एका अनुदार लोकशाही राजवटीचा अस्त
मध्य युरोपातील एक महत्त्वपूर्ण विकसित देश हंगेरीमध्ये 12 एप्रिल रोजी संसदेच्या सर्व 199 जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. 1990 मध्ये देशात लोकशाही प्रस्थापित झाल्यापासून पार पडलेल्या या 10 व्या संसदीय निवडणुकीत आतापर्यंत सर्वाधिक 80 टक्क्यांइतके मतदान झाले. निवडणूक निकाल जेंव्हा स्पष्ट झाले तेंव्हा पीटर मॅग्यार यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष टिस्झाने पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान यांच्या सत्ताधारी फिडेझ पक्षाचा दारूण पराभव करत प्रचंड बहुमत मिळवले. त्यामुळे हंगेरीत तब्बल 16 वर्षे सत्तास्थानी असलेल्या ऑर्बान युगाचा अंत झाला.
लोकशाही प्रजासत्ताकातील ही घटना, केवळ पाश्चिमात्य देशांतीलच नाही तर जगातील साऱ्याच सत्ताधिशांना जनतेला गृहित धरुन चालवलेल्या मनमानीचा अंत अटळ असतो, हा धडा देणारी आहे. निवडणुकीचे अंतिम निकाल जेंव्हा जाहीर झाले तेंव्हा टिस्झा पक्षाने 199 पैकी तब्बल 141 जागांवर विजय मिळवला. या जागा दोन तृतियांश बहुमतापेक्षा अधिक असल्याने घटनात्मक सुधारणा मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ या पक्षास मिळाले आहे. सत्ताधारी ऑर्बान यांचा फिडेझ पक्ष संसदेत अवघ्या 52 जागा मिळवून अभूतपूर्व पराभवाच्या खाईत लोटला गेला. यानंतर दीड दशकानंतर प्रथमच पीटर मॅग्यार यांच्या रुपात नवा पंतप्रधान हंगेरीस प्राप्त होणार आहे.
लोकशाहीस वाकवणारी सत्ता
ऑर्बान यांची 16 वर्षांची कारकिर्द नजरेखालून घातली तर काही अशा गोष्टी स्पष्ट होतात, ज्या सैद्धांतिकदृष्ट्या मूलभूत लोकशाही तत्वांशी विसंगत आहेत. त्या अशा की, लोकशाही व्यवस्था जर पद्धतशीरपणे सत्तेशी संबंधित व्यक्तींचे खासगी आणि पक्षीय हितसंबंध जोपासण्यासाठी वापरली तर ती बराच काळ वापरता येते. लोकशाहीचे दोन प्रमुख आधारस्तंभ असलेल्या कायदा व पत्रकारिता संस्थांना नियोजनबद्धरित्या नियंत्रित करुन निर्विघ्न मनमानी कारभार करता येतो. प्रचंड बहुमताद्वारे राज्यघटनेत अनुकुल बदल, सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडेल असा निवडणूक कायद्यांचा संच आणि त्यानुरुप यंत्रणा या बाबी साध्य होऊ शकतात. सत्ताधारी पक्षाचे नियंत्रण नागरी, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकारी क्षेत्रातील स्वायत्त संस्थांवर लागू करता येते. विदेशी धोरणात दोन परस्परविरोधी, पण प्रभावी देशांना संतुष्ट राखत आपल्या सत्तेसाठी एकात्म बाह्य अनकुलता प्राप्त करता येते. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान यांनी गेली सोळा वर्षे ही सारी कारागिरी बेमालुमपणे साध्य केली होती. त्यांच्या अतिउजव्या पक्षाने राष्ट्रीय अस्मिता, देशभक्ती, इतकेच नव्हे तर फुटबॉल सामन्यास जाण्यासारख्या दैनंदिन गोष्टींना उजव्या विचारसरणीच्या समर्थनाशी जोडण्याचाही प्रयत्न केला.
प्रसार माध्यमांवर नियंत्रण
2010 मध्ये सत्तेवर परत आल्यापासून पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान यांनी प्रसार माध्यमांतील विचार बहुलता आणि स्वातंत्र्यास सुरूंग लावण्याचे सतत प्रयत्न केले. सर्वप्रथम देशाच्या राष्ट्रीय प्रसार यंत्रणेत पक्ष समर्थकांचा भरणा करुन तिचे ‘होयबा’ प्रचार यंत्रात रुपांतर केले. सत्ताधारी पक्ष फिडेझशी घनिष्ट संबंध असलेल्या धनदांडग्यांनी टप्पाटप्प्याने खासगी माध्यम संस्था विकत घेऊन ताब्यात घेतल्या, असे करत देशातील जवळपास 80 टक्के प्रसार माध्यमांवर नियंत्रण मिळवले. मोजक्या मुक्त किंवा विरोधी पत्रकारिता जोपासणाऱ्या प्रसार माध्यमांना नमवण्यासाठी सरकारी जाहीरातीचे वाटप थांबवणे, कमकुवत कायदेशीर चौकटींचा आधार घेत अतिउदारमतवादी माध्यमांना कायदेशीर कारवाईत अडकवणे, पेगासस् सॉफ्टवेअरचा वापर करुन पत्रकारांवर पाळत ठेवणे, सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना, सरकार समर्थकांकडून ऑनलाईन धमक्या, ट्रोलिंगद्वारे मवाळ करणे इत्यादी उपाय ऑर्बान सरकारने केले. परिणामी अनेक स्वतंत्र व नामवंत प्रसार संस्था बंद झाल्या.
ऑर्बान नीतीचा प्रभाव
या पूर्वीच्या सलग चार संसदीय निवडणुकांत प्रचंड बहुमताने मोठे विजय, यामुळे जणू हंगेरी ही अतिउजव्यांची प्रयोगशाळा आणि ऑर्बान तिचे संशोधन प्रमुख बनले होते. लोकशाही व्यवस्थेतील फटी आणि फाटे यांचा यथायोग्य वापर करुन आपले स्थान आणि राजवट चिरंतन असल्याचा समज निर्माण करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले. अनुदार लोकशाही राज्य उभारण्यासाठी ऑर्बाननी अंमलात आणलेल्या कार्यपद्धतीचा वॉशिंग्टनपासून वार्सापर्यंत अभ्यास केला गेला. ट्रम्प यांचे माजी सहकारी स्टीव्ह बॅनन यांनी तर ऑर्बानना ‘ट्रम्प आधीचे ट्रम्प’ हा मानाचा किताब बहाल केला. या साऱ्यातून निर्माण झालेला प्रभाव इतका की, हंगेरीच्या जनतेत ऑर्बानना पर्याय नाही असा अंधविश्वास खोलवर रुजत गेला. इतकेच नव्हे तर देशातील विरोधी पक्षात आणि बुद्धीवादी उच्चभ्रू वर्गात विद्यमान राजकीय संस्थांद्वारे, म्हणजेच निवडणुकांतून ऑर्बान सरकार हटवणे अशक्यप्राय वाटू लागले.
अखेर भ्रमाचा भोपळा फुटला
ताज्या संसदीय निवडणुकीत ऑर्बान यांच्या फिडेझ पक्षास धूळ चारणाऱ्या पीटर मॅग्यार यांनी दोनच वर्षांपूर्वी हा पक्ष सोडून टिस्झा पक्षात प्रवेश केला होता. 2020 मध्ये स्थापन झालेल्या मध्याकडून उजव्या विचारसरणीच्या टिस्झाचे भाग्य त्यांच्या आगमनाने उजळले. हंगेरीत गेल्या दशकभराच्या तुलनेत 2025 मध्ये उच्चांकी पातळीवर पोहोचलेला बेरोजगारी दर, आर्थिक विकास दरात झालेली पिछेहाट, युरोपियन महासंघाने हंगेरीची सर्वात भ्रष्ट देश म्हणून केलेली गणना, युरोपियन महासंघाच्या एकात्मता आणि विकास निधीने, हंगेरीत कायद्याचे राज्य नसल्याच्या आक्षेपावरुन गोठवलेले अब्जावधी युरो, त्यामुळे निर्माण झालेला वित्तीय दबाव आणि सार्वजनिक वित्तव्यवस्थेत निर्माण झालेली तूट हे सारे मुद्दे मॅग्यार यांनी प्रभावीपणे लोकांसमोर आणले. फिडेझ पक्षातील आक्षेपार्ह गोष्टी ज्या त्यांना पक्षात राहून माहीत होत्या, त्या त्यांनी चव्हाट्यावर आणल्या. सत्ताधारी वर्गाच्या भ्रष्ट कारभाराबद्दलच्या दाव्यांना पुष्टी देण्यासाठी, अंतर्गत माहिती सादर करुन ते जनतेचे लक्ष वेधण्यात यशस्वी झाले. एकदा नवी विरोधी चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, हंगेरीच्या असमान व अशक्य निवडणूक मैदानात ऑर्बानचे आव्हान आपण धुळीस मिळवू शकतो, या विश्वासावर ते ठाम राहिले. देशभरात सभा घेण्याचे झंझावती सत्र त्यांनी सुरू केले. प्रचार कार्यक्रमात हंगेरीयन ध्वज, लोकगीते, कविता आणि ऐतिहासिक संदर्भाचा समावेश होता. मागील निवडणुकांची हाताळणी, बिघडणारी आर्थिक स्थिती, जनतेतील अव्यक्त असमाधान, जनमत चाचण्या यांचा अभ्यास करता मॅग्यार यांना हे कळले होते की, विरोधी पक्षातील मतभिन्नता, नेतृत्वाचा अभाव, धोरणात्मक कार्यक्रमाची असमर्थता हे दोष दूर केल्यास ऑर्बानचा पराभव होऊ शकतो. मग पक्षबांधणी, अथक प्रचार मोहीम व समाज माध्यमांवर स्पष्ट भूमिका मांडणी यांचा मेळ घालून, त्यांनी टिस्झा पक्षास एक प्रमुख राजकीय शक्तीच्या रुपात ज्या वेगाने उभे केले त्याचे वर्णन वर्षानुवर्षे केले जाईल.
अनिल आजगांवकर