Satara : पिंगळी खांडसरी चौकात माण तालुक्यातील पहिला उड्डाणपुल साकारतोय
पिंगळी चौकातील बॉटलनेक दूर
by विठ्ठल काटकर
कुकुरुछवाड : पिंगळी (ता. माण) येथील अहिल्यानगर-सांगली मार्गावरील खांडसरी चौक एक बॉटलनेक चौक बनत असून या चौकात माण तालुक्यातील पहिला उड्डाणपुल साकारतोय. त्यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर ते सांगली हा महामार्ग माण व खटाव तालुक्यातून जात आहे. याच मार्गावर पिंगळी येथे जुना खांडसरी चौक आहे.
हा चौक तसा सातारा लातूर महामार्गावर आहे. सातारा लातूर रस्त्याचे काम पूर्ण होत असताना अलीकडे या चौकात अपघाताचे प्रमाण खूप वाढले होते व त्यामध्ये अनेकांचा जीव गेला होता तर अनेकजण जायबंदी झाले होते. दहिवडी- मायणी रस्त्यावरील खांडसरी चौक म्हणजे मृत्यूचा सापळा अशी चर्चा होऊ लागली होती. मात्र आता नव्याने होत असलेला अहिल्यानगर- सांगली महामार्ग याच चौकातून जात आहे. या महामार्ग वरील खांडसरी चौक हा महत्वाचा टप्पा होता जिथं सातत्याने असुरक्षित बाहतूक व अपघाताचे प्रमाण मोठे होते.
आता या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम होत असल्याने या महामार्गवरून जाणारी लांब पल्ल्याची वाहतूक विनसायास पुढे जाईल. अहिल्यानगर-सांगली हा महामार्ग माण खटावची भाग्यरेषा ठरत असून या पुलामुळे दहिवडी पिंगळी, गोंदवले, सातारा, मायणी या परिसरातील अंतर्गत वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान होईल आणि ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेला फायदा होणार आहे. व अनेकांचे जीव वाचणार आहेत. माण खटावमधील पहिलाच उड्डाणपुल असल्यामुळे या महामार्गच्या आधुनिकीकरणाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे.