अॅशेस मालिकेतील अंतिम कसोटी आजपासून
वृत्तसंस्था/ सिडनी
विजयी ऑस्ट्रेलिया संघ आज रविवारी सिडनीमध्ये सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याने अॅशेस मालिका संपत असताना उस्मान ख्वाजाला निरोप देईल, तर इंग्लंड संघ आपली थोडीफार प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाच्या 3-1 अशा मालिकेतील आघाडीमुळे त्यांनी पुढील इंग्लंड दौऱ्यापर्यंत अॅशेस चषक आपल्याकडेच राहील हे निश्चित केले आहे. परंतु शुक्रवारी ख्वाजाने केलेल्या घोषणेने जाणीव करून दिली आहे की, 2027 पर्यंत त्यांचा संघ खूप वेगळा असू शकतो.
पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाने शुक्रवारी सांगितले की, सिडनी कसोटी हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. त्याच मैदानावर आणि त्याच प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध त्याने 2011 च्या सुऊवातीला कसोटी पदार्पण केले होते. स्थानिक क्रिकेट चाहते मात्र आपल्या तिशीतील खेळाडूंशिवाय संघाच्या दीर्घकालीन भवितव्यापेक्षा सिडनीच्या हवामानाबद्दल अधिक चिंतित असतील, ज्याने अलीकडच्या वर्षांत अनेक कसोटी सामन्यांमध्ये व्यत्यय आणला आहे.
रविवारी वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि सोमवारीही पावसाची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, अंतिम कसोटी पाचव्या दिवसापर्यंत जाऊ शकते. ही गोष्ट आणि एससीजीचे मैदान परंपरेनुसार कसोटीच्या उत्तरार्धात फिरकी गोलंदाजांना मदत करते, ही बाब ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फीसाठी दिलासादायक असेल. दुखापतग्रस्त नॅथन लायनचा बदली खेळाडू असलेल्या ऑफ स्पिनर मर्फीला मेलबर्न कसोटीसाठी संघात परत बोलावण्यात आले होते, परंतु चार वेगवान गोलंदाजांच्या आक्रमणाला प्राधान्य दिल्याने त्याला संघातून वगळण्यात आले. इंग्लंडने दोन दिवसांतच तो गोंधळात टाकणारा सामना जिंकला. त्यामुळे तीन सामने निराशाजनकपणे गमावल्यानंतर त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचा मारा काहीसा कमी झाला.

या मानहानीकारक पराभवाची चिरफाड इंग्लंडचा संघ मायदेशी परतल्यानंतरही बराच काळ सुरू राहील, परंतु सलामीवीर झॅक क्रॉली म्हणाला की, 4-1 च्या फरकाने पराभूत होण्याऐवजी 3-2 च्या फरकाने मालिका संपवणे फायदेशीर ठरेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या 12 खेळाडूंच्या संघात फिरकी गोलंदाज शोएब बशीर आणि वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स यांचा समावेश करण्यात आला आहे, तर गस अॅटकिन्सनला वगळण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ऑली पोपला पुन्हा एकदा वगळण्यात आले आहे.
रायफलधारी पोलिस घालतील गस्त, बाँडी किनाऱ्यावरील हल्ल्यानंतर खबरदारी
दरम्यान, शहरातील बाँडी बीचवरील दहशतवादी हल्ल्यानंतर वाढवलेल्या सुरक्षा उपायांचा भाग म्हणून ऑस्ट्रेलियातील क्रीडास्पर्धांमध्ये क्वचितच दिसणारे लांब पल्ल्याच्या रायफलींनी सज्ज असलेले पोलिस गस्त घालतानाचे चित्र सिडनीमध्ये सुरू होणाऱ्या अॅशेस क्रिकेट मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यादरम्यान दिसणार आहे. गणवेषधारी आणि घोडेस्वार पोलिसांसोबतच सार्वजनिक सुव्यवस्था आणि दंगल नियंत्रण पथकाचे अधिकारी सिडनी क्रिकेट मैदानावर होणाऱ्या आणि तिकिटे पूर्णपणे विकल्या गेलेल्या सामन्यावर लक्ष ठेवतील. बाँडी येथे हानुका उत्सवादरम्यान दोन बंदूकधाऱ्यांनी 15 लोकांची हत्या केली होती तसेच अनेकांना जखमी केले होते.