अखंड स्थितीचा निर्धाऊ श्रीमंत योगी !
असामान्य बुद्धिमत्ता आणि अलौकिक असे कार्य आणि त्याही पलीकडे शौर्य दाखविणारा रयतेचा राजा म्हणून त्याचा उल्लेख आदराने करण्याची नेहमीच नितांत गरज असते, तो राजा म्हणजे सर्वांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला राजा शिवछत्रपती. आज 19 फेब्रुवारी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटात साजरी होते. छत्रपतींचे वर्णन संतश्रेष्ठ रामदास स्वामींनी निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधाऊ, अखंड स्थितीचा निर्धाऊ, श्रीमंत योगी ! अशा शब्दांत वर्णन केलेले आहे. अनेक थोर मंडळी अवघं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगली, त्यांचं आयुष्य फार कमी राहीलं, परंतु त्यांनी दुसऱ्यांसाठी केवळ त्यागच केला. छत्रपती शिवाजी महाराज ही एक त्यागमूर्ती होती. छत्रपतींचे नाव घेताच अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांचा सारा इतिहास विचारात घेतल्यानंतर आपल्या देशातील ही एक अद्वितीय अशी व्यक्ती जो राज्यकर्ता ज्याने कधीही आपल्या राज्याचे हित सोडून इतर गोष्टीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच घरामध्ये कौटुंबिक कलह निर्माण झाले त्याबाबत ते नेहमीच उद्विग्न होते. परंतु आधी लगीन कोंढाण्याचे म्हणणारे नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्यासारखे शूरवीर लढवय्ये सरदार होते. त्यांचा आदर्श देखील छत्रपती शिवाजी महाराज घेत होते. या राजाने दुसऱ्यांमधील चांगले गुण नेहमीच वेचण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांसाठी आदर्श निर्माण करणे हे आपले कर्तव्य समजले. म्हणूनच प्रभू श्रीरामांनंतर ज्या आदर्श राजाचा उल्लेख केला जातो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज संपूर्ण महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि गोव्यात देखील छत्रपतींचे अनेक ठिकाणी अश्वारूढ पुतळे आपल्याला पाहायला मिळतात. देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत असतो. संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांनी आपल्याला दिलेला संदेश लक्षात घेतला तर प्रत्येकजण महायुद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करील व शब्दातून जर कोणी सुधारत नसेल तर त्याला दुसऱ्या भाषेतून देखील सांगता येते आणि ती भाषा देखील समजत नसेल तर तलवारीच्या भाषेतून त्याला प्रत्युत्तर देणे योग्य ठरते. छत्रपतींनी विरोधकांना देखील कधी कमी समजले नाही. त्याचबरोबर विरोधकांना देखील सन्मान दिला, मात्र सापाला कितीही दूध पाजले तरी साप आपले विष सोडत नाही, हे तत्व देखील महाराजांच्या लक्षात होते म्हणूनच त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानला भेटायला जाताना व त्याच्या मगरमिठीतून सुटका करून घेण्यासाठी ज्या वाघनखांचा वापर केला त्या बुद्धी चातुर्याचे आणि शौर्याचे आजही कौतुक होते. कल्पनेच्या पलीकडील शौर्याचे प्रतीक ठरलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच नव्हे तर पुढील शेकडो पिढ्यांसाठी आदर्शच ठरणार आहेत. ते स्वत: उत्तम पद्धतीचे व्यवस्थापन हाताळायचे. त्यामुळेच आजच्या काळात त्यांना आपण छत्रपती शिवाजी मॅनेजमेंट गुऊ असे संबोधत असतो. आपली राजकीय परिस्थिती पाहता आपले राजकीय नेते कोणत्याही तत्त्वाविना व नैतिकतेचा ऱ्हास करून सत्ता गाजवीत असतात. छत्रपतींचा तो काळ वेगळा असला तरी त्यांनी योग्य तत्वांचा वापर केला आणि आपला स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही. म्हणूनच हा राजा म्हणजे अखंड स्थितीचा निर्धाऊ श्रीमंत योगी, ठरलेला आहे. निश्चयाचा महामेरू म्हणूनच त्यांची ख्याती आहे. आपल्या कुटुंबाच्या कल्याणाचा कधी विचार त्यांनी केला नाही. त्यामुळेच कुटुंबामधून अनेक गैरसमज पसरले गेले, परंतु जनतेचे हे राज्य जनतेसाठी चालवण्याकरिता त्यांनी आपल्या निर्धारात कोणताही बदल केला नाही किंवा कोणतीही तडजोड देखील केली नाही. नेहमीच शत्रूंशी दोन हात करणाऱ्या महाराजांनी शत्रू पक्षाकडून तह करण्यासाठी आलेले अनेक प्रस्ताव फेटाळले. कोणत्याही प्रसंगाला तोंड देताना जनतेमध्ये देखील विश्वास निर्माण करणारा हा एक जाणता राजाच आहे. छत्रपतींची जयंती आपण एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करताना छत्रपतींचा एक जरी गुण आपल्यामध्ये उतरवता आला तर ती खऱ्या अर्थाने शिवरायांना खरी आदरांजली ठरेल. छत्रपतींचा तो काळ आणि आजचा काळ यामध्ये प्रचंड फरक आहे. आज आपल्याला स्वातंत्र्य आहे आणि शेजारील कोणतेही राष्ट्र किंवा तेथील सैन्य आपल्यावर थेट चाल करू शकत नाही. शेजारच्या भागात ज्या काही हालचाली चालू असतात त्याची त्वरित आपल्याला कल्पना येते, एवढी यंत्रणा आज सज्ज आहे. त्या काळामध्ये कोणतीही यंत्रणा नसताना देखील छत्रपतींनी शत्रूंचे अनेक हल्ले कसे परतावून लावले ! याचा विचार केलेलाच बरा. छत्रपती हा आपला आदर्श आहे आणि हाच आदर्श घेऊन नव्या पिढीमध्ये तो निर्माण करण्याचा प्रयत्न आजच्या राजकीय नेत्यांनी देखील करणे आवश्यक आहे. आपल्या देशाचे पुढे काय होणार याची आपण नेहमी चिंता करतो, परंतु चिंता करून हे प्रश्न सुटणार नाहीत. केवळ चिंता करतो विश्वाची असे म्हणून होणार नाही. छत्रपतींनी त्या काळामध्ये देखील आपला वेळ कधीही वाया घालविला नाही. अखंडितपणे जनतेची सेवा केली आणि हिंदवी स्वराज्याची पताका सातत्याने फडकत राहावी यासाठी अनेक गनिमी कावे देखील केले आणि त्यांचे नियोजन देखील अत्यंत शिस्तबद्धरित्या असायचे. छत्रपतींचे भव्यदिव्य असे पुतळे उभारून प्रश्न सुटणार नाहीत. छत्रपतींच्या तत्त्वांचे पालन हे प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. आपण सर्वजण उत्सवप्रिय आहोतच, परंतु त्या उत्सवातून देखील आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळावी आणि छत्रपतींचा आदर्श बाळगण्याचे धारिष्ट्या राजकीय नेत्यांनी जरूर केले पाहिजे. सध्याच्या तडजोडीच्या राजकारणाने नैतिकता गमावलेली आहे. तत्वशून्यतेच्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत. त्या आधारेच आपण छत्रपतींच्या नावे मोठा उत्सव करीत आहोत. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ ! हे कधीही विसरता कामा नये. म्हणूनच आजच्या शिवजयंतीपासून प्रत्येकाने पण करावा आणि छत्रपतींचा आदर्श मनी बाळगून जगासमोर भारताचे नवे स्वरूप दाखविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, त्यातूनच शिवाजी महाराजांना खरी आदरांजली ठरणार आहे.