पहिलीवहिली हरित हायड्रोजन रेल्वे
भारतीय रेल्वे आगामी काळामध्ये हायड्रोजन इंधनावर आधारीत पहिल्यावहिल्या रेल्वेची प्राथमिक चाचणी करणार असून या चाचणीला कितपत यश मिळते, हे पहावे लागणार आहे. हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिने विविध देशांकडून विविध पावले उचलली जात आहेत. यामध्ये आता भारतही आपली भूमिका मांडण्यासाठी पुढे आला आहे. हायड्रोजन रेल्वेच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपक्रमात भारताचा वाटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या नियोजित चाचणीला यश मिळाल्यास हायड्रोजनवर रेल्वे चालविणारा भारत हा जगातला पाचवा देश बनणार आहे. पहिल्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे.
चेन्नईतील इंटीग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये या रेल्वेची निर्मिती करण्यात आली असून हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वे प्रतितासाला 140 कि.मी.चा वेग घेवू शकणार आहे. या संदर्भातली पहिली चाचणी हरियाणातील जिंद ते सोनिपत या मार्गावर होणार आहे. हा मार्ग 90 कि.मी. चा आहे. हायड्रोजनवर आधारीत रेल्वे डिझेल इंजिनवर चालणाऱ्या रेल्वेपेक्षा 60 टक्के कमी आवाज करते. या रेल्वेची रचना रिसर्च, डिझाईन अॅण्ड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) यांनी केलेली असून ही प्रक्रिया करण्यासाठी सर्व त्या नियमांचे पालन केले गेले आहे. या रेल्वेची अंतिम चाचणी पुढील वर्षी पहिल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये केली जाणार असल्याचेही भारतीय रेल्वेकडून सांगण्यात येते. आधुनिक वैशिष्ट्यांसह ही रेल्वे रचली गेली आहे.
हायड्रोजनवर आधारीत जवळपास 35 रेल्वे भारतीय रेल्वे ट्रॅकवर उतरवण्याची योजना भारतीय रेल्वेची असणार आहे. या रेल्वेचे एकंदर सर्व काम पूर्ण झाले असून ती आता चाचणीसाठी सज्ज झाली आहे. वरील मार्गावर या हरित रेल्वेची चाचणी कशी काय होते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या रचना केलेल्या पहिल्यावहिल्या हायड्रोजन रेल्वेमध्ये 8 बोगी असणार असून त्यातून 2 हजार 638 प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. सुरुवातीला 110 कि.मी. प्रतितास या वेगाने ही रेल्वे धावणार असून यातील तीन बोगी हायड्रोजन सिलिंडर आणि त्यासंबंधीत बॅटरी व इतर साहित्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
हायड्रोजनवर आधारीत रेल्वेत पाण्याचा वापर करावा लागणार आहे. हायड्रोजन रेल्वे चालविण्यासाठी प्रति तासाला 40 हजार लीटर इतके पाणी लागणार असल्याची माहिती मिळते आहे. या शिवायच्या इतर पर्यायांचा शोधही भारतीय रेल्वे करत आहे. डिझेल किंवा कोळशावर चालणाऱ्या रेल्वेला हायड्रोजन रेल्वेचा पर्याय उत्तम ठरणार आहे. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये हायड्रोजन रेल्वेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. साधारणपणे एका रेल्वेला 80 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून भविष्यकाळामध्ये यामध्ये कपातही होऊ शकते, असे म्हटले जात आहे. हायड्रोजनवर आधारीत रेल्वे बिगर इलेक्ट्रीक मार्गावर सहजपणे धावू शकणार आहे. जिंद ते सोनीपत हा रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेने निवडण्यामागे या मार्गावर आधुनिक पायाभूत सुविधा चांगल्यापैकी असल्याचे सांगितले जाते. रेल्वेची कार्यक्षमता, सुरक्षितता व इतर पैलुंची चाचपणी पहिल्या चाचणी प्रक्रियेदरम्यान केली जाणार आहे.
इंग्लंड हा देश सुद्धा हायड्रोजन आधारीत रेल्वे निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेत असून 2040 पर्यंत त्यांच्या रेल्वे कार्यरत होणार आहेत. फ्रान्स देखील या रेल्वे 2025 मध्ये सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्नरत आहे. हायड्रोजन रेल्वेच्या बाबतीत पाहता चीन हा देश आशियातला पहिलावहिला व जगातील दुसरा मोठा देश आहे. जर्मनी हा देश हायड्रोजन रेल्वेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. सप्टेंबर 2022 मध्ये हायड्रोजन रेल्वेचा शुभारंभ आपल्या देशात जर्मनीने केला आहे. चीनमधील हायड्रोजन रेल्वेचा वेग तासाला 160 कि.मी. इतका आहे. यांची ही रेल्वे बिगर इंधनावर 600 कि.मी.चा प्रवास करते. जर्मनी, फ्रान्स, स्विडन आणि चीननंतर भारताने हायड्रोजन रेल्वे चालविण्यात यश मिळविले तर भारत जगातील पाचवा मोठा देश ठरेल. डिझेलच्या तुलनेमध्ये ही रेल्वे कमी प्रदूषण करते. हायड्रोजन रेल्वेमध्ये यश मिळविल्यास भारताला 2030 पर्यंत शुन्य कार्बनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वेचा हा उपक्रम बराच हातभार लावू शकणार आहे. विविध देशांमध्ये तयार करण्यात आलेल्या हायड्रोजन रेल्वेंची शक्ती ही 1000 हॉर्स पॉवरची आहे तर भारत यापुढे जाऊन सध्याला 1200 हॉर्सपॉवर शक्तीबाबत अभ्यास करत आहे. वंदे भारतच्या माध्यमातून अलीकडेच भारतीय रेल्वेने स्वत:ला सिद्ध केलेले असून विविध शहरांमध्ये या रेल्वे सोयीची मागणी वाढते आहे. तसेच सुरु केलेल्या मार्गावर वंदे भारतला प्रतिसादही उत्तम लाभतो आहे. त्या तुलनेत आता हरित अशी हायड्रोजन रेल्वे प्रत्यक्षात साकारत असून तिच्या पहिल्या चाचणीवर साऱ्यांचे लक्ष असणार आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्याबाबतचे हायड्रोजन रेल्वे निर्मितीचे पाऊल इतर देशांना आगामी काळात प्रेरक ठरणार आहे, हे निश्चित.