सावंतवाडी पंचायत समितीची पहिली सभा संपन्न
उपसभापतींनी घेतली सभेची सूत्रे ; हक्काची इमारत नसल्याने बांधकाम विभागाच्या जागेत पहिली सभा
सावंतवाडी : प्रतिनिधी
तब्बल चार वर्षानंतर सावंतवाडी पंचायत समितीचे पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी पार पडली. उपसभापती गौरव मुळीक यांनीच सभेची सूत्रे हाती घेत सभा पुढे नेली. शिवसेनेच्या सभापती सुस्मिता जाधव या शांतपणे बसून होत्या. सर्व प्रश्नांची उत्तरे उपसभापती मुळीक यांनीच दिली. आजच्या सभेत सर्व सदस्य नवखे असल्यामुळे पंचायत समितीचा कारभार अभ्यासण्यातच सभेचा वेळ गेला. पंचायत समितीची पहिली सभा जणू कोंडवाड्यातच घेतल्या गतच झाली. पंचायत समितीची जुनी इमारत निर्लेखित झाल्यानंतर नवीन इमारतीचा प्रस्ताव गेली कित्येक वर्ष धूळखात आहे. त्यामुळे पंचायत समितीची सभा घेण्यासाठी सभागृह उपलब्ध नसल्याने पहिली सभा कित्येक वर्षानंतर घेण्यात आली खरी पण सत्ताधारी शिवसेना भाजपला बांधकाम विभागाच्या छोट्याशा जागेत कोंडवाड्यात जसा एखादा वर्ग भरावा त्याप्रमाणे बसावे लागले.सभेला काही मोजक्याच सदस्यांनी प्रश्न -उत्तरे दिली. बाकी इतर सर्व सदस्य चिडीचूप होते. सभापती श्रीमती जाधव यांची ही पहिली सभा असल्याने त्या गुपचूपपणे सर्व कारभार पाहत होत्या .उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सदस्य उदय पारिपत्ये यांनी मराठी शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करा असे सूचित केले .यावर उपसभापती मुळीक यांनी थेट लवकरच बैठक घेतली जाईल असे स्पष्ट केले. तर जल सिंचन योजनेच्या बाबतीत सरपंच ,पंचायत समिती सदस्य, अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल असेही मुळीक यांनी स्पष्ट केले .जानेवारी महिन्यात उत्तर भारतीय 23 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती सभागृहात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.जलसिंचनची कामे निधी अभावी बंद आहेत अशी बाबही स्पष्ट करण्यात आली.आजच्या सभेत सदस्य प्रथमेश सावंत यांनी.सांगेली ,धवडकी रस्ता रुंदीकरण सुरु असलेले काम लवकर पूर्ण करा असे सुचित केले यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम सुरू असल्याची बोलवण केली. खर तर हे काम कुठल्या योजनेतून सुरू आहे याची माहिती बांधकाम अधिकाऱ्यांना नाही ही बाब निदर्शनास आली.जागा अपुरी आहे त्यामुळे जिल्हा परिषदकडे आपण मागणी करू असे सभापतींच्या परवानगीने आपण सूचित करतो असे उपसभापती मुळीक यांनी स्पष्ट केल. प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेऊ असे मुळीक यांनी स्पष्ट केले. आजच्या बैठकीत प्राजक्ता केळुसकर,महेश धुरी, शरद धाऊस्कर , धनश्री मराठे , सदाशिव राणे, प्रथमेश सावंत यांनी विषय मांडले.