कुंभमेळ्यातील प्रथम ‘अमृतस्नान’ संपन्न
साडेतीन कोटी भाविकांकडून अमृतस्नान : महिलांचाही प्रचंड प्रमाणात सहभाग, आखाडा प्रमुखांचे पारंपरिक गंगास्नान
वृत्तसंस्था / प्रयागराज
मकरसंक्रांतीनिमित्त प्रयागराज येथील महाकुंभ समारोहातील प्रथम ‘अमृतस्नाना’त अडीच कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला आहे. मंगळवारी हा या महाकुंभातील प्रथम अमृतस्नानाचा कार्यक्रम पार पडला. कडाक्याची थंडी असतानाही या कार्यक्रमाला भारतातून आणि जगभरातून आलेल्या भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. प्रशासनाने व्यवस्थाही अतिशय चोख ठेवली होती.
प्रयागराजच्या संगमावर या कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून या कुंभपर्वाला प्रारंभ करण्यात आला. प्रथमदिनी एक कोटीहून अधिक लोकांनी गंगास्नान केले. मंगळवारी मकरसंक्रांतीदिनी भाविकांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याचे दिसून आले. मकरसंक्रांतीदिवशी सूर्य उगविण्यापूर्वीपासूनच प्रचंड संख्येने भाविक संगम परिसरातील विविध घाटांवर गंगेत डुबकी घेण्यासाठी सज्ज होते. संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत भाविकांनी संगमावर स्नान करण्याची संधी साधली. केवळ 12 तासांच्या कालावधीत 3.5 कोटीहून अधिक भाविकांनी अमृतस्नान केले आहे.
आकाशातून पुष्पवर्षाव
भाविकांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकारने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची योजना केली होती. कोट्यावधी भाविकांवर अशा प्रकारे पृष्पवृष्टी करण्यात आली. त्यामुळे सारा संगम परिसर गुलाबपुष्पांच्या पाकळ्यांनी न्हाऊन निघाल्याचे दृष्य दिसत होते. कुंभ परिसरातील सर्व घाटांवर आणि आखाड्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. गुलाबपुष्पांसह अन्य विविध पुष्पांचाही समावेश वृष्टीसाठी करण्यात आला होता. भाविकांनी या योजनेची प्रशंसा केली आहे.
‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’
गंगास्नान करताना भाविकांनी केलेल्या ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’ अशा जयजयकारामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भविकांचा उत्साह अवर्णनीय होता. इतक्या मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असूनही सर्व कार्यक्रम यथासांग आणि सुरक्षिपणे पार पडला. प्रशासनाने उत्कृष्ट व्यवस्था ठेवल्याने भाविकांना विनासायास गंगास्नान करता आले. भाविकांनीही नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केल्याचे दिसून आले. मंगळवारी दोन प्रहरांच्या नंतर भाविकांची संख्या अधिकच वाढली होती. या महाकुंभमेळ्यात एकंदर 45 कोटी भाविक समाविष्ट होतील असे अनुमान आहे. कुंभ 79 दिवस चालणार आहे.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था
उत्तर प्रदेश सरकारने कुंभपर्वणीनिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. 60 हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सुरक्षा व्यवस्थेसाठी करण्यात आला आहे. महाकुंभामध्ये आपल्या नातेवाईकांपासून संपर्क तुटलेल्यांना साहाय्य करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच वैद्यकीय उपचारांची व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात आहे. जसजशी ही कुंभपर्वणी पुढे जाईल, तशी परिस्थितीनुसार आणखी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती प्रयागराजच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
श्रद्धा, एकात्मतेचा महासंगम
ही महाकुंभ पर्वणी श्रद्धा आणि एकात्मता यांचा महासंगम आहे. भारताच्या प्रत्येक राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशातून कोट्यावधींच्या संख्येने हिंदू भाविक जात आणि इतर भेदाभेद विसरुन कुंभपर्वणी साधत आहेत. राष्ट्रीय सांस्कृतिक आणि धार्मिक एकात्मतेचे हे महाप्रचंड दर्शन आहे, अशी प्रतिक्रिया कित्येक उपस्थित भाविकांनी व्यक्त केली आहे. यावेळी विदेशांमधून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे, अशी माहिती पुंभ व्यवस्थापनाने पत्रकारांना दिली. यावेळी या महाकुंभ पर्वणीत भाविकांच्या संख्येचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मागे टाकले जातील, अशी शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षेसह त्यांचा आहार आणि इतर आवश्यकतांचा विचार करुन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
आखाडा प्रमुखांचे स्नान
मकरसंक्रांतीच्या अमृतस्नानासाठी मोठ्या संख्येने विविध आखाड्यांमधील साधूसंतही या पर्वणीत सहभागी झाले आहेत. संगमावर त्यांच्यासाठी विशेष योजना करण्यात आली आहे. प्रत्येक आखाड्याच्या प्रमुखांना आणि साधूंना त्यांच्या प्रथेप्रमाणे अनुष्ठान करता यावे, अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. अमृतस्नानाप्रमाणे आखाड्यांच्या सदस्यांनी येथे त्यांची पारंपरिक अनुष्ठानेही केली.
नागा साधूंचे शस्त्रकौशल्य
यावेळच्या महाकुंभात नागा साधू अधिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी शक्यता आहे. मकरसंक्रांतीनिमित्तही लक्षावधी नागा साधूंनी स्नान करुन अनुष्ठाने केली. या साधूंनी केवळ त्यांच्या आध्यामिक श्रद्धचेच नव्हे, तर त्यांच्या पराक्रमाचे आणि युद्धकौशल्याचेही दर्शन घडविल्याने दर्शक आवाक् झाले होते. या साधूंनी पारंपरिक शस्त्रास्त्रे आणि आयुधांचा उपयोग कसा केला जातो, याचे प्रात्यक्षिकच सादर केले. त्यांचे शस्त्रकौशल्य पाहून दर्शक आ़श्चर्याने थक्क झाले होते.
महाकुंभातील मकरसक्रांत...
ड सर्व भेद विसरुन कोट्यावधी भाविक महाकुंभात अद्भूत उत्साहात समाविष्ट
ड प्रचंड संख्या असूनही भविकांकडून नियम आणि शिस्तीचे काटेकोर पालन
ड यावेळच्या महाकुंभपर्वणीत होणार 45 कोटी भाविकांच्या संख्येचा महाविक्रम