युरोपातला आगडोंब
सौम्य उन्हाळा, आल्हाददायक हवामान आणि समशीतोष्ण वातावरणासाठी ओळखला जाणारा युरोप खंड सध्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेमध्ये होरपळून निघत आहे. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, स्पेन, डेन्मार्क, इटली, स्वित्झर्लंड अशा अनेक देशांमध्ये तापमानाने दशकानुदशकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. युरोपातील हा आगडोंब म्हणजे धोक्याचाच इशारा म्हटला पाहिजे.
युरोपातील अनेकविध देश हे तेथील निसर्गसौंदर्य व मनमोहक वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, त्याच रमणीय युरोपला उष्णतेच्या झळांनी काळवंडून टाकल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळते. काही शहरांमध्ये कमाल तापमान 45 अंश स sल्सिअसपर्यंत पोहोचले असून, रस्ते वितळल्याचे किंवा रेल्वे ऊळ वाकल्याचे सांगितले जाते. हे अभूतपूर्वच आणि भयंकरच म्हटले पाहिजे. फ्रान्स हा युरोपातील एक प्रमुख देश. या देशात 24 जूनपासून तब्बल एक हजार जणांचा उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात सापडल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून, बहुतेकांचा मृत्यू घरातच झाल्याचे बोलले जाते. उष्णतेचा फटका केवळ श्रमाची कामे करणाऱ्यांना किंवा बाहेर पडणाऱ्यांना बसतो, हा समज येथे खोटा ठरलेला दिसतो. ही विशेष चिंताजनक बाब होय. ब्रिटनमध्ये तर सलग तीन दिवस ‘रेड वॉर्निंग’ जारी करण्याची वेळ यावी, यातच सारे आले. तेथील ऊग्णालयांमध्ये उष्माघात आणि श्वसनविकारांच्या ऊग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, मागच्या पाच दशकांतला यंदाचा जून हा सर्वाधिक उष्ण महिना ठरला असल्याचे दिसून येते. परिणामी येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत ठरल्याचे दिसते. स्पेनमध्ये विक्रमी तापमानामुळे शेकडो मृत्यू झाले, तर वणव्यांनी मोठ्या प्रदेशाला वेढा घातला. जर्मनी आणि डेन्मार्कसारख्या थंड हवामानाच्या देशांमध्येही इतिहासातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे हवामान बदलाचे संकट आता केवळ उष्ण कटिबंधापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते संपूर्ण जगाला समान तीव्रतेने ग्रासत असल्याचेच यातून अधोरेखित होते. अर्थात या परिस्थितीमागील प्रमुख कारण जागतिक तापमानवाढ वा ग्लोबल वार्मिंग हेच आहे, हे वेगळे सांगायला नको. औद्योगिक क्रांतीनंतर कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांचा अतिरेकी वापर झाला. त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि इतर हरितगृह वायू वातावरणात साचले. या वायूंमुळे पृथ्वीवरील उष्णता बाहेर निघू शकत नाही आणि तापमान सातत्याने वाढत जाते. युरोप याच चक्रातून जात आहे. याशिवाय बेसुमार जंगलतोड, झपाट्याने होणारे नागरीकरण, काँक्रिटीकरण, हरित क्षेत्रात झालेली घट आणि हवामानाच्या नैसर्गिक चक्रांमधील बदल याचाही वातावरणावर परिणाम होत आहे. ‘वर्ल्ड वेदर
अॅट्रिब्युशन’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात युरोपातील विक्रमी उष्णता आणि आर्द्रता हवामान बदलाशिवाय निर्माण होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. पाच दशकांपूर्व अशा प्रकारची उष्णतेची लाट येणे अशक्य होती. परंतु, आता ही शक्यता 200 पटीने वाढली असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. तर हवामान बदलाच्या संकटाकडे तातडीने पावले उचलण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाल्याचे मत संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्ष आंद्रे कोरिया डो लागो यांनी व्यक्त केले आहे. हे पाहता याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मागच्या काही वर्षांत एकूणच जगातील तापमानाचा ट्रेंड बदलला आहे. भारतासह अनेक देशांना ढगफुटी, अतिवृष्टी यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागले. तर यंदा आशियाई देशांवर दुष्काळ वा अवर्षणाचे सावट दिसते. या सगळ्यामागे हवामान बदल हाच घटक आहे. त्यामुळे युरोपच्या संकटातून आता धडा घेण्याची वेळ आली आहे.
पॅरिसच्या हवामान परिषदेत याविषयावर सविस्तर चर्चा झाली आणि त्याबाबत दिशाही ठरवण्यात आली. पण, प्रत्यक्षात त्यादृष्टीने गांभीर्याने पावले पडली नाहीत. हाच बेफिकीर दृष्टिकोन कायम ठेवला, तर जग भस्मसात व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून युरोपच्या आपत्तीतून तरी जगाने शहाणे व्हावे.