‘केस नं. 73’ चित्रपट येतोय
प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे सुखदु:खच्या असंख्य मानवी भावभावना असतात. ज्या आपल्याला कधीच दिसत नाहीत आणि सोबत मुखवट्यामागे दडलेली अनेक रहस्यं असतात. या मुखवट्यामागचा खरा चेहरा समोर आला की आपणही चक्रावून जातो. अशीच एक चक्रावून टाकणारी कथा आगामी ‘केस नं. 73’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे... अशा टॅगलाइनसह या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. 73’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद आपटे यांनी केली आहे.
अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे असे कलाकार यात दिसून येणार आहेत. चित्रपटातील प्रत्येक प्रसंग एक नवं गूढ उलगडणारा असून प्रत्येक उत्तरामागे आणखी खोल प्रश्न उभे करणारा आहे. हा केवळ रहस्यमय चित्रपट नसून तर प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणारी कथा आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वत:चे वेगळे सत्य शोधेल असे मत दिग्दर्शक आपटे यांनी व्यक्त केले.
चित्रपटाची कथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांनी लिहिली आहे. तर मंदार चोळकर यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी अमेय मोहन कडू यांनी सांभाळली आहे.