कोल्हापुरातले पहिले चर्च
160 वर्षाच्या इतिहासाचे साक्षीदार
कोल्हापूर सुधाकर काशीद
कोल्हापूर शहर खूप छोटं होतं तेव्हाची ही एक घडामोड. शहर छोटं म्हणजे ते एका दगडी तटबंदीच्या आत होतं आणि ही तटबंदी बिंदू चौक, शिवाजी पुतळा, गंगावेस, तटाची तालीम वरूणतीर्थ, खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी ते पुन्हा बिंदू चौक एवढ्यातच मर्यादेत होती. आणि या तटबंदीत त्यावेळचे शहर दाटीवाटीने वसले होते. म्हणजेच शिवाजी पुतळ्dयाच्या पुढे शहरच नव्हते. अशा परिस्थितीत 1852 साली एक ख्रिश्चन मिशनरी कोल्हापुरात आले. आणि त्यांनी शिवाजी पुतळ्dयाच्या पुढे म्हणजे आता महापालिका इमारत आहे. त्याच्यालगत गवताळ जागा होती, तेथे शेड मारले. तेथे ते उपासना करू लागले आणि या शेडचेच रूपांतर पुढे चर्चमध्ये झाले. आता महापालिकेच्या मागील बाजूस जे चर्च आहे ते कोल्हापुरातले पहिले चर्च. जे 1857 साली बांधले गेले. वायल्डर मेमोरियल चर्च असे त्याचे नाव आहे.
आज 167 वर्षे झाली. या चर्चमधूनच ख्रिश्चन संस्कृतीची कोल्हापुरात सुरुवात झाली. दोन दिवसांनी ख्रिसमस आहे. कोल्हापुरात गेली 167 वर्षे कोल्हापूरच्या समाजजीवनाशी ख्रिश्चनबांधव समरस झाले आहेत. पण त्याची कोल्हापुरातली मुळे या चर्चमध्येच आहेत. आजही हे चर्च आहे. एकेकाळी गवताळ भागात उभे केलेले हे चर्च आता पूर्ण म्हणजे पूर्ण रहदारी आणि वर्दळीच्या घेऱ्यात आहे. त्याचा मूळ ढाचा कायम आहे. रविवारी प्रार्थनेचे सूर त्यातून उमटत असतात. पण वर्दळीमुळे ते कानावर क्वचितच पडत असतात. पण पापाच्या तिकटीकडून माळकर तिकटीकडे जाताना उजव्या हाताला वायल्डर मेमोरियल चर्च ही अक्षरे रोज कोल्हापूरकरांच्या नजरेस येत असतात.
हे वायल्डर म्हणजे डॉ. रॉयल गोल्ड वायल्डर. ते धर्मप्रसारासाठी 4 डिसेंबर 1852 ला कोल्हापुरात आले. कोल्हापुरात ख्रिश्चन हा प्रकारच त्या काळच्या परिस्थितीत मानवणारा नव्हता. कोल्हापुरात ब्रिटीश अधिकारी होते. पण त्यांचा वावर रेसिडेन्सीपुरता मर्यादित होता. ही रेसिडेन्सी म्हणजे आत्ताचा ताराबाई पार्क, नागाळा पार्कचा परिसर. त्यांचे सारे व्यवहार त्या परिसरातच होते. पण धर्मप्रसारासाठी डॉ. वायल्डर यांचे आगमन झाल्यामुळे थोडा विरोध झाला. त्यांना काही काळ तंबूत राहावे लागले. काही काळ ते मिलिटरी कॅम्पसमध्ये राहिले. त्यांनी आत्ताची महापालिका व त्यावेळच्या त्या गवताळ परिसरात जागा विकत घेऊन दोन शेड उभ्या केल्या. शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. शेडच्या जागी पक्के बांधकाम सुरू केले. पॉलिटिकल एजंटकडे अर्ज करून सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मिशन कंपाऊंंडसाठी जागा मिळवला.r तेथे ‘मॉर्निंग साईट’ म्हणून बंगला बांधला.
पण कोल्हापुरात 1857 साली उठाव झाला. त्या काळात अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांनी काही काळासाठी कोल्हापूर सोडावे लागले. हे शुरविरांचे बंड ताकदीने थोडे कमी पडले. त्याच काळात वायल्डर देखील परत गेले व 1861 मध्ये परत आले. पण त्यावेळी त्यांनी बांधलेली जागा दुसऱ्याच कोणीतरी विकत घेतली होती. वायल्डरनी याबाबत तक्रारी केल्या. पण त्याचा उपयोग न झाल्याने त्यांनी त्या जागेशेजारीच पुन्हा दुसरी जागा विकत घेतली व चर्च, उपासना मंदिर बांधले. कोल्हापूर संस्थांननेही त्यांना त्यावेळी आधार दिला. तत्कालीन संस्थानिक बाबासाहेब महाराजांनी त्यांना खूप मदत केली. 1863 साली कोल्हापुरात 32 प्रौढ व 19 मुले असा 51 जणांचा ख्रिस्ती समाज होता व तो पुढे वाढत गेला. 1875 साली वायल्डर अमेरिकेस परत गेले. त्यानंतर या चर्चमध्ये उपासनेचे काम सुरू राहिले. शहर वाढू लागल्यानंतर मूळ शहराभोवतालची तटबंदी पाडली गेली. वस्ती हळूहळू वाढू लागली. दुसरे मोठे चर्च न्यू शाहूपुरी परिसरात बांधले गेले. त्याचे नावही वायल्डर मेमोरियल चर्च असेच राहिले. तेथे मोठे सोहळे होऊ लागले. मूळ महापालिकेजवळचे जुने चर्च आपले अस्तित्व छोट्या-छोट्या कार्यक्रमांतून टिकवून राहिले आणि कोल्हापूरच्या समाजजीवनाचा एक कायमचा घटक बनून गेले.
शैक्षणिक कार्य
या चर्चच्या कार्यक्षेत्रात एस्तर पॅटर्न ही मुलींची शाळा उभी राहिली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या जागेतील ही शाळा म्हणजे त्यावेळी भारतातील फक्त मुलींची दुसरी शाळा म्हणून ती ओळखली जात होती. डॉ. आनंदीबाई जोशी याच शाळेत शिकल्या. राजघराण्यातील अनेक मुलीही या शाळेत शिकत होत्या. आजही या शाळेची सुंदर इमारत उभी आहे. पटसंख्या कमी आहे. पण तत्कालीन इतिहासाची साक्षीदार म्हणून ही शाळा आपली वेगळी ओळख टिकवून आहे.