‘केनेडी’ चित्रपट 20 फेब्रुवारीला झळकणार
माथेफिरुच्या भूमिकेत राहुल भट्ट
अनुराग कश्यपचा चित्रपट ‘केनेडी’ भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. निर्मात्यांनी ओटीटी प्रदर्शनापूर्वी अॅक्शनने भरपूर ‘केनेडी’ चित्रपटाचा ट्रेलर जारी केला आहे. चित्रपटात राहुल भट्ट एका माथेफिरूच्या भूमिकेत आहे. राहुलने या चित्रपटात एका मारेकऱ्याची भूमिका साकारली आहे. ट्रेलरची सुरुवात राहुल भट्टकडून साकारण्यात आलेल्या व्यक्तिरेखेच्या परिचयाने होते. तो दिवसा टॅक्सी ड्रायव्हर आणि रात्री भाडोत्री मारेकरी म्हणून वावरत असतो.
या चित्रपटात राहुल भट्टसोबत सनी लियोनी दिसून येणार आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे. मोहित तकलकर, अभिलाष थपलियाल आणि मेघा वर्मन तसेच आमिर अजीज हे कलाकार यात दिसून येणार आहेत. हा चित्रपट सर्वप्रथम मे 2023 मध्ये कान चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला होता. यानंतर न्यूचॅटेल इंटरनॅशनल फँटास्टिक फिल्म फेस्टिव्हल आणि दक्षिण कोरियाच्या बुचियोन इंटरनॅशनल फँटास्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये तो दाखविण्यात आला होता.