाने घेतलेली दौड, दिंडीतील वारक्रयांच्या पायाने धरलेला ठेका, टाळ मृदूंगाच्या गजरात रंगलेल्या फुगड्या आणि हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत अंत्यंत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवरील पहिला उभा रिंगण सोहळा भक्तीरसाची उधळण करीत उत्साहात पार पडला.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दिनांक 27 रोजी दुपारी फलटण तालुक्यात आगमन झाले. दरम्यान तालुक्याच्या सरहद्दीवर कापडगाव येथे तालुक्याच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. लोणंद येथील एक दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केला. स्राया विठ्ठलभक्त वारक्रयांना वेध लागले होते ते पहिल्या उभ्या रिंगणाचे. पालखी सोहळ्यातील वारक्रयांची पाऊले तातडीने चांदोबाच्या लिंबकडे पडत होती. चांदोबाच्या लिंब येथे रिंगण लावल्यानंतर रथापुढील दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुज्रायांनी दौडत आणला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व माघारी आल्यानंतर सोहळा प्रमुखांनी आश्वास पुष्पहार घालून खारीक खोबरे खाण्यासाठी दिले. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आशीर्वाद आहे या भावनेतून अश्व ज्याठिकाणाहून गेला आहे त्या ठिकाणाची माती कपाळी लावण्यासाठी वारक्रयांची झुंबड उडाली होती. अशारितीने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण भावमय वातावरणात पार पडले.