सावंतवाडी पंचायत समितीची पहिली सभा ९ मार्चला
सभापती निश्चित, उपसभापतीपदावर राजकीय रंगत
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी पंचायत समितीची पहिली सभा सोमवार , ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती कार्यालयात होणार असून या सभेत सभापती व उपसभापती पदांची निवड होणार आहे. समितीची एकूण सदस्य संख्या १८ आहे.अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सभापती पद आरक्षित असल्याने तळवडे मतदारसंघातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या सुस्मिता जाधव यांची सभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची महायुती झाल्याने सभापतीपद शिवसेना शिंदे गटाकडे गेले आहे.
सदस्यसंख्येचे गणित
सावंतवाडी पंचायत समितीत शिवसेना शिंदे गटाचे ६, भाजपचे ६, अपक्ष ५ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा १ सदस्य निवडून आला आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या महायुतीनुसार उपसभापती पद भाजपकडे जाणे अपेक्षित आहे.
उपसभापतीपदासाठी कोण?
भाजपकडून उपसभापती पदासाठी मळगाव गणातील गौरव मुळीक, शेर्ले गणातील महेश धुरी आणि विलवडे गणातील प्रशांत सुकी यांची नावे चर्चेत आहेत. सभापतीपद आरक्षित असल्याने उपसभापतीपदी मराठा समाजाला संधी मिळण्याची शक्यता असून गौरव मुळीक यांचे नाव आघाडीवर मानले जाते. मात्र तळवडे व मळगाव हे दोन्ही मतदारसंघ एकाच जिल्हा परिषद क्षेत्रात येत असल्याने स्थानिक समीकरणांचा विचार झाल्यास महेश धुरी, प्रशांत सुकी तसेच मळेवाड मतदारसंघातील धनश्री मराठे यांचाही विचार होऊ शकतो.
अपक्षांची भूमिका निर्णायक?
अपक्ष सदस्यांपैकी पाच जण भाजपचे बंडखोर असून ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे भाजपचा उपसभापती होण्याची शक्यता अधिक बळकट आहे.तथापि, अपक्षांच्या साथीने शिवसेना शिंदे गटाने राजकीय खेळी केल्यास उपसभापती निवड रंगतदार होऊ शकते. मात्र सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार महायुतीचा मान राखत उपसभापतीपद भाजपकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे.९ मार्चच्या सभेत या राजकीय चर्चांना अधिकृत स्वरूप मिळणार असून सावंतवाडी तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येणार आहे.