For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिलाच धडा व्यसनमुक्तीचा!

06:49 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिलाच धडा व्यसनमुक्तीचा
Advertisement

पोलीस खात्याकडून मुख्याध्यापक-क्रीडाशिक्षकांची बैठक

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शुक्रवार दि. 31 मेपासून शाळा सुरू झाल्या आहेत. माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अमलीपदार्थांचे दुष्परिणाम व गुन्हेगारीविषयी जागृती करण्यासाठी बेळगाव पोलिसांनी पाऊल उचलले आहे. शनिवारी बेळगाव परिसरातील मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisement

गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या पुढाकारातून केएलई संस्थेच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात हा जागृती कार्यक्रम झाला. बेळगाव शहर व उपनगरांतील विविध माध्यमिक विद्यालयांचे 150 हून अधिक मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक या बैठकीला उपस्थित होते.

बीईओ लिलावती हिरेमठ, प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे जयकुमार हेब्बळ्ळी आदींसह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रकरणात अल्पवयीन मुले अडकत आहेत, ही धक्कादायक बाब आहे. तितकीच ती धोकादायकही आहे. याबरोबरच अमलीपदार्थांच्या सेवनामुळे त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात, याविषयी प्रत्येक शाळेत जागृती करण्याची गरज पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.

या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील सुजाण नागरिक आहेत. त्यांचे जीवन उज्ज्वल बनविण्यासाठी त्यांना व्यसनापासून व गुन्हेगारीपासून अलिप्त ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवावे. कोणत्या शाळेच्या आवारात अमलीपदार्थांची विक्री सुरू आहे का? याविषयी माहिती द्यावी. शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशा सूचना पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केल्या.

Advertisement
Tags :

.