For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्सव उदंड जाहला... विसर्जनाचे काय?

07:57 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्सव उदंड जाहला    विसर्जनाचे काय
Advertisement

उंच गणेशमूर्तींमुळे यावर्षी आव्हान वाढले : प्रशासनही हतबल

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

लाडक्या बाप्पावरील श्रद्धेमुळे बेळगावचा उत्सव उदंड झाला खरा, परंतु आता मात्र विसर्जनाची चिंता लागली आहे. यावर्षी मंडळांनी केलेल्या उंचच उंच गणेशमूर्तींमुळे विसर्जनाची समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेकडील विसर्जन कुंड यावर्षी अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडळांसोबत प्रशासनासाठीही गणेमूर्तींचे विसर्जन हे आव्हान ठरणार आहे.

Advertisement

मागील काही वर्षांत वाढलेली गणेशमूर्तींची उंची हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असली तरी आता या उंच गणेशमूर्तींचे विसर्जन कसे व कोठे करायचे हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. प्रशासनाकडे असलेल्या कपिलेश्वर येथील दोन व जक्कीनहोंड येथील एका विसर्जन तलावात मोठ्या मूर्तींचे विसर्जन होऊ शकते. परंतु या विसर्जन तलावांवरही मर्यादा असून त्यामुळे उर्वरीत मूर्ती विसर्जनाचे आव्हान असणार आहे. केवळ सार्वजनिकच नाही तर घरगुती गणेशमूर्तींचेही याच तलावांमध्ये विसर्जन केले जाते.

बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कपिलेश्वर येथील नवे व जुने विसर्जन तलाव, जक्कीनहोंड-गोवावेस येथील विसर्जन तलाव, अनगोळ, मजगाव, नाझर कॅम्प वडगाव, जुने बेळगाव, कणबर्गी, किल्ला तलाव अशा नऊ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार जुन्या कपिलेश्वर तलावात 110 सार्वजनिक गणेशमूर्ती, नवीन तलावात 180, जक्कीनहोंड येथे 150, अनगोळ येथे 9, जुने बेळगाव येथे 32, किल्ला येथे 30, कणबर्गी येथे 36 गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यासाठी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

यावर्षी सर्रास गणेशमूर्ती 18 ते 25 फुटांच्या आहेत. विसर्जन तलावांची खोली ही 20 ते 22 फुटांपर्यंत आहे. त्यामुळे विसर्जनावेळी मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशमूर्तींची उंची आणि विसर्जन तलाव यांचा ताळमेळ नसेल तर भविष्यात अजून मोठी समस्या निर्माण होऊ शकते. विसर्जनावेळी कोठेही मूर्तीचे पावित्र्य हरवले जाणार नाही, याची खबरदारीही प्रशासन तसेच मंडळांनाही घ्यावी लागणार आहे.

तलावांची खोली वाढविण्याची आवश्यकता

गणेशमूर्तींच्या वाढलेल्या मूर्तीमुळे यावर्षी विसर्जनाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून विसर्जन तलावांची खोली व रुंदी वाढवावी यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली आहे. यावर्षी सुरुवातीच्या काही मूर्तींचे योग्यरित्या विसर्जन होईल. त्यानंतर मात्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

- रमाकांत कोंडुस्कर, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळ

विसर्जनाची व्यवस्था

► विसर्जन तलावांची संख्या - 9

► कपिलेश्वर जुन्या तलावात विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्ती - 110

► कपिलेश्वर नव्या तलावात विसर्जन  होणाऱ्या गणेशमूर्ती - 180

► जक्कीनहोंड येथे विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्ती - 150

Advertisement
Tags :

.