For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्व उत्साहाचे... बाप्पांच्या आगमनाचे

03:13 PM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
पर्व उत्साहाचे    बाप्पांच्या आगमनाचे
Advertisement

शहर परिसरात खरेदीला उधाण : बाजारपेठेत गर्दी

Advertisement

प्रतिनिधी, बेळगाव

चौसष्ट कलांचा अधिपती... बुद्धीचा प्रणेता... विघ्नांचे हरण करणारा विघ्नहर्ता... त्याची नावे अनेक पण रुप एक. हे रुप इतरांपेक्षा वेगळे पण म्हणूनच ते अधिक लोभसवाणे. प्रत्येकाला तो ‘माझा देव’ वाटतो हे त्याचे वैशिष्ट्या. आज त्याचे आगमन होत आहे आणि त्याच्या स्वागतासाठी अवघी बेळगावनगरी चैतन्याने सळसळत आहे.

Advertisement

सार्वजनिक स्वरुपात होणारा गणेशोत्सव हा आनंदाचा, उत्साहाचा, परस्पर स्नेह वाढविण्याचा उत्सव. महत्त्वाचे म्हणजे हा उत्सव अनेकांना काम देणारा आणि उत्सवासाठी त्यांच्या हाती चार पैसे खुळखुळू देणारा. म्हणूनच साधारण 15 दिवस आधीपासून या उत्सवाची तयारी सुरू असल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळते. मूर्तिकारांनी मूर्ती बाजारपेठेत आणल्या की उत्सवाची चाहूल लागतेच. हळूहळू बाजारपेठ बहरू लागते. या आराध्यदैवताची पूजा तशी विशेषच. मुख्य म्हणजे त्याची पूजा निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी. एक तर पूर्वी माती किंवा शाडू यापासून मूर्ती केली जायची. हे दोन घटक निसर्गातूनच प्राप्त होतात. या देवतेला विविध प्रकारच्या पत्री, दुर्वा यांची विशेष आवड. त्याशिवाय माटोळी, कमळ, हेही त्याच्या पूजेसाठी आवश्यक. आज बदलत्या काळात हे सर्व साहित्य बाजारपेठेत विक्रीस येत असले तरी पूर्वी निसर्गामध्येच हे सहज उपलब्ध व्हायचे. म्हणजेच सजावट, चकचकाट यापेक्षाही पलीकडे गणपतीची पूजा ही एका अर्थाने निसर्गाचीच पूजा म्हणायला हरकत नाही.

काळ बदलला, वेळेचे गणित बदलले, चाकरमान्यांना महानगराचा रस्ता धरावा लागला, हे खरे असले तरी गणेशोत्सवासाठी ही सर्व मंडळी पुन्हा आपल्या गावी आवर्जुन येतात. वेळेची टंचाई लक्षात घेऊन विक्रेत्यांनी नोकरदारांची आणि एका अर्थाने सर्वांचीच सोय केली. गणेशाच्या पूजेसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व उपलब्ध करण्यामध्ये या विक्रेत्यांचे परिश्रम महत्त्वाचे. भलेही या साहित्याची विक्री होत असेल परंतु ते साहित्य मिळविणे आणि प्रवास करत ते शहरात आणून विकणे हे काही सोपे नाही. शुक्रवारी शहरातील सर्व ठिकाणच्या बाजारपेठेचे चित्र पार बदलले होते. गर्दी, वाहतूक कोंडी याच्या पलीकडे जाऊन जर आपण थोडा व्यापक विचार केला तर यावर्षी विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. परिणामी अर्थचक्र फिरत राहणार आहे. ही आश्वस्त करणारी बाब आहे. गेल्या चार दिवसांपासून बाजारपेठ गर्दीने फुलत आहे. परंतु गुरुवारी रात्रीपासूनच ही बाजारपेठ अखंड सुरू आहे.

या बाजारपेठेत काय नाही? प्रथम म्हणजे श्रीमूर्तींची विक्री सुरू आहे. त्याच्या सजावटीचे साहित्य लक्षवेधी ठरत आहे. उपनगरात किंवा नाईलाजास्तव ज्यांना घरातून बाहेर पडणे शक्य नाही त्यांच्यासाठी विक्रेते गल्लोगल्ली सजावट साहित्य घेऊन बाहेर फिरत आहेत. कृत्रिम फुले, तोरण, माळा याचे साहित्य त्यांच्या हाती अधिक प्रमाणात आहे. शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या गणपत गल्लीने तर यंदा विक्रीचा उच्चांक गाठला आहे. गल्लीच्या दोन्ही बाजूला विक्रेते आहेतच, परंतु मध्यभागीसुद्धा विक्रेत्यांची नवीन ओळ तयार झाली आहे. सजावटीचे साहित्य, नैवेद्य ठेवण्यासाठी मुलामा दिलेल्या चकाकत्या बुट्ट्या, प्लेटी, मुकुट, चौरंग शिवाय बस्कर, विविध फेटे आहेत. श्रीमूर्ती ठेवण्यासाठी असणारे चौरंग, पाट, गौरी बसविण्यासाठीचे विशिष्ट आकाराचे पाट, कांबळी खुटावर घेऊन विक्रेते बसले आहेत. त्यांच्याकडे खरेदीही सुरू आहे. त्याचबरोबर विविध रंगी पडदे घेऊन विक्रेते बसले आहेत.

फुल बाजाराला तर अक्षरश: उधाण आले आहे. नेहमीच्या शेवंतीच्या व गुलाबाच्या फुलांमध्ये उत्सवानिमित्त रंगीबेरंगी कमळे, झेंडू, अॅस्टर, डेलिया या फुलांची भर पडली आहे. फुलांच्या राशी आणि हारांचे समूह खरेदीसाठी नाही तरी पाहणाऱ्यालाही उल्हासित करत आहे. गुरुवारी रात्रीपासूनच फुलविक्रेते दाखल झाले आहेत. त्याचबरोबर आंब्याची पाने, दुर्वा, बेल यांची विक्रीही नोकरदारांसाठी सोयीची ठरली आहे. पाच फळांचे स्टॉल्स पावलापावलावर आहेत. त्याचबरोबर उत्सवाची रंगत वाढविण्यासाठी विविध रंग, रांगोळ्या व छाप प्रतीक्षेत आहेत. शहराच्या मुख्य बाजारपेठेबरोबरच अनगोळ, वडगाव, खासबाग, शहापूर व उपनगरातील बाजारपेठांचे चित्रही थोड्या फार फरकाने असेच आहे. आज घरोघरी श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना होईल आणि मंडळी प्रामुख्याने तरुणाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीच्या आगमनासाठी सज्ज होईल.

शहरात हरितालिका व्रत मोठ्या श्रद्धेने

शहर परिसरात शुक्रवारी हरितालिकेचे व्रत महिलांनी मोठ्या श्रद्धेने आचरण्यात आणले. दोन दिवसांपूर्वी हरितालिकेच्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या. या व्रतासाठी आवश्यक त्या साहित्याची खरेदीसुद्धा महिलांनी केली. मनजोगता पती मिळावा म्हणून कुमारिका आणि सौभाग्य अखंड रहावे यासाठी महिला हे व्रत करतात. हे व्रत प्रामुख्याने पार्वतीचे. विष्णूबरोबर ठरविलेला विवाह तिला अमान्य होता. त्यामुळे सखीच्या मदतीने ती रानात निघून गेली व तेथे तिने अहोरात्र शंकराची आराधना करून दीर्घकाळ तपस्या केली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकराने तिच्याबरोबर विवाह केला. तिला जसा मनासारखा सहचर मिळाला तसा मिळावा हा व्रताच्या मागचा हेतू होय. सकाळी शुर्चिभूत होऊन महिलांनी पाटावर हरितालिकेची मूर्ती ठेवली. तसेच शिवलिंग तयार करून ठेवले. फूल, पत्री घालूनच त्याची पूजा केली व मनापासून प्रार्थना करून रात्री जागर केला.

लाडक्या बाप्पासाठीचांदीच्या आभूषणांची खरेदी

बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी भक्तांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. बाजारात फळा-फुलांबरोबर सजावटीसाठी सोन्या-चांदीच्या आभूषणांची मागणी वाढली आहे. विशेषत: चांदीच्या विविध सजावटीच्या साहित्याला अधिक पसंती मिळाली. सोन्याच्या आभूषणांमध्ये मोदकाचा हार, दुर्वाहार, केवडा, तुळस वृंदावन, पानविडा, दिवा, पंचपाळ, किरीट, ताम्हण, पाट, त्रिशुळ, मूषक, विडा सुपारी, जाणव, आरती, समई, जास्वंदी फूल, सिल्व्हर कॉईन, गौरी तांब्या, केळीचे झाड, आदी आभूषणांची विक्री झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध सराफ दुकानांमध्ये सोन्या-चांदीच्या साहित्यांची मागणी वाढली होती. त्यामुळे उलाढालही अधिक झाली. विशेषत: बेळगावात स्थानिक ग्राहकांसह गोवा, चंदगड, खानापूर आणि इतर ठिकाणाहून ग्राहक दाखल झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून लक्ष्मी आणि चांदीच्या कॉईनची मागणी वाढली होती. औक्षण आणि पूजेसाठी हे कॉईन खरेदी केले जात होते. विशेषत: गणपतीसाठी मोदकाच्या तयार हाराची विक्रीही झाली. गणरायाचे शनिवारी घरोघरी उत्साहात आगमन होणार आहे. त्याबरोबर सार्वजनिक गणरायांची मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजारात चांदीच्या आभूषणांचा साज पहावयास मिळाला.

गणेशोत्सव मंडळांची वीजमीटरसाठी धडपड : शुक्रवारी रात्रीपर्यंत अर्ज भरणा : शहरात 370 मंडळे

र्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव काळासाठी हेस्कॉमकडून टेम्पररी मीटर पुरविला जातो. शुक्रवारी दुपारपर्यंत शहरातील 253 गणेशोत्सव मंडळांनी टेम्पररी मीटर कनेक्शनसाठी अर्ज केले आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत विद्युत कनेक्शन घेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. गणेशोत्सव काळात अकरा दिवसांसाठी हेस्कॉमकडून टेम्पररी वीजपुरवठा केला जातो. मंडळातील अध्यक्षांच्या नावे हे कनेक्शन दिले जाते. यापूर्वी मंदिर अथवा सभागृहात सार्वजनिक गणेशमूर्ती विराजमान होत होत्या. त्यामुळे विद्युत कनेक्शनची गरज भासत नव्हती. परंतु, गणेशोत्सवाला मोठे स्वरुप प्राप्त झाल्यानंतर गल्लीच्या मध्यवर्ती भागात मंडप घालून गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे. त्यामुळे मंडळांना वीजमीटरची आवश्यकता भासत होती.

बेळगाव शहरात 370 हून अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. यापैकी 330 मंडळे मोठी तर उर्वरित लहान मंडळे आहेत. उपनगरातील मंडळे स्वतंत्र मंडप घालून गणेशमूर्ती बसवण्याऐवजी मंदिर अथवा सभागृहात गणेशमूर्ती बसवतात. त्यामुळे दरवर्षी 300 ते 320 मंडळे हेस्कॉमकडून वीजपुरवठा घेत असतात. शहराच्या दक्षिण भागात सर्वाधिक गणेश मंडळे आहेत. यावर्षी शुक्रवारी दुपारपर्यंत 253 मंडळांनी वीजपुरवठ्यासाठी अर्ज केला. 320 मंडळे वीजपुरवठ्यासाठी अर्ज करतील, असा हेस्कॉमचा अंदाज आहे. त्यामुळे उर्वरित मंडळाचे पदाधिकारी वीजपुरवठा घेण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांची जमवाजमव करीत होते.

मंडळांच्या सूचनेप्रमाणे वीजवाहिन्यांची दुरुस्ती

मागील महिन्याभरापासून मंडळांच्या सूचनेप्रमाणे वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. काही ठिकाणी एरियल बंच केबल घालून वीजवाहिनीचे जंजाळ कमी करण्याचा प्रयत्न झाला. सध्या टेम्पररी वीजकनेक्शनसाठी शहरात 253 अर्ज हेस्कॉमकडे आले आहेत. उर्वरित मंडळे देखील रात्री उशिरापर्यंत अर्ज करीत होते.

एम. पी. सुतार (कार्यकारी अभियंता)

विद्युत कनेक्शन घेतलेल्या गणेश मंडळांची संख्या

  • शहरातील मध्यवर्ती भाग 84
  • शहराचा दक्षिण भाग 101
  • शहराचा उत्तर भाग 68

अमूल्य बुंदतर्फे निर्माल्यापासून खत तयार करण्याचा प्रयोग

कोणताही धार्मिक उत्सव असला की हार, फुले, पत्री यांची मागणी आणि वापर दोन्ही वाढते. परंतु देवपूजा झाल्यानंतर या निर्माल्याचे विसर्जन तलावामध्ये, विहिरीमध्ये केले जाते. किंवा ते सरळ बाहेर ठेवले जाते. स्वच्छता कर्मचाऱ्यांना ते निर्माल्य असल्याचा अंदाज येत नाही आणि हे निर्माल्य सरसकट कचरा वाहणाऱ्या गाड्यांमधून नेले जाते. सश्रद्ध मनाला ही बाब पटत नाही. परंतु यात कुणाचाही दोष नाही आणि पर्यायही नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन अमूल्य बुंदच्या संस्थापक आरती भंडारे यांनी एक अभिनव प्रयोग दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिर येथे राबविला. त्यांना मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. निर्माल्य सरसकट सर्वसामान्य कचऱ्यामधून जाऊ नये या हेतूने त्याच्यापासून खत उपलब्ध करण्याचा प्रयोग त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी स्वखर्चाने कपिलेश्वर मंदिराला फॅब्रिकेटेड मेटल मेश कंपोस्टर दिला आहे. शिवाय निर्माल्यापासून खत कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिकही दाखविले. या कंपोस्टरमध्ये हार आणि फुले तसेच पत्री घालून मंदिराच्या आवारातच असणाऱ्या पिंपळाच्या झाडाची व अन्य वनौषधी झाडांची पाने त्यामध्ये घालावीत. अधेमधे आंबट ताक मात्र घालावे. काही महिन्यातच यामधून उत्तम खत तयार होईल जे मंदिरातील झाडांसाठी वापरता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सुक्ष्म जीवाणू पावडरही उपलब्ध करून दिली.

उपक्रम यशस्वी झाल्यास इतर मंदिरांमध्येही अनुकरण : आरती भंडारे 

हा प्रयोग करण्याचे कारण म्हणजे देवपूजेनंतर बेल, पत्री, फुले बाजूला काढणाऱ्या व्यक्तीच्या हाताला अनेकदा काटे टोचले आहेत. नकळत ही बाब समजताच आपण त्यावर पर्याय म्हणून हा उपक्रम कपिलेश्वर मंदिरमध्ये सुरू केला आहे. जर तो यशस्वी झाला, निर्माल्यापासून खत निर्माण झाले तर इतर मंदिरांमध्ये सुद्धा त्याचे अनुकरण करता येईल.

यंदा गणेशोत्सव 10 ऐवजी 11 दिवसांचा : दाते

सोलापूर : आजपासून गणेशोत्सवाला सुऊवात होत असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र यावर्षी गणेशोत्सव दहा दिवसांऐवजी अकरा दिवसांचा असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. यंदा 7 सप्टेंबर रोजी शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4.50 ते दुपारी 1.51 पर्यंत आपल्या आणि गुऊजींच्या सोयीने घरातील गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार आहे. त्याकरिता विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विष्टि करण (भद्रा) तसेच राहू काल, इत्यादी वर्ज्य असेल. याकरिता शिवालिखित इत्यादी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतर करता येणार असल्याचेही दाते यांनी सांगितले.

काही जणांकडे गणेशोत्सव दीड दिवस, पाच, सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज गणेशाची सकाळ, संध्याकाळ पूजा, आरती अवश्य करावी. काही जणांकडे गौरी बरोबर गणपती विसर्जन करण्याची परंपरा असते. अशा वेळी तो दिवस व कोणताही वार, नक्षत्र असतानाही त्या दिवशी विसर्जन करता येते. काहीजण घरामध्ये गर्भवती महिला असताना गणपती विसर्जन न करण्याची पद्धत जोपासत आहेत, पण ते बरोबर नाही. घरामध्ये गर्भवती स्त्राr असताना गणपती विसर्जन करता येते. अशावेळी विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची असल्याचेही दाते यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे. तसेच ते पाण्यामध्ये करावे, असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. यावर्षी 17 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी असून हा गणेश स्थापनेपासून 11 वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन केले जाते. त्यांच्याकडे 11 दिवसांचा उत्सव असेल तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणे बारा वाजताच संपत असली तरीही त्यानंतरदेखील विसर्जन करता येणार असल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

गौरी पूजनासाठी काही महत्त्वाचे दिवस

10 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री 8 वाजून 04 मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येणार आहे. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ह असलेल्या दिवशी पूजन करावे. 11 सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने 12 सप्टेंबर रोजी गुऊवारी रात्री 9.53 पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.

परगावातील नागरिक बेळगावात दाखल,रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलले : एक्स्प्रेसला प्रचंड गर्दी

गणेशोत्सवाला नागरिक आपापल्या गावी परतू लागल्याने बेळगाव रेल्वेस्थानक शुक्रवारी सकाळपासून गजबजले होते. मुंबई, बेंगळूर, म्हैसूर, पुणे येथील प्रवासी रेल्वेने बेळगावमध्ये दाखल होत होते. त्यामुळे त्यांना नेण्यासाठी आलेल्यांची रेल्वेस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा रेल्वेस्टेशन परिसर गर्दीने फुलला होता. गणेशभक्तांच्या सोयीसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव मार्गावर दोन विशेष रेल्वेफेऱ्या सुरू केल्या होत्या. त्याचबरोबर इतर शहरांमधूनही दररोज धावणाऱ्या एक्स्प्रेस गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी गर्दीने भरल्या होत्या. सकाळी दाखल झालेली मुंबई-हुबळी एक्स्प्रेस प्रवाशांनी तुडुंब भरली होती. त्याचबरोबर चालुक्य एक्स्प्रेसलाही मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सुमारास बेंगळूरमधून येणाऱ्या एक्स्प्रेसदेखील पूर्ण क्षमतेने भरून आल्या. सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दीच गर्दी दिसून आली. प्लॅटफॉर्मदेखील प्रवाशांनी फुलले होते. केवळ बेळगावच नाही तर खानापूर, चंदगड परिसरातील प्रवासीही बेळगावमध्ये उतरून येथून आपापल्या गावी परतले. यामुळे रिक्षा तसेच बसलाही रेल्वेस्थानक परिसरात गर्दी झाली होती.

Advertisement
Tags :

.