बाजाराचे अंतिम सत्र मजबुतीसह बंद
सेन्सेक्स 376 अंकांनी वधारला: वाहन व आयटी क्षेत्रांची चमक
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरणाचा फायदा भारतीय भांडवली बाजाराला चालू आठवड्यातील अंतिम दिवशी शुक्रवारी झाल्याचे दिसून आले. सलगच्या चौथ्या सत्रात तेजीचा माहोल राहिला होता. लार्सन अॅण्ड टुब्रो, इन्फोसिस आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग मजबूत राहिल्याने भारतीय बाजार तेजीत होता.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 376.26 अंकांनी वधारुन निर्देशांक 72,426.64 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 129.95 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 22,040.70 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये विप्रो कंपनीचे समभाग हे 4.79 टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग बाजारात तेजीत होते. यासह महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा मोर्ट्स, मारुती सुझुकी, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस, एफएमसीजी कंपनी नेस्ले इंडिया आणि इंडसइंड बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
स्कॉर्पियो आणि थार यासारख्या गाड्याची निर्मिती करणाऱ्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपनीचे समभाग हे शुक्रवारी जवळपास 5 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारत जात ते 52 आठवड्यांच्या उंचीवर पोहोचल्याचे दिसून आले. अन्य कंपन्यांमध्ये मात्र पॉवरग्रिड कॉर्प, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा याच्यासह दिवसभरात बजाज ऑटो आणि मारुती सुझुकीइंडियाच्या कामगिरीत उत्साहाचे वातावरण राहिले होते.
जागतिक स्थिती
आशियातील बाजारांमध्ये जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे वधारुन बंद झाले. चीनच्या बाजाराला सुट्टी होती. अमेरिकन शेअर बाजारात गुरुवारी तेजी राहिली होती.