एका बालिकेचे भाग्य
कोणाचे भाग्य केव्हा फळफळेल हे सांगता येत नाही, अशी म्हण आहे. तसेच, कित्येकदा ‘खाकेत कळसा आणि गावाला वळसा’ अशीही अनेकांची स्थिती होते. अनेकदा असेही होते, की ज्या वस्तूला आपण किरकोळ समजत असतो, त्याच वस्तूत आपल्या भाग्याची किल्ली दडलेली असते. पण ती आपल्याला दिसलेली नसते. जेव्हा ती दिसते, तेव्हा स्वत:चे स्वत:ला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.
अशीच एक घटना इस्रायल या देशात घडली आहे. या देशातील तेल अझेका या शहरात वास्तव्य करणाऱ्या एका कुटुंबातील एका बालिकेचे भाग्य अचानकपणे फळफळले आहे. या बालिकेचे नाव जीव्ह नित्झन असे आहे. तिच्या हाती अमाप संपत्तीचा एक स्रोत लागला आहे. विशेष बाब अशी, की हा स्रोत कित्येक दशके उघड्यावर दगडांसमवेत पडला होता. पण कोणाचेही त्याच्याकडे लक्ष केले नव्हते. ही बालिकेने अजाणतेपणे हा स्रोतावर हात ठेवला आणि तो तिचा झाला.
घडले होते असे की, हे तेल अझेका शहर इस्रायलमधील एका पुरातत्व विभागात आहे. येथे 15 वर्षे पुरातत्वीय उत्खननाचे काम चालले होते. उत्खननातून हजारो दगड बाहेर आले होते आणि ते इतस्तत: पडले होते. या दगडांमध्येच एक अनमोल दगडही होता. ही बालिका आपल्या बहिणीबरोबर या भागात हिंडत असताना तिने नेमका हा अनमोल दगड उचलला. त्याच्यावरची वाळू झटकल्यानंतर तो चमकू लागल्याने या दोन्ही भगिनींनी तो कुतुहल म्हणून घरात आणला. या कुटुंबाने त्वरित ही सूचना इस्रायलच्या पुरातत्व प्राधिकरणाला दिली. पुरातत्व विभागाच्या संशोधकांनी घरी येऊन या दगडाचे परीक्षण केले.
परीक्षणात असे आढळून आले, की हा दगड नसून अत्यंत प्राचीन असा पवित्र ‘ताईत’ आहे. तो ‘कॅनानाईट स्कार्ब अॅम्युलेट’ या संज्ञेने संबोधला जातो. तो तब्बल 3 हजार 800 वर्षांपूर्वीचा आहे. त्याची आजची किंमत कोट्यावधी डॉलर्स आहे. या बालिकेला तो सापडला असल्याने तिला या किमतीचा काही भाग पारितोषिक म्हणून दिला जाणार आहे. ही रक्कमही या कुटुंबाला प्रचंड श्रीमंत करण्याइतकी पुरेशी आहे. हा ताईत आता इस्रायलच्या पुरातत्व विभागाने आपल्याकडे घेतला आहे. भाग्य उजळविण्यासाठी मनगटावर किंवा गळ्यात ताईत घातला जाण्याची प्रथा आहे. या बालिकेला अशा ताईतामुळेच हे भाग्य प्राप्त झाले आहे.