For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोष सायलेन्सरमध्ये नाही,आगाऊपणात आहे

10:38 AM Jan 11, 2025 IST | Radhika Patil
दोष सायलेन्सरमध्ये नाही आगाऊपणात आहे
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद : 

Advertisement

आज शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ‘कर्णकर्कश सायलेन्सर’चा आवाज दसरा चौकात जरूर चिरडला. रोड रोलरखाली हजारभर सायलेन्सरचा चेंदामेंदा झाला. पण कोणताही सायलेन्सर आपोआप कर्कश वाजत नाही. दुचाकी वाहनांचा मूळ सायलेन्सर तर एका क्षमतेच्या पुढे आवाजही करत नाही. मग सायलेन्सरचा आवाज कर्कश होतो तरी कसा? तर यासाठी कोल्हापुरात काही ‘तज्ञ’ आहेत. ऑनलाईन असे सायलेन्सर मिळण्याची सोय आहे.

सायलेन्सर म्हणजे वास्तविक शांतता. पण प्रत्यक्षात हे सायलेन्सर असे आहेत, की एका किलोमीटरवरून त्या खास सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा आवाज ऐकू येऊ शकतो आणि जवळूनही बुलेट वाऱ्यासारखी गेली तरी हृदयाचा थरकापच उडून जातो. त्यामुळे या सायलेन्सरचा दोष तसा वर-वर काही नाही.

Advertisement

हा सायलेन्सरचा आवाज बदलून देणारे शांतपणे आपले काम करत आहेत. आवाज बदलून देण्यासाठी पैसे मिळवत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाची रॅली अशा कर्णकर्कश म्हणजे सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या मोटारसायकलशिवाय पूर्ण होत नाही, हे वास्तव आहे. म्हशींची शर्यत, बैलगाडी, घोडागाडीची शर्यत, ज्योत घेऊन धावत आणणाऱ्या तरुणांचा ताफा, रात्री बरोबर 12 वाजता कोणातरी गुंडाच्या वाढदिवसाला झुंडीने जाणारे त्याचे समर्थक त्यांच्या बुलेटचा सायलेन्सर काढल्याशिवाय जातच नाहीत. अगदीच सांगायचे झाले तर बैलगाडी, म्हशीच्या, घोडागाडीच्या शर्यती सुरू होण्यापूर्वी एक खास मिस्त्राr बोलावतात व त्याच्याकडून सायलेन्सरचा आवाज बदलून घेतात आणि शर्यतीत वेगळा थरार निर्माण करतात.

मोठ्या कर्कश आवाजाचा सायलेन्सर हा झाला एक प्रकार. पण फटाके फोडत जाणारे सायलेन्सर ही एक तांत्रिक किमया आहे. हे सायलेन्सर ऑनलाईन सहज मिळतात. ते विशिष्ट मिस्त्राr फिट करतात. या सायलेन्सरचा आवाज बदलण्यासाठी चालकाच्या हातात स्विच असतो. तो जेव्हा हा स्विच प्रेस करतो, त्यावेळी पेट्रोल यंत्रणेत ‘मिस फायर’ होते. अन् फाडकन् आवाज घुमतो. तो इतका तीव्र असतो की इतरांच्या काळजाचा ठोका चुकतो. आणि आपल्या बुलेटच्या आवाजाने जवळचा माणूस कसा थरारतो, पाहून त्या बुलेटस्वाराचा हुरुप मात्र आणखीनच वाढतो. हा असुरी आनंद घेण्याचा प्रकार कोल्हापुरात उघड सुरू आहे. पोलिसांनी अशा बुलेटस्वारांवर कारवाई केलेली आहे, हे देखील खरे आहे. पण हा सारा जुगाड करून देणारे ठराविक ‘तज्ञ’ बिनधास्त आहेत. पैसे मिळवून गावाची मजा बघत बसले आहेत.

निवडणूक रॅली. ती ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत असो अशा सायलेन्सर काढलेल्या मोटारसायकलींशिवाय रॅली पूर्णच होऊ शकत नाही. त्यासाठी रॅली सुरू होण्यापूर्वी सायलेन्सर काढणे किंवा त्याची पुंगळी बदलणे यासाठी पैसे देऊन या तज्ञांना बोलावले जाते. ते एका ठिकाणी बसून पाना, मार्तूल व पकडीच्या सहाय्याने दोन-तीन मिनिटांत आवाज बदलून देतात. म्हशी व बैलगाडी, घोडागाडीची शर्यत तर अशा सायलेन्सर काढलेल्या गाड्यांशिवाय सुरूच होत नाही. किंवा असा टार.. टार.. आवाज झाल्याशिवाय म्हैशी, बैल व घोडेही पळत नाहीत. शर्यत सुरू झाली, हे कदाचित त्यांना असा आवाज आल्याशिवाय कळत नाही.

सायलेन्सर काढलेल्या गाड्या पकडणे एवढेच शहर वाहतूक शाखा पोलिसांचे काम नाही. त्यांना इतरही कामे आहेत. पण अशा गाड्या पकडायच्या असतील तर राजकीय रॅलीत त्यांनी आपले पथक ठेवले तर त्यांना एकावेळी शंभर-दोनशे गाड्यांचा ताफा सापडू शकणार आहे किंवा जे मिस्त्राr असे सायलेन्सर बदलून देतात, त्यांच्यावर कारवाई केली तर तो संदेश खूप खोलवर पोहोचू शकणार आहे आणि थोडे तरी नियंत्रण येऊ शकणार आहे. कारण आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा दोष छोटा आहे. पण हा या सायलेन्सरच्या आवाजात मुद्दाम बदल करणाऱ्यांचा गुन्हा खूप मोठा आहे आणि त्यांच्यावरच कारवाईची गरज आहे.

  • मोटारसायकलस्वार विचित्र मनोवृतीचे

आपल्या मोटारसायकलचा आवाज इतरांपेक्षा वेगळा आहे, हे दाखवणाऱ्यांची मानसिकताच खूप विचित्र आहे. आपण कर्कश आवाज करत मोटारसायकल चालवतो इतरांना त्याचा त्रास होतो हे दिसत असूनही हे मोटारसायकलस्वार स्वत:ला फार वेगळे समजतात आणि चित्र-विचित्र आवाजाचे सायलेन्सर आपल्या मोटारसायकलला बसवतात.

  • आम्ही हे काम करत नाही

सायलेन्सरमध्ये मुद्दाम आवाज बदलून देणे, हे काम कोल्हापुरातले खानदानी मेस्त्राr कधीच करत नाहीत. सायलेन्सरचा आवाज वाढवणे हा विकृत आनंदाचा प्रकार आहे. पोलिसांनी जरूर कारवाई करावी

                                                                     आण्णा मोरे, टु व्हिलर ऑटो मेकॅनिक संघटना संस्थापक


Advertisement
Tags :

.