आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात नोकरभरतीत दिसणार घट
टीमलिज संस्थेच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ बेंगळूर
माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी उद्योग कंपन्या आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1.55 लाख नव्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देतील. या संदर्भातला अंदाज टीमलिज या संस्थेच्या अहवालामध्ये मांडण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये आयटी उद्योगाने जवळपास 2.3 लाख जणांना नोकरी उपलब्ध करुन दिली होती. त्या तुलनेत यंदा मात्र नोकर भरती काहीशी कमीच राहणार असल्याचे टीमलिज यांनी म्हटले आहे.
कौशल्य विकासाचा अभाव या कारणास्तव यंदा नोकर भरतीचे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी राहणार आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये आयटी व आयटीशी संबंधीत क्षेत्रांमध्ये 1.55 लाख नव्या उमेदवारांना (फ्रेशर्स) नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आयटी क्षेत्रात जागतिक स्तरासह देशातही म्हणावा तसा व्यवसायात उत्साह दिसत नाही. एकंदर अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी फक्त 45 टक्के उमेदवारच आयटी क्षेत्रामध्ये नोकरी करण्यास पात्र असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. आयटी क्षेत्र वगळता माध्यम आणि तंत्रज्ञान, रिटेल व्यवसाय तसेच ग्राहक व्यवसाय, आरोग्य क्षेत्र, अभियांत्रिकी संशोधन व विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये नव्या उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त होत आहे.