आला बाप्पांचा सण... उभारू मंडप भारी
कडेगांव :
बुद्धी देवता गणपती बाप्पांचा उत्सव दि. २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू आहे. बाप्पांच्या उत्सवासाठी विविध परवानग्या काढण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धांदल उडाली आहे. मंडप उभारणीच्या कामांना वेग आला असून उत्सवाच्या नियोजनाच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. या सर्व माहोलामुळे जनमानसात बाप्पांच्या आगमनाची आतुरता वाढू लागली आहे.
सर्वसमावेशक सण अन् उत्सव म्हणून गणेशोत्सवाची ओळख आहे. त्यामुळेच बाप्पांच्या आगमनाची सर्वच गणेश भक्तांना आतुरता असते. यावर्षदिखील दि. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला बाप्पांचे आगमन होणार आहे. उत्सवास अवघे १८ दिवस उरले असल्याने उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक गणेश उत्सव हा कार्यकर्ता घडवणारा उत्सव आहे. या उत्सवाच्या तयारीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग असून त्यांच्यामार्फत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. त्यामुळे उत्सवाची पूर्व तयारी व नियोजन ही महत्त्वाची बाब ठरत आहे. घरगुती उत्सवाबरोबरच सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती ठरवण्यापासून मंडप, सजावट, विद्युत रोषणाई, देखावे आदींचे नियोजन ठरवण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे. तसेच बाप्पांचा उत्सव जवळ आल्याने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आवश्यक विविध परवानग्यांसाठी कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू झाली आहे.
- व्यावसायिकांकडे ओघ वाढला
जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच यावर्षी निर्बधमुक्त उत्सव साजरा होणार असल्याने सार्वजनिक मंडळांचा उत्साह दुणावला आहे.
गणेशोत्सवावर अनेक व्यावसायिकांचे अर्थकारण अवलंबून असून मंडप, सजावट, विद्युत रोषणाई, पूजा व प्रसाद साहित्य व्यावसायिकांकडे भक्तांसह सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. इतरांपेक्षा वेगळी अन् नाविन्यपूर्ण सजावटीकडे मंडळांचा कल राहत आहे.