भुतरामहट्टीत आता वाघिणीची डरकाळी
पंधरा दिवसात होणार दाखल : पर्यटकांना उत्सुकता, संग्रहालय व्यवस्थापनाची माहिती
बेळगाव : शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात लवकरच वाघीण दाखल होणार आहे. राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघिणीची डरकाळी संग्रहालयात घुमणार आहे. याबाबत निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुटी असल्याने पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. या पर्यटकांना आता अगदी जवळून वाघाचे दर्शन घेता येणार आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी विविध प्राणी आणण्यात आले आहेत. मात्र, मागील दोन वर्षांत दोन सिंह आणि एका वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या कमी झाली होती. मात्र, मागील आठवड्यात एक सिंहीण आणण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता येत्या पंधरा दिवसात मादी जातीचा वाघ दाखल होणार आहे. यासाठी केंद्रीय प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला आहे. पर्यटकांना आता नवीन एका वाघिणीला पाहता येणार आहे.
विविध जातीचे 201 हून अधिक प्राणी
मागील चार वर्षांपूर्वी तब्बल 34 एकर परिसरात मिनी प्राणी संग्रहालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी विविध जातीचे 201 हून अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. त्यामध्ये दोन सिंह, दोन वाघ, तीन बिबटे, चार तरस, दोन अस्वल, तीन मगरी, तीन सांबर, चाळीस हरीण, चाळीस काळवीट यासह दुर्मीळ पक्ष्यांचा समावेश आहे. विशेषत: गोवा आणि बेळगावला लागून असलेल्या महाराष्ट्राजवळ प्राणी संग्रहालय असल्याने पर्यटकांचा ओघ परराज्यातूनही वाढू लागला आहे. सद्यस्थितीत शनिवार, रविवारी आणि शासकीय सुटी दिवशी महसूल 1 लाख रुपयांपर्यंत जात आहे.
संग्रहालयाचा 50 कोटीच्या निधीतून विकास
दाखल होणाऱ्या वाघिणीला ठेवण्यासाठी विशेष कोठडीची सोय करण्यात आली आहे. स्थानिक वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर तिला तातडीने पर्यटकांसाठी बाहेर सोडण्यात येणार आहे. संग्रहालयाचा 50 कोटीच्या निधीतून विकास साधला आहे. त्यामध्ये वन्यप्राण्यांसाठी स्वतंत्र कोठड्या, पक्षी संग्रहालय, रस्ते, प्राण्यांसाठी पाण्याचे हौद, पर्यटकांसाठी शौचालय उभारण्यात आले आहेत. शाळांना सुटी असल्याने पालकांसह दाखल होणाऱ्या बालकांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: वयोवृद्ध पर्यटकांसाठी सफारी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संग्रहालय फिरणे सोयीस्कर होऊ लागले आहे.
पर्यटकांचा ओघही वाढला
प्राणी संग्रहालयात आणखी एक वाघीण येत्या पंधरा दिवसात आणली जाणार आहे. सध्या संग्रहालयात दोन नर जातीचे वाघ आहेत. म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयातून ही वाघीण दाखल होणार आहे. पर्यटकांचा ओघही वाढू लागला आहे. मंगळवार वगळता सर्व दिवस संग्रहालय खुले ठेवले जात आहे. पर्यटकांना अगदी जवळून सिंह, वाघ, बिबटे, तरस, मगर आदींचे दर्शन होऊ लागले आहे.
- पवन कनिंग (आरएफओ, भुतरामहट्टी)