सप्ताहातील अंतिम सत्रही मजबुतीमध्ये
सेन्सेक्स 493 तर निफ्टी 134 अंकांनी मजबूत : नव्या महिन्याचा प्रारंभ सकारात्मक
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू सप्ताहातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारले आहेत. यावेळी नवीन महिना डिसेंबरची सुरुवात ही सकारात्मक झाल्याचे दिसून आले. यामध्ये सप्टेंबर तिमाहीमधील असणारी अपेक्षा व जीडीपी संदर्भातील आकडेवारीने बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त करुन दिल्याचे दिसून आले असून विदेशी बाजारातील मिळता जुळता कलही याला कारणीभूत ठरला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 493.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 67,481.19 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 134.75 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 20,267.90 वर स्थिरावला आहे.
नोव्हेंबर महिन्यात उत्पादन क्षेत्राचा पीएमआय हा मजबूत राहिल्याचा लाभ भारतीय बाजाराला शुक्रवारी झाला आहे. याअगोदरच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये हा पीएमआय मात्र काहीसा दबावात होता. ग्राहकांची वाढती मागणी आणि इनपुटची राहिलेली उपलब्धतेच्या कारणास्तव नोव्हेंबरमध्ये पीएमआय 55.5 ने वधारुन 56.0 वर राहिला आहे.
भारताकडे जगातील सर्वाधिक तेजी राहण्याचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेमधील तेजीचा कल, सरकारी खर्च आणि उत्पादनांमधील वाढता आलेख या कारणास्तव सप्टेंबर तिमाहीत जीडीपीच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक 7.6 टक्क्यांनी दर वधारला असल्याची नोंद केली आहे.
मुख्य कंपन्यांच्या कामगिरीमध्ये आयटीसी, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, बजाज फायनान्स, एशियन पेन्ट्स, टाटा स्टील आणि स्टेट बँक यांच्या समभागात मुख्यपणे तेजी राहिली होती. तर अन्य कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, टाटा मोर्ट्स, टायटन, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले होते. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थाच्याकडून गुंतवणूकदारांनी गुरुवारी 8,147.85 कोटी रुपयांच्या इक्विटीची खरेदी केल्याची माहिती आहे.