‘तिघी’ चित्रपट 6 मार्चला झळकणार
चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीत नात्यांच्या हळुवार धाग्यांनी विणलेला एक हृदयसपशी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको यांचा ‘तिघी’ हा चित्रपट 6 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तीन दिग्गज अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
तिघी हा चित्रपट प्रामुख्याने आई आणि मुलींच्या नात्यातील अनोखी गुंतागुंत आणि न व्यक्त केलेल्या भावनांच्या प्रवासावर भाष्य करणार आहे. यात जीवनातील अनेक क्षण असे असतात, जिथे भावना मनात दडलेल्या राहतात. ‘तिघी’ ही कथा याच न सांगितलेल्या भावना, आठवणी आणि काही अंतर्मुख करणाऱ्या क्षणांवर आधारित आहे. या चित्रपटाचे मध्यवर्ती कथानक तिघींच्या जगण्यातलं चौथं पान उलगडते. या तीन महत्त्वपूर्ण महिलांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांचे बदलत्या काळातील भावनिक चढ-उतार आणि त्यांच्यातील खास नात्याचा सुंदर वेध दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय पाहता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे, निखिल महाजन, सुहृद गोडबोले अणि स्वप्नील भंगाळे यांनी केली आहे.