‘आईच्या गावात मराठीत बोल’ चित्रपट येतोय
विनोदी धाटणीचा चित्रपट ‘आईच्या गावात मराठीत बोल’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यचे भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाचा नायक समर (ओमी वैद्य) परदेशात राहणारा एक खोडकर तरुण परिस्थितीच्या दबावामुळे विवाहासाठी सुयोग्य मराठी वधू शोधण्याच्या आशेने भारतात येत असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु या प्रवासात त्या अनेक आनंददायक आणि विलक्षण प्रसंगांना सामोरे जावे लागते. हा प्रवास त्याला प्रेम, कौटुंबिक मूल्ये अशा अनेक गोष्टींचा अनुभव मिळवून देत असल्याचे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाला अविनाश विश्वजीत यांचे संगीत लाभले आहे. स्वप्नील बांदोडकर, विश्वजीत जोशी, मनीष राजगिरे आणि रोहित राउत यांनी या गाण्यांना स्वत:चा आवाज दिला आहे. ओमी वैद्य आणि अमृता हर्डीकर यांनी कहाणी, संवाद लिहिले आहेत. ओमी वैद्यनेच दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली ओह. या चित्रपटात ओमी वैद्यसोबत संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, ईला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रूव दातार, सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.