ईश्वर कर्ता आहे हा भाव पक्का झाला की, ब्रह्मज्ञान होते
अध्याय तिसरा
सत्संग मिळणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. काही पूर्वपुण्याई असल्याशिवाय सत्संग लाभत नाही. ज्याला हा सत्संग लाभतो त्यानं पूर्ण श्रद्धेनं संतांच्या सांगण्यानुसार वर्तणूक ठेवली तर त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. त्याच्यातील दुर्गुण नाहीसे होऊन त्याचं जीवन आमूलाग्र बदलून जातं. इतकं की, सर्व भूतमात्र त्याच्या ठायी एकवटली आहेत असं त्याला वाटू लागतं. त्याच्या मनातला आपपर भाव गळून पडतो व तो सर्वत्र समभावाने पाहू लागतो. ह्या एका सद्गुणामुळे त्याचं रूपांतर ईश्वराच्या चालत्याबोलत्या रूपात म्हणजे सगुण रूपात होतं. बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत की, अशा भक्ताचं बाह्य आणि अंतर कर्म ज्ञानाग्नी क्षणात जाळून नष्ट करतो.
द्विविधान्यपि कर्माणि ज्ञानाग्निर्दहति क्षणात्
। प्रसिद्धो ग्निर्यथा सर्वं भस्मतां नयति क्षणात् ।। 45 ।।
अर्थ- ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नि क्षणात सर्वांचे भस्म करतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नि बाह्य व आंतर अशा दोन प्रकारच्या कर्मांचे क्षणात दहन करतो.
विवरण- अग्नी स्वत: दैदिप्यमान असतो. तो क्षणार्धात त्याच्या तावडीत सापडलेली वस्तू जाळून स्वत:सारखी करून टाकतो. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याचे सर्व दुर्गुण नाहीसे झालेले असतात. या ज्ञानाग्नीची दाहकता एव्हढी प्रचंड असते की, ती त्या तपसव्याची अंतर व बाह्य कर्मे क्षणात जाळून नष्ट करते. अंतर कर्मे म्हणजे संचित कर्मे होय. ही पूर्वी केलेली असतात पण अद्याप त्याचे फळ मिळालेले नसते. तर बाह्य कर्मे म्हणजे येथून पुढे हातून घडणारी कर्मे असे म्हणता येईल.
कर्मेच नष्ट झाल्यावर त्यापासून तयार होणाऱ्या पाप पुण्याचा हिशोब आपोआपच संपतो आणि चालू आयुष्यात, निरपेक्षतेनं कर्म करत असल्याने मोक्षपदी आरूढ झालेला साधक आयुष्य संपले की, ईश्वरात विलीन होतो. म्हणून मोक्ष मिळवण्यासाठी आत्मज्ञान होणं आवश्यक आहे. बाप्पा पुढं सांगतात की, या ज्ञानाची सर इतर कोणत्याही पवित्र गोष्टीस येत नाही.
ज्ञानसमतामेति पवित्रमितरन्नृप
। आत्मन्येवावगच्छन्ति योगात्कालेन योगिन ।। 46 ।।
अर्थ- हे राजा, इतर कोणतीही पवित्र वस्तु ज्ञानाच्या बरोबरीला येत नाही. योगाभ्यासामुळे योग्य वेळ आली की, योग्यांना स्वत:चे ठिकाणी आत्मज्ञान झाल्याची जाणीव होते.
विवरण- पूजा, अभिषेक, स्तोत्रपठण, यज्ञकर्म, दानधर्म इत्यादि अनेक पवित्र कर्मे आपणास माहीत आहेत पण ही कर्मे करत असताना माणसाचा ‘स्व’ जागृत असतो. म्हणजे हे मी केलं हा भाव त्याच्या मनात सतत येत असतो आणि ईश्वराला तर मनुष्याने स्व सोडावा असं वाटत असतं. असा स्व सोडणारा मनुष्य त्याचा अत्यंत लाडका होतो. जो मनुष्य कोणतीही अपेक्षा न करता वाट्याला आलेलं कर्म करत राहतो व करत असलेलं काम ईश्वराचं असून त्याच्यामार्फत ते तो करून घेत आहे हे जाणतो, तोच आत्मज्ञान मिळवण्यास पात्र ठरतो. ज्याला स्वत:च्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो त्यालाच आत्मज्ञान ही सगळ्यात पवित्र वस्तू प्राप्त होते. या पवित्र वस्तूची सर इतर पवित्र वस्तुंना येत नाही कारण हा ज्ञानाग्नी कर्मयोग्याने केलेले कर्म जाळून नष्ट करतो. कर्म नष्ट झाल्याने त्याची आपण काहीतरी केलंय ही भावनाच नष्ट होते. मुळात त्यानं कर्म करताना निरपेक्षतेनं केलेलं असतंच व कर्म जळून नष्ट झाल्याने भविष्यातही त्याला त्या बदल्यात कोणाकडून कोणतीही अपेक्षा रहात नाही. वर्तमानात व भविष्यातही संपूर्ण निरपेक्ष झाल्याने त्याला त्याच्या परिस्थितीत कोणताही बदल हवा असे वाटत नाही. या मन:स्थितीत राहणे म्हणजेच मोक्ष होय. ही स्थिती एकदा प्राप्त झाली की कधीही बदलत नाही.
क्रमश: