उद्यापासून ओटवणे गावचा प्रसिध्द संस्थांनकालीन दसरोत्सव
देवस्थानच्या सुवर्ण तरंगासह दागिन्यांच्या दर्शनासाठी भाविकांची होते गर्दी
ओटवणे प्रतिनिधी
सुमारे साडे चारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावच्या प्रसिध्द शाही दसरोत्सवाला बुधवारी १ ऑक्टोबरला प्रारंभ होत असुन दोन दिवस चालणाऱ्या या दशरत्सवाची सांगता गुरुवारी २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा होणार आहे. या दसरोत्सवात वर्षातून एकदाच दर्शन होणाऱ्या या देवस्थानच्या सुवर्ण तरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा, बेळगाव कोल्हापूर परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते. दसरोत्सवाच्या या सुवर्ण पर्वणीला हजारो भाविक रवळनाथ चरणी लिन होत रवळनाथाचा कृपा आशिर्वाद घेतात. ओटवणे गावचा संस्थानकालीन दसराउत्सव खंडेनवमी आणि विजयादशमी असा दोन दिवस साजरा केला जात असुन दसरोत्सवात या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढवण्याची प्रथा आहे. या देवस्थानची तिन्ही तरंगे सोन्याची आहेत. सावंतवाडी महसूल खात्याच्या उपकोषागारात असलेला हा ऐतिहासिक सोनेरी ठेवा दसरा उत्सवाच्या एक दिवस आधी मंगळवारी दुपारी मंदिरात आणण्यात आला.खंडेनवमीला बुधवारी दुपारी रवळनाथासह या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजविल्यानंतर तिन्ही तरंगाना सप्त पितांबरीच्या वस्त्रांनी सजविण्यात येणार आहे. सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर शिव लग्न सोहळा त्यानंतर भाविकांनी सोने म्हणून आपट्याची लुटल्यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीने महिलानी क्लेशपीडा परिहार्थ अग्नि स्नान होणार आहे. गुरूवारी सायंकाळी सुवर्ण तरंगाची खेम सावंत समाधी भेट व गाव रखवाल कौलाने या दोन दिवसांच्या दसरोत्सवाची सांगता होणार आहे.या राजेशाही उत्सवात भाविकांना राजसत्ता आणि वैभवाचा साज पाहता येणार आहे. तसेच भाविकांना या देवस्थानचे सुवर्ण वैभव वर्षातून एकदाच पाहता येते. याची देही याची डोळा हे सुवर्ण वैभव पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. घटस्थापनेपासूनच या सुवर्ण सोहळ्याची तयारी सुरू आहे. गेले आठ दिवस मंदिरात विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. .