For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भय इथले संपत नाही...

06:25 AM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
भय इथले संपत नाही
Advertisement

सीमा काय नाटक करतेस गं? चल आता निमूटपणे लिफ्टमधून. नको गं नेहा. बाकी काहीही सांग. त्या दिवशी सगळं पाहिलं ना तू? तरीही का आग्रह करतेस?लिफ्टने जायचे आहे या कल्पनेनंच अस्वस्थ वाटतं. पोटात गोळा येतो. दोन तीन वेळा जे अनुभवलं त्याचीच भीती वाटते आता. ए थांब थांब..लिफ्टचे दार उघडू नको प्लीज...अगं काय बावळटपणा आहे हा? बाकी भाषणं देतेस आणि लिफ्टला घाबरतेस? लहान आहेस का आता? त्या दिवशीही नंतर उत्तम होतीस की ..अगदी नॉर्मल.

Advertisement

अगं हो, तेवढ्या वेळेपुरती भीती वाटते मला.

तुझं काही कळत नाही बघ. नाटक करत नाहीस ना? एवढी कसली भीती गं?

Advertisement

हे बघ तू काही म्हण, मी जाते चालत जिन्याने. तू ये लिफ्टने. असे म्हणून सीमा भराभर जिन्याच्या पायऱ्या चढून निघून गेली. काय वेडेपणा आहे हा? असे म्हणत नेहा वैतागून लिफ्टने निघाली.

एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये चाललेला हा संवाद ‘भीतीच्या निरगाठीवर’ प्रकाश टाकणारा होता.

भयगंड म्हणजे भीतीची गाठ. एखाद्या गोष्टीची भीती वाटणे आणि पुन्हा तिथे गेल्यावर तशीच भीती वाटेल की काय याची भीती वाटणे हे चक्र अनेकदा फोबियामध्ये पहायला मिळते. फोबियामध्ये एक असते केंद्रीय म्हणजे प्राथमिक भीती. आणि सेकंडरी भीती म्हणजे मूळ भीती वरील भीतीचा थर. एकदा एखाद्या गोष्टीची भीती वाटल्यानंतर त्यावेळी निर्माण झालेली संवेदना किंवा ती शारीरिक लक्षणे परत जाणवतील किंवा तशीच भीती वाटेल की काय याचीच भीती वाटणे म्हणजेच मूळ भीतीवरील भीतीची अनेक आवरणे असेही म्हणता येईल. खरंतर अनेकदा प्राथमिक भीती वाटते त्याचे कारण अगदी क्षुल्लक असते. परंतु भीतीला मनाने दिलेला प्रतिसाद मात्र प्रचंड असतो. त्यावेळी अनेक शारीरिक लक्षणे जाणवू लागतात. अनेक संवेदना निर्माण होतात. अवसान गळून जाते. भीतीचा हा झटका एवढा जबरदस्त आणि अनपेक्षित असतो की, ती भीती मनात रुतुन बसते आणि मग नुसत्या कल्पनेनेही अस्वस्थता येऊ लागते. कधी छातीत धडधडू लागते, हातपाय थरथरु लागतात, कधी श्वास कोंडतो, जिवाचा कोंडमारा झाल्यासारखे होते. काही सुचत नाही. विचारांची साखळी तुटते आणि ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट टाळली जाऊ लागते.

आपल्याला क्षुल्लक गोष्टीची भीती वाटते, याची भयभीत व्यक्तीला लाज वाटत असते. परंतु ‘कळतंय पण वळत नाही’ अशीच काहीशी स्थिती होते. काहींना गडगडाची, रस्ता क्रॉस करण्याची, रक्ताची, कुत्रा-मांजरांची, झुरळ, पालीची, लिफ्टची, गर्दीची, बंद खोलीची, मृत्युची अशा वेगवेगळ्या प्रकारांची भीती वाटत असते.

भयगंडाची गाठ प्रयत्न केले तर नक्की सोडवता येते. परंतु सुरवातीला म्हटल्याप्रमाणे यामध्ये निरगाठ असते ती अशी की, त्या भीती वाटणाऱ्या गोष्टीपासून दूर गेल्यावर ती व्यक्ती इतकी नॉर्मल असते की या व्यक्तीला त्रास होत होता का, हा प्रश्न इतरांना पडतो.

अशावेळी ती व्यक्ती नाटक करते आहे, असे वाटू शकते. त्या व्यक्तीला खरंच त्रास होत असेल यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. परंतु यामुळे भयगंडाचा प्रश्न सोडविणे मात्र अवघड होते. फोबियाची कारणमीमांसा दोन प्रकारे केली जाते. एकतर एखाद्या परिस्थितीत रुग्णाला खरोखरच गर्भगळीत करणारा अनुभव आला असेल तर तशी विशिष्ट परिस्थिती वा आठवणही फोबियाचे कारण ठरते. तीव्र भीतीदायक अनुभव ज्यावेळी प्रथम आला असेल त्यावेळची परिस्थिती वा योगायोगाने जवळपास असलेल्या वस्तू या सर्वांची रुग्णाला भीती वाटू लागते. काही वेळा या भीतीची साखळी तयार होते. वैद्यकीय परिभाषेत ही कारणमीमांसा ‘कंडिशनिंग’या शब्दाने वर्णन केली जाते. बिहेविअर थिअरी (वर्तनवाद)या मतांमध्ये तिचा समावेश होतो. तर मनोविश्लेषण शास्त्राच्या स्पष्टीकरणानुसार फोबिक वस्तूंची भीती ही केवळ वरकरणी असते. भीतीचे खरे कारण ती वस्तू नसुन अंर्तमनात दडलेला दुसराच कुठलातरी विचार हे असते.

खरेतर बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात भीतीदायक प्रसंग घडतात. परंतु सर्वांनाच फोबिया जडत नाही. व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्योही फोबियाला कारणीभूत वा पोषक ठरु शकतात. चिंतातूर वा अडचणीच्या प्रसंगी धीर सोडणाऱ्या व्यक्तींच्या साध्यासुध्या भीतीचे फोबियामध्ये सहजपणे रुपांतर होऊ शकते. संकटांना तोंड देण्याऐवजी बगल देण्याकडे ज्यांचा कल अधिक असतो, त्यांना फोबियाचा त्रास लवकर जडू शकतो. सर्व फोबियामध्ये समान सूत्र आहे ते म्हणजे ‘फोबिक वस्तू टाळली की रुग्णाला हलके वाटते.’ फोबिया जेवढा तीव्र तेवढी टाळाआळ अधिक.

फोबियाला दूर करायचे असेल तर रुग्णाला खरेच भीती वाटते आहे हे ओळखायला हवे. कसली नाटकं करतोस? काय झाले घाबरायला? असे उद्गार मित्रमंडळी, नातेवाईकांनी काढणे टाळायला हवे. कारण अशी शेरेबाजी जेव्हा ती व्यक्ती ऐकते तेव्हा भीतीसोबत एकटेपणाची भर पडते. काळजी करणाऱ्या, निराश वाटणाऱ्या, घाबरणाऱ्या माणसाच्या भावना कितीही अनाठायी आहेत असे इतरांना वाटले तरी त्या व्यक्तिच्या दृष्टीने त्या भावना खऱ्या असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास होतो आहे हे ओळखून, स्वीकारुन, आधार देऊन योग्य उपचार पद्धतीचा अवलंब केला तर भयगंड निश्चितच दूर करता येतो. त्या व्यक्तिची चेष्टा, हेटाळणी करत राहिलो तर ती व्यक्ती अधिक नकारात्मकतेकडे जाते. भीतीचे मूळ अगदी इवलेसे असले तरीही त्यातूनच नंतर भीतीचा मोठा वृक्ष तयार होतो हे लक्षात घ्यायला हवे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे फोबिया होण्यामध्ये मेंदूमधील जैवरासायनिक प्रक्रिया जशा कारणीभूत होतात तसेच मनावर केलेले भीतीचे संस्कार व भीती कमी करणाऱ्या प्रयत्नांची टाळाटाळ हे घटकही कारणीभूत आहेत.

चिंताशामक औषधे, समुपदेशन, सायकोथेरेपी व वर्तन उपचार पद्धती द्वारे फोबियाची तीव्रता कमी करुन त्यावर मात करता येते. भीतीची संवेदना कमी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मनाचे संतुलन, वास्तवाची सुयोग्य जाणीव, फोबिया ग्रस्त व्यक्तीचे भीतीला सामोरे जाण्याचे प्रयत्न, कुटुंबीयांची साथ, स्वत:चे नकारात्मक मूल्यमापन थांबविणे या गोष्टी फोबिया दूर करायला मदत करतात. मनस्वास्थ्य चांगले रहायलाही मदत करतात. योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिक प्रयत्न यातून फोबिया निश्चीतपणे नियंत्रणात येऊ शकतो. भीतीचे झालेले कंडिशनिंग बदलण्यासाठी तसेच फोबिक वस्तूला सामोरे जाण्यासाठी ‘सजगता तंत्र’ अर्थात ‘माईंडफुलनेस थेरेपी’चाही उपयोग होतो. माईंडफुलनेसची काही तंत्रे आत्मसात केली तर भीतीला सामोरे जाणे जमू लागते. ही तंत्रे कशी उपयुक्त ठरतात ते जाणून घेऊया पुढच्या लेखात..

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.