बोगदा दुर्घटनेतील पहिला मृतदेह सोळाव्या दिवशी सापडला
अजूनही सात जणांचा शोध सुरूच : तेलंगणातील दुर्घटना
► वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणा बोगदा दुर्घटनेच्या 16 व्या दिवशी बचाव पथकाला पहिला मृतदेह सापडला आहे. सदर मृतदेह मशीनमध्ये अडकलेल्या स्थितीत असल्याचे सांगण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मशीन कापण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 7 मार्च रोजी श्वानपथकाला बोगद्यात नेण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या सुगाव्यानुसार खोदाई केली असता पहिला मृतदेह सापडल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले. राज्याचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रे•ाr यांनी घटनास्थळी भेट देत मदतकार्याचा आढावा घेत पथकांना योग्य निर्देश दिले.
मदत व बचावकार्यादरम्यान मशीनमध्ये अडकलेल्या मृतदेहाचे फक्त हात दिसत होते. स्निफर डॉगना एका विशिष्ट ठिकाणी तीव्र वास येत असल्याचे आढळले. तिथे किमान दोन ते तीन कामगार अडकले असावेत अशी शक्यता आहे. पण सध्या एका मृतदेहाचा मागमूस सापडला आहे.
बचावकार्याला गती देण्यासाठी रोबोट्सचाही वापर केला जात आहे. 525 कामगार मजुरांच्या शोधात गुंतले आहेत. राज्यातील नागरकुरनूल येथील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगद्याचा एक भाग 22 फेब्रुवारी रोजी कोसळला होता. या दुर्घटनेनंतर आतील भागात सेवेत व्यग्र असणारे 8 कामगार अडकले होते. या दुर्घटनेला आता पंधरवडा उलटून गेला असून कामगारांच्या बचावाची शक्यता खूपच कमी आहे. परंतु बचाव पथकांकडून शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत.