‘डेमोन कॉलनी 3’चा फर्स्ट लुक सादर
तमिळ चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित हॉरर-थ्रिलर फ्रेंचाइजी ‘डेमोन कॉलनी’ स्वत:च्या नव्या भागासह प्रेक्षकांना घाबरविण्यास तयार आहे. डेमोन कॉलनी 3 चा फर्स्ट लुक समोर येताच चित्रपटवरून लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पोस्टरमध्ये भय, रहस्य आणि अंधाराची झलक दिसून येते, यावेळी कहाणी पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक वळण घेणार असल्याचे यातून स्पष्ट होते.
या चित्रपटासोबत पुन्हा एकदा अरुल्निथी स्वत:च्या लोकप्रिय व्यक्तिरेखेत परतत आहेत. पहिल्या दोन भागांमध्ये ज्या रहस्यमय जग आणि शापित घटनांनी प्रेक्षकांना बांधून ठेवले होते, तिसऱ्या भागात तीच कहाणी आणखी पुढे जाताना दिसून येणार आहे. दिग्दर्शक अजय ज्ञानमुथु यांनी या फ्रेंचाइजीला केवळ भयापुरती मर्यादित ठेवलेले नाही, तर यात मनोवैज्ञानिक तणाव आणि रहस्याचे असे जाळे विणले आहे, ज्याने डेमोन कॉलनीला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
‘द एंड इज टू फार’ अशा टॅगलाइनसह पोस्टर शेअर करण्यात आले आहे. मागील चित्रपटांमध्ये सुरू असलेला अंधाराचा खेळ अद्याप संपलेला नाही असे संकेत ही टॅगलाइन देते. पूर्वीच्या भागांमध्ये ज्या अलौकिक शक्ती आणि शापाचा सामना व्यक्तिरेखांनी केला होता, त्यांचा प्रभाव अद्याप कायम असून यावेळी संघर्ष आणखी भयावह होणार आहे.