संत फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात साजरे
गोव्यासह देशभरातील भाविकांची गर्दी : शवप्रदर्शनामुळे फेस्तला विशेष महत्व
पणजी : लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी जुने गोवे येथील संत फ्रान्सिस झेवियरचे फेस्त साजरे करण्यात आले. त्यामुळे जुने गोवेत दिवसभर पवित्र आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. यंदा संत फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांच्या दशवार्षिक प्रदर्शनाचा 28वा आणि तब्बल 45 दिवस चालणारा सोहळाही गेल्या 23 नोव्हेंबरपासून सुरु आहे. त्यामुळे यंदाच्या फेस्तला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मंगळवारी पहाटे 3.45 वाजता पहिल्या मासचे (प्रार्थना) आयोजन करण्यात आले होते. बाँ जिझस बेसिलिकाच्या बाहेर हजारो भाविक, भक्तांच्या उपस्थितीमुळे मांडव भरून गेला होता. त्यानंतर पुन्हा पहाटे 5 व 6 वाजता झालेल्या प्रार्थनेलाही मोठ्या प्रमाणात भाविकांची हजेरी दिसून आली.
सकाळी सहा वाजता झालेल्या प्रार्थनेत 11 धर्मगुरूंनी हलता मास साजरा केला. प्रमुख धर्मगुरूंनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान संत फ्रान्सिस झेवियर यांची गोवा यात्रा एक अनियोजित मिशन म्हणून कशी सुरू झाली याचे हृदयस्पर्शी वर्णन केले. दरम्यान, पहाटे 5 वाजल्यापासूनच फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दिवसाचा उच्च बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हाय मास’चे अध्यक्षस्थान कार्डिनल लुईस अँटोनियो टॅगले, प्रो-प्रिफेक्ट ऑफ द डिकॅस्ट्री फॉर इव्हँजेलायझेशन यांनी केले. त्यांच्यासोबत गोव्याचे कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव, साहाय्यक बिशप सिमाव फर्नांडिस तसेच विविध ठिकाणचे अनेक धर्मगुरू प्रतिनिधित्व करत होते.
हलक्याशा पावसाचा शिडकावा
दरम्यान, फेंगल चक्रीवादळाचा गोव्यातही प्रभाव असून त्यातूनच मंगळवारी सकाळी जुने गोवेत हलका पाऊस पडला. मात्र त्या पावसाबद्दल कोणतीही गैर भावना व्यक्त न करता अनेकांनी त्याचा उल्लेख दैवी कृपेची सौम्य आठवण म्हणून केला. तसे पाहता से कॅथेड्रलकडे जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मार्गांवर उन्हापासून रक्षणासाठी पंडालांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कालच्या पावसाचा भाविकांवर फारस परिणाम झाला नाही. किंवा त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातही कोणताही व्यत्यय आला नाही.