नोव्हेंबरमध्ये येणार ‘द फॅमिली मॅन 3’
सीरिजचे नवे पोस्टर सादर
मनोज वाजपेयी अन् प्रियमणी यांची मुख्य भूमिका असलेली सीरिज ‘द फॅमिली मॅन’ ही भारताच्या सर्वात लोकप्रिय सीरिजपैकी एक आहे. या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून त्यांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली आहे. सीरिजची कहाणी एक मध्यमवर्गीय इसम श्रीकांत तिवारीची असून तो एका तपास यंत्रणेच्या विशेष शाखेसाठी काम करत असतो. त्याच्यावर कामाच्या ताणासह परिवार चालविण्याचीही जबाबदारी आहे.
आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. द फॅमिली मॅनचा सीझन 3 हा नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मनोज वाजपेयीने दिली आहे. परंतु निश्चित तारीख मात्र त्याने जाहीर करणे टाळले आहे.
मागील दोन यशस्वी सीझनमध्ये यंदाही फॅमिली मॅन 3 ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवरच प्रदर्शित होणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये जयदीप अहलावत हा दमदार कलाकार दिसून येणार आहे. तो या सीझनमध्ये मुख्य खलनायक असणार आहे. यामुळे या सीझनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक अॅक्शन आणि ड्रामा प्रेक्षकांना पहायला मिळू शकतो.