चीनी सैनिकांची ‘श्रद्धा’
विज्ञाननिष्ठेचा कितीही जयजयकार होत असला, तरी ‘श्रद्धा’ हे हा मानवाच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. देव, धर्म काहीही न मानणाऱ्या कम्युनिस्ट चीनमधील सैनिकांनी याचा प्रत्यय आणून दिला आहे. आपल्या मृत मातापित्यांची छायाचित्रे हे चीनी सैनिक भगवान श्रीशंकारचे स्थान असणाऱ्या कैलास पर्वताच्या एका विशिष्ट खडकावर लावतात, हे अलिकडच्या काळात उघड झाले आहे. ते तसे का करतात, याचा शोध घेतला असता, चीनी सैनिक तसे श्रद्धेपोटी करतात, असे दिसून आले आहे. या खडकावर मृत व्यक्तींची छायाचित्रे लावली असता या मृतांना त्यांच्या नव्या जन्मात सुखसमाधान लाभते, अशी त्यांची श्रद्धा असते.
कैलास पर्वतावर असलेल्या या पवित्र खडकाला ‘पुनर्जन्माचा पाषाण’ किंवा ‘स्टोन ऑफ रीबर्थ’ असे नाव आहे. हा खडक चीनी सैनिकांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आहे. आपल्या मृत मातापित्यांना चांगला पुनर्जन्म मिळावा, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते कैलास पर्वताच्या भागात सेवा देण्याची वेळ आली, की तेथे जाताना आवर्जून आपल्या मृत मातापित्यांचा किंवा अन्य निकटच्या मृत कुटुंबियांची छायाचित्रे घेऊन जातात आणि या खडकावर भक्तीभावाने ती चिकटवितात. असे करण्याने त्यांना त्यांच्या पुनर्जन्मात सुखाची प्राप्ती होईल अशी त्यांची गाढ समजूत आहे. तसेच, असे करण्याने आपल्यालाही अतिव समाधान लाभते, असे या सैनिकांचे प्रतिपादन आहे. केवळ चीनी सैनिकच असे करतात, असे नाही. कैलास पर्वताच्या दर्शनाला जाणारे अनेक भाविकही असे करतात. केवळ आपल्या मृत कुटुंबियांचीच छायाचित्रे नव्हेत, तर आपण पाळलेल्या आणि आपण जीवापाड प्रेम केलेल्या मृत पाळीव प्राण्यांची छायाचित्रेही येथे लोकांकडून लावली जातात. प्राण्यांनाही चांगला पुनर्जन्म मिळावा, अशी प्रार्थना लोक करतात.
नुकताच 18 वर्षांचा एक चीनी युवक मोटरबाईकवरुन येथे आला होता. त्याचे नाव हू जियाकी असे आहे. तो 4 हजार 800 किलोमीटरचा प्रवास बाईकवरुन करुन येथे आला होता. त्याला त्याच्या मृत मातेचे छायाचित्र या खडकावर लावायचे होते. पण प्रचंड हिमवर्षावामुळे त्याला या खडकापर्यंत जाता आले नाही. त्यामुळे त्याला अक्षरश: रडू कोसळले होते, असे त्याच्या सहकाऱ्यांनी म्हटले होते.