पहिल्या महिला चालकांने घेतले हातात ‘स्टेअरींग’
मलकापूर-कोल्हापूर-मलकापूर या मार्गावर पहिली ट्रीप
कोल्हापूर
एसटी महामंडळाकडे राज्यातील इतर आगारामध्ये महिला चालक आहेत. कोल्हापूर आगारामध्ये प्रथमच महिला चालकाची नुकतीच नियुक्ती केली आहे. या महिला चालकाने मलकापूर आगारातून रविवारपासून कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यामधील पहिला महिला चालक ठरल्या आहेत.
सरोज महिपती हांडे (रा. सुपात्रे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांना कोल्हापूर विभागात पहिली एसटी महिला चालक होण्याचा बहुमान मिळवला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना विभाग नियंत्रकांनी निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले होते. त्यांची ऑर्डर मलकापूर आगारात चालक म्हणून काढली होती.
हांडे कोल्हापूर विभागासाठी सरळसेवा भरती 2019 अंतर्गत लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या अर्हतेची छाननी मूळ प्रमाणपत्रावरुन कार्यालयामार्फत करण्यात आली. त्यांनी वाहन चालक तथा वाहक म्हणून प्रशिक्षण, परिक्षासह सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्या मलकापूर आगारामध्ये त्यांची रोजंदारीवर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली आहे. रविवारी त्यांचे कोल्हापूरसह मलकापूर आगारात स्वागत करण्यात आले. मलकापूर-कोल्हापूर-मलकापूर अशी पहिली ट्रीपही त्यांनी केली. प्रथमच महिला एसटी चालवत असल्याचे पाहून प्रवाशांनीही आश्चर्य व्यक्त केले.